‘
लातूर दि.१३ :
येथील श्री केशवराज माध्य.विद्यालयात दि.१३/४/२०२२ रोजी आयोजित केलेल्या *कविता आपल्या दारी* या कार्यक्रमात केशवराज विद्यालयाचे विद्यार्थी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री सुनील वसमतकर, ज्येष्ठ कवी रमेश चिल्ले,कवी रामदास कांबळे,कवी नरसिंग इंगळे तसेच केशवराज विद्यालयातील शिक्षक श्री बबन गायकवाड यांचा सहभाग होता.
दि. २२,२३,२४ एप्रिल २०२२ असे तीन दिवस उदगीर येथे संपन्न होत असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची वातावरण निर्मिती करण्यासाठी, तसेच विद्यार्थी शिक्षकांना संमेलनास येण्याचे आवाहन करण्यासाठी संयोजन समितीकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे ‘कविता आपल्या दारी’. त्याचाच एक भाग म्हणून दि.१३ एप्रिल २०२२ रोजी श्री केशवराज मा.विद्यालयात हा कार्यक्रम आयोजित केला होता. कु.तृप्ती नानजकर, कु.रेणू जोशी या बालकवयित्रींच्या कवितेने प्रारंभ झालेल्या या कविसंमेलनात श्री केशवराज विद्यालयातील शिक्षक श्री बबन गायकवाड यांनी ‘कोरोना कहाणी’ ही कविता सुरेल आवाजात सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. त्यानंतर कवी रामदास कांबळे यांनी ‘झाडे लावू’ ही पर्यावरण रक्षण विषयावरची सुंदर रचना व ‘महिलांचे भांडण’ अशा दोन कविता गाऊन श्रोत्यांच्या टाळ्या घेतल्या.कवी नरसिंग इंगळे यांनी ‘आई’ ही कविता सादर करून सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. त्यांची दुसरी रचना ‘शिवार सजला’ या कवितेतील शेतीतील पिकांचे, सुगीचे, निसर्गाच्या वर्णनाने विद्यार्थ्यांत बहर आणला.ज्येष्ठ कवी रमेश चिल्ले यांनी त्यांच्या ‘झाडावर बांधले चिमण्यांनी गाव’, ‘बाबा सांगायचे गोष्ट’, व ‘गावाकडे चला आता गावाकडे चला’ अशा तीन कवितांचे उत्तम सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचा समारोप शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री सुनील वसमतकर यांनी कविता सादरीकरणातूनच केला.बाप आणि मुलीच्या नात्यातील जिव्हाळा वर्णन करणारी ‘तू माझी मुलगी आहेस’ ही कविता आणि बाप व मुलगा या दोघांचाही स्नेहबंध कसा असतो हे सांगणारी ‘माझ्या फुलपाखरा’ ही कविता अशा दोन कविता सादर करून कवितेतूनही नात्यातील स्नेहभाव कसा अभिव्यक्त केला जातो ते स्पष्ट केले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात संपन्न झालेल्या अशा या बहारदार कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्रीमती शैला सांगवीकर यांनी केले. तर श्रीमती क्षमा कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप.मु.अ.श्री बालासाहेब केंद्रे,पर्यवेक्षक श्री संदीप देशमुख,श्री संतोष बीडकर, श्री सुग्रीव सप्ताळ,श्रीमती राजश्री कुलकर्णी, श्रीमती वनमाला कलुरे,श्रीमती सुलक्षणा गंगथडे,श्रीमती रीता सहस्त्रबुद्धे यांनी परिश्रम घेतले.