‘मोबाईल हायपरटेन्शन क्लिनीक’ रुग्णांसाठी आधार ठरेल
डॉ. एन. पी. जमादार;
लातूर, दि. 18 – उच्च रक्तदाब, मधुमेह या आजाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांना ह्दयविकार, अर्धांगवायू, किडनी निकामी होणे अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. मात्र हे टाळायचे असेल तर आजाराचे निदान करुन वेळेत उपचार घेणे गरजेचे आहेत. रक्तदाब आणि मधुमेह या आजारांचे योग्य निदान व उपचार हे ‘मोबाईल हायपरटेन्शन क्लिनीक’ या ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन प्रणालीव्दारे करण्यात येणार आहेत. आजाराचे अचूक निदान करुन तात्काळ उपचार हे या क्लिनीकचे वैशिष्ट्य असणार आहे. त्यामुळे हे क्लिनीक रुग्णांसाठी आधार ठरेल, असा विश्वास एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांनी व्यक्त केला.
येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग आणि रुरल हेल्थ प्रोग्रेस ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात ‘मोबाईल हायपरटेन्शन क्लिनीक’ चे अनावरन अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी विभाग प्रमुख डॉ. मुकूंद भिसे, रुरल हेल्थ प्रोग्रेस ट्रस्टचे संस्थापक – अध्यक्ष डॉ. अरुण मोरे, डॉ. अनंत टाकळकर, डॉ. सुनिल सगरे, डॉ. ज्ञानेश्वर डिगोळे, डॉ. उद्यकुमार भलगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी पुढे बोलताना डॉ. एन. पी. जमादार म्हणाले की, रुरल हेल्थ प्रोग्रेस ट्रस्ट आणि एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयांतर्गचे शहरी आरोग्य रुग्णालय, खाडगाव रोड येथे मोबाईल हायपरटेन्शन क्लिनीक चालविण्यात येणार आहे. या अद्यावत क्लिनिकच्या माध्यमातून रक्तदाब व मधुमेह आजाराच्या रुग्णांचे योग्य निदान करुन उपचार दिले जाणार आहेत. तसेच हा आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचारही या क्लिनीकव्दारे दिले जाणार असल्याचे डॉ. जमादार यांनी सांगीतले.
या वेळी बोलताना डॉ. अरुण मोरे म्हणाले की, रक्तदाब, मधुमेह हे असंसर्गजन्य आजार असून लोकसंख्येच्या 40 टक्के लोकांत हा आजार दिसून येतो. यात ग्रामीण भागातील 30 टक्के तर शहरी भागातील 60 टक्के लोकांचा समावेश आहे. रक्तदाब व मधुमेह या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेवून रुरल हेल्थ प्रोग्रेस ट्रस्टच्या माध्यमातून मोबाईल हायपरटेन्शन क्लिनीक हे ॲप विकसित करण्यात आले आहे. या मोबाई ॲपव्दारे रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात निदान आणि उपचार दिले जाणार आहेत. या ॲपमुळे रक्तदाब व मधुमेह आजार असणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील लोकांना घरबसल्या उपचार मिळणार आहेत.
या वेळी डेन्मार्क येथील लॅनसेट कमीशन ऑन हायपरटेन्शनचे अध्यक्ष डॉ. मायकल ओलसेन यांनी ऑनलाइन पध्दतीने या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. तर आंतरराष्ट्रीय रक्तदाब परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. निल पॉल्टर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमीत्त घेण्यात आलेल्या तपासणी शिबिरात 98 जनांची मोफत रक्तदाब, मधुमेह व ईसीजी तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मुकूंद भिसे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अनंत टाकळकर यांनी तर आभार डॉ. ज्ञानेश्वर डिघोळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. बळीराम सुर्यवंशी, डॉ. अफरिन खानम, डॉ. कालिंदी पाटील, डॉ. शरयु वाळके, सचिव शरद पाडूळे, सामाजिक कार्यकर्ता गणेश कराड, वरिष्ठ लिपीक रामराव कराड, सेवक बालाजी मुंडे, दिगांबर लोंढे यांनी परिश्रम घेतले.
———————————————————-