पनवेल, (प्रतिनिधी) राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना होत आला तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराला लागणाऱ्या विलंबावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. पुढच्या आठवड्यात हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदासाठी इच्छुकांना मोलाचा सल्ला दिला आहे. “कमीत कमी अपेक्षा ठेवा”, असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे. पनवेलमध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेस ते बोलत होते.
हे भाजपा-शिवसेनेचे युती सरकार सत्तेवर आल्यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढणे साहजिकच आहे. मंत्रिपदासाठी आत्तापर्यंत अनेक नेत्यांनी मला अर्ज दिला आहे. जवळजवळ १२०० अर्ज माझ्याकडे आले आहेत. मात्र, सर्व नियमांच पालन करुनच मंत्रिमंडळ विस्तारात आमदारांना संधी दिली जाईल. यासाठी राज्यपालांचेही मार्गदर्शन घेण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले. हे केवळ भाजपाचे सरकार नाही तर शिवसेना- भाजपाचे युती सरकार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात काही जागा शिवसेनेला द्याव्या लागतील. अनेकजण अनुभवी आहेत पण सगळ्यांनाच संधी मिळू शकणार नाही. त्यामुळे कमीत कमी अपेक्षा ठेवा, असा सल्ला फडणवीसांनी भाजपा नेत्यांना दिला आहे.