एमयुएचएस सिनेटसाठी डॉ.संचेतींचे नामांकन
वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गौरव
लातूर , ( वृत्तसेवा ) : ऑर्थोपेडिक्स आणि पुनर्वसन क्षेत्रात नावलौकिक कमावलेले ख्यातनाम अस्थिशल्य चिकित्सक डॉ.पराग संचेती यांचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयुएचएस ) सिनेटसाठी नामांकन महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कुलगुरू यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
डॉ.संचेती यांना वैद्यकीय अध्यापनाचा तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेटसाठी त्यांचे नामांकन ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाची पावती आहे.

डॉ.पराग संचेती यांनी १ जानेवारी १९९३ रोजी एसआयओआर पीजी कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कारकीर्द सुरू केली. २०१४ मध्ये संचेती हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक्स आणि रिहॅबिलिटेशन विभागात अधिष्ठाता आणि प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून डॉ.संचेती यांनी आपले प्रभावी नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांची दूरदृष्टी आणि समर्पण यामुळे हॉस्पिटलचा विस्तार आणि यश सातत्याने वाढत आहे.
डॉ.संचेती यांच्या या नामांकनाबद्दल बोलताना लातूर येथील विख्यात अस्थिशल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार म्हणाले की, डॉ.संचेती हे सध्या एशिया पॅसिफिक नी सोसायटीचे महासचिव, इंडियन असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनचे उपाध्यक्ष आणि इंडियन सोसायटी ऑफ हिप अँड नी सर्जरीचे संस्थापक सदस्य अशी प्रतिष्ठेची पदे भूषवित आहेत. अमेरिकेतील इंटरनॅशनल सोसायटी ऑफ आर्थ्रोस्कोपी आणि ऑर्थोपेडिक स्पोर्ट्स मेडिसिनच्या बोर्ड सदस्यत्वाच्या माध्यमातून ते या क्षेत्रात जागतिक पातळीवर योगदान देत आहेत.
प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये डॉ.संचेती यांचे ५० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले असून, त्यांच्या अभ्यासपूर्ण कामांचा वैद्यकीय पाठ्यपुस्तकांमध्ये केलेला समावेश हा त्यांच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. ’क्लिनिकल रिसर्च मेड इझी’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन याप्रती असलेली त्यांची वचनबध्दता दर्शविते.
डॉ.संचेती यांना राष्ट्र सेवा पुरस्कार, मिटकॉन अॅचिव्हर्स अवॉर्ड, अशा नामवंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. अशोक पोद्दार पुढे म्हणाले की, मला गर्व आहे की मी डॉ. पराग संचेती यांचा विद्यार्थी आहे. या नामांकनाबद्दल आपण आपल्या गुरूंचे हार्दिक अभिनंदन करतो असेही डॉ. पोद्दार म्हणाले. डॉ. अशोक पोद्दार यांच्यासह डॉ. दीपक गुगळे यांनीही डॉ. पराग संचेती यांचे अभिनंदन केले आहे.