28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमनोरंजनएक अविस्मरणीय चित्रपट:पांघरूण

एक अविस्मरणीय चित्रपट:पांघरूण

सिनेमा सिनेमा

‘अभिजात’ ने आयोजित केलेला पांघरूण चित्रपट शनिवारी हुकला. आवर्जून रविवारी रात्री पाहिला. चित्रपट पाहिला नसता तर एका उत्कृष्ट चित्रपटाला मुकलो असतो याची जाणीव झाली. मराठी चित्रपट वेगवेगळ्या विषयांना हात घालून चित्रपट सृष्टीला समृद्ध करतोय याचा एक सुंदर अनुभव या योगाने आला.

मनाच्या विविध पातळीवरील गुंतागुंतीचे कंगोरे सहज सुलभ पद्धतीने उत्कृष्टपणे गुंफून अत्यंत सशक्त कथानक आणि अभिनयाने प्रेक्षकांपर्यंत गहन आशय पोचवण्यासाठी पांघरूण हा चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला आहे. अंतू पंचक्रोशी मध्ये एक विद्वान प्रज्ञावंत म्हणून प्रसिद्ध. अध्यात्मिक जाणिवेतून कीर्तनकार आणि भजनकार. अंतूच्या पत्नीच्या अकाली निधनाने त्याच्या लहान अपत्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुनर्विवाह करण्याची गळ घालणारा समाज. स्वर्गीय पत्नी बद्दल एकनिष्ठ राहण्याची मानसिकता, ओथंबून भरलेल्या भूतकालीन भावनांची ओढ आणि लहान मुलींच्या भरण पोषणाची चिंता याच्या घालमेलीतून पुनर्विवाह करण्याचा घेतलेला निर्णय. १४ व्या वर्षीच पतीच्या अकाली निधनाने विधवा झालेल्या लक्ष्मीचं स्थळ सांगून येतं. घोड्यावरून रपेट मारत ऐटीत जाणाऱ्या रिचर्ड नामक इंग्रज अधिकाऱ्यावर लक्ष्मीचे एकतर्फी प्रेम. रिचर्डचाही पत्नी आणि दोन अपत्त्यांचा संसार. रिचर्ड सोबत हे सारं अशक्य असल्याची वडिलांची लक्ष्मीला समजावणी. अंतू आणि लक्ष्मीचा विवाह पार पडतो. लक्ष्मीचा अंतूच्यासोबत झालेला पुनर्विवाह. नंतरची पत्नी म्हणजे केवळ तिचं भरण-पोषण आणि आपल्या मुलींची भविष्याची सोय झाली इतक्या संकुचित विचाराने अंतूचं लक्ष्मीकडे असणारे लक्ष. तरुणपणीच्या यौवन सुलभ असणाऱ्या शारीरिक गरजाकडे अंतूचं संपूर्ण दुर्लक्ष. आपल्या दोन मुलीसोबतच दररोज झोपण्याची लक्ष्मीला सक्ती.

गायनामध्ये अंतूचा शिष्य म्हणून कार्यरत असणारा माधव. माधवचं लक्ष्मीप्रती असणारं वासनांध आकर्षण. लक्ष्मीच्या मनाची घालमेल, परंतु तरीही संस्कारित मूल्यांच्या घरात वावरल्यामुळे लक्ष्मीचा माधवला कायम नकार. असे करणे चुकीचे आहे हे वारंवार माधवला सांगणारी लक्ष्मी. तरीही चोरट्या स्पर्शाला आसुसलेला माधव. अंतूचं माधवला घरचा सदस्य समजणं. त्यामुळे माधववर असणारा प्रगाढ विश्वास. पहिल्या दिवाळ सणाला स्वतः न जाता, अंतू माधवला लक्ष्मी आणि दोन मुलींच्या सोबत पाठवण्याचा निर्णय अमलांत आणतो. प्रवासादरम्यान माधवचा लक्ष्मीशी लगट साधण्याचा प्रयत्न. लक्ष्मीचं माधवला दूर करणं आणि परत हे चुकीचं आहे असं सांगणं.

