राष्ट्रीय युवक महोत्सवात लातूरचा सुमित हसाळे ‘मिमिक्री’मध्ये देशात दुसरा
लातूर : देशातील विद्यापीठांतर्गत बंगळुरू येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील युवक महोत्सवातील ‘नकला’ अर्थात ‘मिमिक्री’ या कला प्रकारात लातूरच्या सुमित हसाळे याने देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे लातूरच्या विविध क्षेत्रातील मंडळींनी सुमितचा सत्कार करून कौतूक केलं. या कामगिरीमुळे कला क्षेत्रातही लातूर पॅटर्नचा दबदबा अधोरेखित झालाय.
राष्ट्रीय स्तरावरील युवक महोत्सव २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान बंगळुरू येथे पार पडल्या. ज्यात देशातील २४ विद्यापीठातील २४ निवडक स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. ज्यात लातूरच्या सुमित हसाळे याने नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलं. या युवक महोत्सवात ‘नकला’ अर्थात ‘मिमिक्री’ या कला प्रकारात त्याने देशातून दुसरा क्रमांक पटकाविला. प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या हुबेहूब नकला सुमित हसाळे ने आपल्या खास शैलीत सादर करीत परीक्षकांची मने जिंकत देशात दुसरा क्रमांक पटकाविला. सुमित हा नांदेड विद्यापीठात फाईन आर्टच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून त्याने लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून एम.एस्सी. केमिस्ट्रीचे शिक्षण पूर्ण केलं आहे.
सुमित हसाळे च्या या कामगिरीमुळे कला क्षेत्रातही लातूर पॅटर्नचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे लातूर शहरातील विविध क्षेत्रातील मित्र परिवाराच्यावतीने सुमित हसाळे याचा सत्कार करून कौतुक करण्यात आले. याप्रसंगी दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले, प्राचार्य निलेश राजेमाने, पत्रकार शशिकांत पाटील, आदर्श मैत्रीचे संतोष बिराजदार, संतोष बिराजदार, बालाजी पिंपळे, हरीश कदम, बालाजी कांबळे, सिताराम खोडवेकर, सूरज साबळे, विजय घोलपे आदींची उपस्थिती होती. सुमित हसाळे च्या या कामगिरीमुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.