अलीकडेच म्हणजे ह्या दहा बारा वर्षात मला वारीला जावे असे वाटू लागले होते. पण काहींना काहीं कारणामुळे ते जमले नाही आणि ह्या वर्षी कमीत कमी एक दिवस तरी वारी पाहावी , दहा पावले तरी वारीत चालावे असे ठरवले. आणि हा एक दिवसाचा वारीचा योग घडून आला. आम्ही चार मैत्रिणींनी ठरवले कि एक दिवस वारी अनुभवायची. 21 जूनला वारीचा मुक्काम तरडगाव येथे आहे आणि लातूरचे पडिले कुटुंबीय तिथे वारीतल्या एका दिंडीतल्या वारकऱ्यांना जेवण देतात असे कळले म्हणून आम्ही २० तारखेला निघण्याचे ठरवले.माझ्या मुलांना विश्वास व महेश याना माझा निर्णय कळविला. विश्वासला एका हॉटेलचे रिझर्वेशन करण्यास सांगितले. तो म्हणाला महेशचा एक मित्र फलटणला प्रॅक्टिस करतो.त्याला विचारून मग
रिझर्वेशन करू.महेश ने त्याच्या मित्राला म्हणजे डॉ.प्रसाद जोशी (ऑर्थोपेडिक Sugeon ) यांना फोन करून सांगितले. आणि त्या प्रसाद जोशी यांनी इतकी उत्तम व्यवस्था केली कि मला असं वाटतंय कि प्रत्यक्ष पांडुरंगच आपल्या मदतीला आलाय कि काय ?
हाँटेलच्या रिझर्वेशनापासून ते पालखीच्या दर्शना पर्यंत व रिंगणाचा सोहळा व्यवस्थित बघता येईल अश्या जागेचा उत्तम बंदोबस्त त्यांनी केला. खरंच त्यांना मनापासून आशिर्वाद!
दुपारी लातूरहून निघून रात्री हॉटेलमध्ये मुक्काम केला . सकाळी ७ वाजता कॉन्स्टेबल अडसूळ ज्याला डॉक्टर प्रसाद जोशींनी पाठवले होते त्यांच्या बरोबर आम्ही लिंब चांदोबा मंदिर तरड गाव येथे पोहचलो रस्त्यात सातत्याने वारकरी चालत होते त्यात थोडा सुद्धा खंड नव्हता . क्षणभर असं वाटलं कि हे जग म्हणजे विठ्ठलच आहे आणि दुसरं काहीच नाही. मन आपोआप समाधानाने भरून येत होत व हृदय – ज्ञानोबा-तुकाराम ह्यांच्या लयीत धडधडत होतं .
पोलीस – Security सगळे अडथळे पार करून कॉन्स्टेबल अडसूळनि आम्हाला डॉक्टर जोशींच्या सूचनेप्रमाणे डॉक्टर श्री व सौ.काकडे यांच्या आयुर्वेदिक हॉस्पिटल मधील एका रूम मध्ये आमची व्यवस्था केली व त्यांनी आमचा निरोप घेतला .आम्ही खूप आग्रह केला पण त्यांनी मोबदला घेण्यास नकार दिला .
पांडुरंगाची सेवा म्हणून मी केलेली हि सेवा आहे असे त्यांनी आम्हाला स्पष्टीकरण दिल .त्या रूम मध्ये अर्धा तास आराम केला .लिंब चांदोबाचं मंदिर हॉस्पिटलला लागूनच होत तिथं उभं रिंगण होत व पाळखीपण दुपारी ३ ला येणार होती मग आम्ही ठरवलं कि आता आपण वारी बरोबर होईल तेवढं चालायचं .सगळं सामान गाडीत टाकून आम्ही गेटच्या बाहेर आलो आणि एका दिंडी बरोबर चालण्यास सुरवात केली वयामुळे शारीरिक क्षमतेवर बंधन आले आहे पण मनातील वारीच्या सोहळ्याचा आनंद अनुभवायची उर्मी गप्प बसू देत नव्हती.
तरुण वयात आपण फक्त हॉस्पिटलला वेळ दिला याचा पश्चlताप करण्याची वेळ आली पण आता फक्त एक दिवसचीच वारी शक्य आहे हे मनाला समजावून मी चालण्यास आरंभ केला .
गेली २८ युगे विटेवर उभा राहून भक्तांना आपली दिव्या शोभा दाखविणाऱ्या पंढरीच्या रायापुढे नतमस्तक होऊन त्याच्या नावाचा गजर करीत वारकरी , दिंड्या चालत होत्या .रस्ता दिसतच नव्हता फक्त वारकरी – त्यांच्यामध्ये दिसणारा पांडुरंग व हरी नामाचा गजर एवढंच जग !
मनतृप्त भावनेनं भारलेलं होतं. दुसरं काहीच नको. ही वाटचाल अशीच अनंतापर्यंत चालत राहावी असं मनाला पुन्हा पुन्हा वाटत होतं.
पालखी सोहळ्या मध्ये काही लाखांचा समुदाय पंढरीच्या दिशेने वाटचाल करतो त्या वेळी एक मोठं गावच चालत आहे असा भास होतो प्रत्येक दिंडी म्हणजे एक कुटुंबच असते. भजन , माउली नामाचे एकत्रित संकीर्तन, एकत्रित भोजन ,थोड्या गप्पा ,थोडे खेळ अश्या खेळी मेळीच्या वातावरणात वारी पुढे सरकत होती .
