सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित जी. ए. कुलकर्णींच्या कथा अभिवाचन कार्यक्रमात लातूरकर मंत्रमुग्ध
लातूर :
मन:पूत भावभावनांच्या आंदोलनांचे नेमके व चित्रमय शब्दरेखन असे वैशिष्ट्य असलेल्या, जी. ए. कुलकर्णींच्या कथांचे मराठी साहित्यात अजरामर असे योगदान आहे. मनोविश्वातील घडामोडींसह माणसाच्या वृत्ती, प्रकृती व विकृती यांच्यातील अद्भुततेचा वेध, सामान्य माणसाच्या सुखदु:खाच्या व स्वप्नपूत विचारविश्वाचीही उकल जी. एं.च्या लेखणीतून साकारत असे.
जीएंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लातूर शहरात सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या ‘साहित्यविशेष’ या उपक्रमांतर्गत जीएंच्या निवडक कथांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम अनेक भागांत आयोजित करण्यात येत आहे. त्यांपैकी दुसऱ्या भागात दि. ४ जून एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात ‘लीला’ व ‘भोवरा’ या कथांचे अभिवाचन करण्यात आले. या कथांची निवड, संगीत नियोजन व दिग्दर्शन प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी केले व त्यांच्यासह दस्तगीर शेख, भाग्यश्री कुलकर्णी, वैष्णवी कुलकर्णी, यशवंत कुलकर्णी, उमा व्यास, सुनीता देशमुख, व संजय अयाचित या कलावंतांनी हे अभिवाचन साकारले. या अभिवाचनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे समन्वयक प्रा. मनोहर कबाडे, प्रा. डॉ. सौ. संपदा कुलकर्णी-गिरगावकर, पुरुषोत्तम भांगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास चंद्रकलाताई भार्गव, पत्रकार प्रदीप नणंदकर, शिरीष पोफळे, डॉ. अशोक आरदवाड, डॉ. मुकुंद भिसे, डॉ. वर्षा पाटील, संजय राजहंस, विजय मस्के, सिनेअभिनेते अनिल कांबळे, प्रा. सुचित्रा वाघमारे, डॉ. संजय शिंदे, डॉ. गणेश निटुरे, आकांक्षा आळणे, सुवर्णा बुरांडे, कल्याण वाघमारे, संतोष अपसिंगेकर, शिरीष कुलकर्णी, मंगला सास्तूरकर यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर कलावंत, रंगकर्मी, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभिवाचनाचे थेट प्रसारणही समाजमाध्यमावरून करण्यात आले होते. त्यामुळे त्याचा असंख्य रसिकांना लाभ घेता आला. ३० एप्रिल रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या पहिल्या भागानंतर या दुसऱ्या भागास रसिकांनी वाढत्या संख्येने प्रतिसाद दिला. सद्यकाळात, विशेषत: नव्या पिढीच्या वाचनसंस्कृतीस पोषक अशा या प्रकारच्या कार्यक्रमांची गरज असल्याचे मत रसिकांनी व्यक्त केले. त्यामुळे जीएंच्या अजुनह अनेक वेगवेगळ्या व अनवट कथांचा समावेश असलेल्या यापुढच्या भागांनाही चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.