औसा विकासासाठी शासन कटिबध्द

0
242

 

*औसा नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध*

*नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे*

*औसा नगर परिषदेच्या अंतर्गत पाणी वितरण प्रस्तावाला तात्काळ मान्यता देणार*

*औसा नगर परिषदेने भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव सादर करावा*

*15 ऑगस्ट ला राष्ट्रध्वजाबरोबरच वृक्षाला ही सलाम करून पर्यावरण संवर्धन मोहीम राबवावी*

*जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला 55 लिटर पाणी उपलब्ध करणार*

*नगर विकास राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न*

लातूर, दि.9(जिमाका):- औसा नगर परिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या अंतर्गत नगरपरिषदेने जे विकासात्मक कामे प्रस्तावित केलेले आहेत त्या सर्व कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच औसा नगरपरिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगर विकास, उच्च व तंत्रशिक्षण, मदत व पुनर्वसन, ऊर्जा आणि आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

औसा नगर परिषदेच्या वतीने आयोजित विविध विकास कामांचा शुभारंभ, भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी नगर विकास राज्यमंत्री तनपुरे बोलत होते. यावेळी संसदीय कार्य, भूकंप पुनर्वसन, पर्यावरण, पाणीपरवठा व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, नगराध्यक्ष अफसर शेख, उपनगराध्यक्ष क्रांतीताई कांबळे, महंत राजेंद्र गिरी महाराज, प्रदीप मोरे, श्रीकांत सूर्यवंशी, संतोष सोमवंशी, जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, मुख्याधिकारी वसुधा फड यांच्यासह सर्व नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

नगर विकास राज्यमंत्री तनपुरे पुढे म्हणाले की, औसा नगर परिषदेने औसा शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी माकणी धरणातून सुमारे 37 किलोमीटर पाईपलाईन द्वारे पाणी आणून या योजनेचे काम अत्यंत कमी कालावधीत पूर्ण करून नागरिकांना पुढील काळात दररोज पाणी देऊन दिलासा देण्याचा चांगला उपक्रम राबविल्याबद्दल नगरपरिषदेचे कौतुक करून शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे प्राप्त झाल्यास त्यावर त्वरित मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही याप्रसंगी दिली.

औसा नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण मध्ये अत्यंत उत्कृष्ट काम करत असल्याबद्दल राज्यमंत्री तनपुरे यांनी कौतुक केले. तसेच नगरपरिषदेने भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव तयार करून सादर करावा. त्याप्रमाणेच शहरातील सांडपाण्यावर ट्रीटमेंट करून पाणी शुद्ध करण्याचा प्रस्ताव सादर करावा. या सर्व कामांना नगर विकास विभागा कडून तात्काळ मान्यता देण्यात येईल व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तर शिवकालीन मराठा भवन, वाचनालय व सभागृह या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने बांधले जात असून मराठा व इतर सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येत असून हा नगरपालिकेचा एक चांगला उपक्रम असून यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे त्यांनी म्हंटलं.

औसा नगर परिषदेमार्फत अनेक विकास कामे हाती घेण्यात आले असून नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यात ही नगरपरिषद मराठवाडा विभागात प्रथम असल्याचे मत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला प्रतिदिन 55 लिटर पाणी देण्याचे नियोजन असून ही योजना सन 2024 पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 15 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन समारंभ सर्वत्र साजरा होणार असून या दिवशी प्रत्येक नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी आपल्या घरासमोरील व परिसरातील वृक्षाला राष्ट्रध्वजा बरोबर सलाम करावा. तसेच वृक्ष लागवड मोहीम यादिवशी हाती घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी श्रीकांत सूर्यवंशी,संतोष सोमवंशी व सुनील नावाडे यांचीही यथोचित भाषणे झाली. नगराध्यक्ष अफसर शेख यांनी प्रास्ताविक केले.

यामध्ये त्यांनी माकणी येथून औसा शहरासाठी पाणीपुरवठा योजनेसाठी 45 कोटींचा निधी मंजूर होता व ही योजना आज कार्यान्वित होत असल्याचे सांगितले. शिवकालीन मराठा भवन, सांस्कृतिक सभागृह नूतनीकरण, किल्ला वेस ते जलाल शाही चौकापर्यंत रस्ता करणे, औसा शहरातील जमाल नगर तलाव परिसरात अमूजमेंट पॉईंट तयार करणे आदी विकास कामाचा शुभारंभ, भूमिपूजन व लोकार्पण आज मान्यवरांच्या हस्ते होत असल्याचे सांगून या प्रत्येक कामाची सविस्तर माहिती त्यांनी दिली.

प्रारंभी कार्यक्रमाच्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यानंतर नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या शिवकालीन मराठा भवन, सभागृह, वाचनालय, सांस्कृतिक सभागृहाचे नूतनीकरण, किल्ला वेस ते जलाल शाही चौकापर्यंत रस्ता करणे व औसा शहरातील जमाल नगर तलाव परिसरात अमूजमेंट पॉइंट तयार करणे या सर्व विकास कामाचा शुभारंभ, भूमिपूजन व लोकार्पण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते तर राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here