गेली ८०० वर्षे ही वारी सुरु आहे . या ८०० वर्षात किती तरी उलथापालथ झाली पंढरपूरचे स्वरूप बदलले ,चंद्र भागेचें पात्र बदलले, भक्तांचे वेष बदलले ,मात्र कष्टकरी, कामकरी , शेतकरी , यांच्या श्रुद्धेचा हा सोहळा सुरूच आहे .वारीत काही हौशे- नवशे घुसले .आमच्या सारखे एक दिवसाचे वारी करणारे फॅशनेबल आले . वृत्तवाहिन्यांनी वारी “लाइव्ह” केली मात्र सर्व सामान्य भक्तांची भावना आजहि तशीच आहे.
” जेंव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर “
याच भावनेने वारकरी तुळस ,टाळ मृदूंग आणि मुखाने विठ्ठल नाम घेत चालतो आहे .त्याला विठ्ठला विषयी वाटणार प्रेम , माया , ममता तशीच आहे आणि ह्या माऊलीच्या कृपेच्या छत्राखाली तो निवांत आहे .
देवा, त्याची ही अढळ श्रद्धा त्याला निर्भय वाटचाल करण्याचं सामर्थ्या देते . ती तशीच राहू दे . ही तुझ्या चरणी प्रार्थना.
एकीकडे पाय चालत होते , मुखाने हरी नामाचा गजर चालूच होता किती अंतर चालतो आहोत हे कळत नव्हतं .नामस्मरणाचा गजर पायांना मुक्त ,मुबलक ऊर्जा देतो , उत्साह अंगात संचारतो असं वाटतं “ज्ञानोबा माउली तुकाराम “हे वारीत आहेत.दिंडीला ज्ञानोबा तुकारामाची एक लय असते ती मनाला उल्हासित करते पुढे पुढे नेते .आसपासचा परिसर तुमचा होतो तुमचं वेगळं अस्तित्व राहत नाही .टाळेच्या आवाजातील लय पायात खेळते . समूहाचा एकत्र आवाज मनाला हुरूप देतो . चैतन्याचा विशाल प्रवाह सतत पुढे पुढे जात असतो . मी , माझ्या मैत्रिणी फुगड्या पण खेळलो , फुगडीतले फेर , रटाळ , संसारिक आवर्तनातून बाहेर काढतात , फुगडीतले फेर सुख दुःखे विसरायला लावतात . या साऱ्यातून माणूस स्वाभाविक होतो , सहज होतो . कृत्रिम काही राहत नाही . कृत्रिम व्यवहारापासून आपण परावृत्त होतो . निसर्गाच्या जवळ जातो . माउलीने आपला हात धरलाय म्हणून आपण बिनधास्त होतो .
थोड्या अंतरावर कांही वारकरी फुगडी खेळात होते , गळ्यात तुळशीची माळ ,जी विठ्ठलाचं सद् -भान देते कपाळावरचा बुक्का जो समतेची ग्वाही देतो , गोपी चंदनाच्या वारकरी मुद्रा ज्या बंधुत्वाची वृत्ती निर्माण करतात .
त्यातलाच एक तरुण मुलगा माझ्या जवळ आला माउली म्हणत त्यांनी माझा हात धरून मला नमस्कार केला व माझ्या बरोबर फुगडीचे कांही फेर धरले . क्षणभर वाटले हा पांडुरंग तर नसेल ?
पण पुन्हा मनात आलं आपलं कुठं येवढ पुण्य ?
भानावर आल्यावर कळलं कि आपण पाच किलो मीटर अंतर पार केलय मग मात्र माघारी वळलो .
आयुर्वेदिक डॉक्टर काकडे यांचं हॉस्पिटल गाठलं.जेवण केलं आराम केला व तीन वाजता चौथ्या मजल्यावरच्या गच्चीवर गेलो उभं रिंगण बघायला .
तळपणारा सूर्य रंगलेले रिंगण आणि माऊलीचा पालखी सोहळा बघून मनाचे आणि डोळ्याचे सार्थक झाले .
खांदयावर भगव्या पताका , टाळ , मृदूंगाचा गजर , ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष , रांगोळ्यांचा पाय घड्या अशा भक्तिमय वातावरणात माऊलीच्या अश्वाने मारलेली नेत्रदीपक दौड पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं . आग ओकणारा सूर्य अन देहभान हरपून नाचणाऱ्या वैष्णवांच्या साक्षीने चांदोबाच्या लिंबा जवळील उभे रिंगण रंगले .
अर्ध्या तासातच परतीचा मार्ग मोकळा झाला व आम्ही लातूरला परत निघालो .
वारीची परंपरा आजही सुदृढ आहे . आज तर याची फार गरज आहे. मोबाईल संस्कृतीमुळे वरवर बोलून समाज शुष्क आणि हॉटेली बनला आहे .नाटकी बोलणे , कृत्रिम वागणे आणि देखल्या देवाला तात्पुरता दंडवत घालणे , यात आजचा इ-मॅन पुरता गुरफटलाय .अशा वेळी मनातलं हितगुज मोकळेपणाने सांगायला माउलीशिवाय कोण आहे ?
माणुसकीच्या अपहरणा ने माणूसच कावरा -बावरा झालाय .कुठेही पाय टाका सर्वत्र चिखल झाला आहे.अशा वातावरणात माउलींच्या नामाचा गजर मनाला आश्वस्त करतो माणसाला नवे बळ देतो .पुन्हा नवे सामर्थ्य देतो .देहाची इंद्रायणी शुद्ध होते . हात आपोआप जुळतात ,नि गातात
” तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा “
लेखिका
डॉ .माया कुलकर्णी
( लेखिका या लातूरातील सुप्रसिद्ध स्रीरोग तज्ज्ञ व ममता हाँस्पिटलच्या संचालिका आहेत. )