‘औरंगनगर’चं नाणं आणि औरंगजेबाचं दिवास्वप्न!
=============================
दक्षिण आणि दख्खन जिंकणं ही उत्तरेतल्या मुघल बादशाहांची खूप पूर्वीपासूनची इच्छा होती. अकबरापासून हे प्रयत्न होत होते. तेच पुढे सुरु ठेवून शहाजहानच्या सैन्याने १६३३ मध्ये दौलताबादचा किल्ला जिंकला. ह्यामुळे निजामशाही (ही हैदराबादची निजामशाही नव्हे. ती नंतरची!) संपल्यातच जमा होती. पण शहाजीराजांनी निजामशाहाच्या वंशातल्या एका मुलाला पेमगिरी येथे गादीवर बसवून त्याच्या नावे कारभार करत निजामशाही वाचवायचा प्रयत्न सुरु ठेवला होता. मोगलांनी काही झालं तरी नर्मदा नदीखाली दक्षिणेत दख्खनमध्ये उतरू नये म्हणून शहाजी राजांनी आटोकाट कष्ट केले. किल्ले बळकट केले. आपले खास लोक आसपासच्या किल्ल्यांवर नेमले. आदिलशहाने मुघलांशी हातमिळवणी करु नसे म्हणून त्यांच्या सरदारांशी आतून गुप्तपणे वाटाघाटी सुरु ठेवल्या. मावळात योग्य लोक हेरून त्यांना जबाबदाऱ्यांची कामंही दिली. पुढील २-३ वर्षात त्रिंबक, संगमनेर, जुन्नर, जीवधन वगैरे किल्ले आणि उदगिर औसापर्यंतचा प्रदेश त्यांनी ताब्यात आणला होता.
१४ जुलै १६३६ रोजी बादशाह शाहजहानने शहाजादा औरंगजेबाला दख्खनचा सुभेदार नेमलं आणि तो उत्तरेकडे निघून गेला. पुढची दख्खन मोहीम आता औरंगजेब चालवणार होता. औरंगजेबाने औरंगाबाद ही राजधानी केली आणि निजामशहाचे – म्हणजे शहाजीराजांचे – जवळपासचे किल्ले आणि मुलूख जिंकायचा सपाटा लावला. त्याच्या सोबत मदतीला आदिलशाही सैन्य होतेच. २८ सप्टेंबर १६३६ रोजी त्याने उदगिरचा किल्ला जिंकला आणि पाठोपाठच १९ ऑक्टोबर १६३६ रोजी औसाचा किल्ला जिंकला. मोगल सेनापती खानजमान आणि विजापुरच्या सैन्याचा सहाय्यक सेनापती रणदुल्लाखान हे शहाजीराजांवर चालून गेले. शहाजीराजे तेव्हा माहुलीवर होते. सोबत तीन-चारशेच लोक होते पण तरीही त्यांनी दोनचार महिने तो किल्ला लढवला. शेवटी आता ह्या दोन्ही सैन्यांपुढे तग धरता येत नाहीये हे ओळखून शेवटी नाईलाजाने त्यांनी सहा किल्ले आणि तो निजामशहाचा वंशज खानजमानच्या हवाली केले आणि रणदुल्लाखानाच्या मध्यस्तीने ते विजापुरास गेले. त्यांची रवानगी कर्नाटकच्या जहागिरीवर झाली.
इथे निजामशाही संपवल्याने औरंगजेबाला अतिशय आनंद झाला. ह्या आनंदाप्रीत्यर्थ त्याने मुल्हेरचे नाव बदलून केले ‘औरंगनगर’ आणि तिथे बादशाह शहाजहानच्या नावे खास नाणी पाडली. ही नाणी अतिशय दुर्मिळ असून सहसा पहायलाही मिळत नाहीत. पण असे एक नाणे सध्या लंडनला ६ ऑक्टोबर रोजी लिलावात विकायला येत आहे. हे सोन्याचे नाणे १०.९४ ग्रॅम वजनाचे असून त्याची अपेक्षित किंमत सुमारे £५०००-£७००० (सुमारे ५-७ लाख रुपये) आहे. त्या नाण्याचा हा कॅटलॉगमधला फोटो.
विचार करून पहा – किती खूष असेल औरंगजेब हे नाणं पाडताना! शहाजीराजांसारखा मुघलांचा कट्टर शत्रू कराराद्वारे कर्नाटकाच्या जहागिरीवर निघून गेला होता. डळमळीत दक्षिणेत आता फक्त आदिलशाही आणि कुतुबशाही शिल्लक राहिली होती. दख्खन मुघलांना जिंकायला मोकळी झाली होती. औरंगजेब ही कामगिरी लवकरच तडीस नेणार होता. पण त्याला बिचाऱ्याला कल्पनाही नव्हती की पुढे त्याच्या ह्या दिवास्वप्नाला सुरुंग लागणार आहे आणि त्याला कारणीभूत ठरणार आहेत शहाजीराजांचे सुपुत्र शिवाजीराजे! वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवून तेही मुघलांना दक्षिणेत यायला अटकाव करणार होते. आणि पुढे तर त्यांनी दक्षिणेतल्या शाह्यांची मुघलांविरूध्द फळीच उभारली.
आणि ह्याचा परिणाम? हाय रे कर्मा- ‘सहज’ जिंकणं अपेक्षित असताना दक्षिणेतली राज्यं जिंकायला १६३६ नंतर औरंगजेबाला थोडीथोडकी नाहीत तर त्याच्या आयुष्याची पुढची ५० वर्ष खर्च करावी लागली. एखाद्याचं नशीब खडतर असतं ते असं!
– संकेत कुलकर्णी (लंडन)