अधूनमधून लक्ष्मीचं अंतूला दुरावा नाहीसं करण्याचं व्यर्थ सुतोवाच. काही दिवसानंतर अंतुला शेजारच्या गावांमध्ये कीर्तन करण्यासाठीचं बोलावणं. दहा दिवसांचा प्रवास. लक्ष्मी आणि मुलीकडे लक्ष देण्यासाठी शिष्य माधवने दहा दिवस घरीच येवून रहावं असा अंतुचा माधवला आग्रह. दरम्यानच्या काळात अंतूचही लक्ष्मीकडे वाढत जाणारं शारीरिक आकर्षण. बाहेर गावचं किर्तन संपूर्ण झाल्यानंतर परत संसाराला लागण्याची अंतूची मनीषा. लक्ष्मीला अंतूच्या मनातील भावनांचा लवलेशही नसतो. कारण अंतूनं हे उघडच केलेलं नसतं. अंतू प्रवासाला निघाल्यानंतर लक्ष्मीची त्याला सोबत घेऊन जाण्याची विनंती. अंतूचा नकार. लक्ष्मीचं अंतूला मागणं की, आपण कमीत कमी माधवला तरी सोबत घेऊन जावं. पण त्यालाही अंतूचा ठाम नकार.

अंतू कीर्तनाच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाल्यानंतर माधवचं अंतूच्या घरी भर पावसात वास्तव्यास येणं. माधवला लक्ष्मी आवडत असल्यामुळे त्याचा परत लक्ष्मीसोबत शरीरसुखासाठी आटापिटा. सोबत पावसाने निर्माण केलेली अनुकूल परिस्थिती. लक्ष्मीचं पुन्हा माधवला सांगणं की हे चुकीचं आहे.

तिकडे अंतूचा प्रवास थोड्या मार्गाचा झाल्यानंतर प्रचंड पाऊस येणं, त्यानंतर गाडीवानाने आणि बाहेरच्या गावच्या माणसाने त्यांना अशा पावसात न जाता उद्या सकाळी निघण्याची विनवणी करणे आणि पुन्हा घरी येण्यासाठी व वैवाहिक जिवनाची सुरुवात करण्यासाठी अंतूचं घराकडे माघारी फिरणं. त्या पावसाळी रात्री माधव आणि लक्ष्मी एका निसरड्या क्षणी भान हरपून एकत्र येतात आणि त्याच रात्री अंतू लक्ष्मीला मिलनोन्मेषाचा आनंद देण्यासाठी घरी परत येतो. घरी लक्ष्मी-माधव मिठीत एकांतात निपचित पडलेले पाहतो. हे दृश्य पाहून अंतूचा क्षणिक प्रचंड संताप. परंतु प्रज्ञावन्तास अध्यात्मिक अधिष्ठान असल्यामुळे शांततेने सगळ्या गोष्टींचा स्वीकार आणि गावकऱ्यांनी मायेने सत्कारात दिलेली शाल जी आठवणीने लक्ष्मीने प्रवासात दिलेली होती, ती लक्ष्मी माधव यांच्या शरीरावर टाकतो तेच हे पांघरूण.

यौवन सुलभ मानसिक आणि शारीरिक गरजांची भूक भागवण्यामध्ये आपण असमर्थ ठरलो अशी भावना अंतूच्या मनामध्ये नंतर निर्माण होते आणि आपणही या चुका करून आपल्या चुकांवरही घातलेलं पांघरूण आहे असं त्याला वाटतं.

तिकडे लक्ष्मी घाबरून गेलेली. कारण पतीने परपुरुषासोबत सर्व दृश्य पाहिलेलं आहे. मूल्य आणि संस्कारात वाढलेली असल्यामुळे लक्ष्मीला होणारा प्रचंड आत्मक्लेश. त्यामुळे आपण ही अक्षम्य चूक केलीय असं माधवला सांगुन शेवटी माधवला एक चापट मारून घरातून निघून जाण्याचा लक्ष्मीचं फर्मान.

अंतूचं लक्ष्मीला घरांमध्ये जणू काही घडलेच नाही अशी वागणूक देणं लक्ष्मीला प्रचंड बुचकळ्यात टाकणारं. शेवटी लक्ष्मी अंतूला म्हणते, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. अंतू म्हणतो रात्री किर्तनावरुन आल्यानंतर आपण बोलू या विषयावर. किर्तन चालू असतानाच अंतूच्या छातीत दुखणं. पण तरीदेखील किर्तनाला जाताना लक्ष्मीला आज रात्री आल्यानंतर जेवणामध्ये बासुंदी कर असं सांगून तिच्या सोबत रात्री जेवताना भूतकाळातील वागण्यात माझी चूक होती आणि आता तू माधव सोबत लग्न कर असा आग्रह. इतक्यात दरवाज्याची कडी वाजवल्याचा आवाज आणि गावाच्या खोताचे लक्ष्मीला येऊन सांगणं की अंतुला छातीमध्ये दुखत होतं आणि त्यामुळे अंतू हयात नाहीत.

खोत यांच्या कडे अंतूने प्रदर्शित केलेली अंतिम इच्छा की, माझ्या मरणानंतर माधव आणि लक्ष्मीचं लग्न लावून द्या. दहा दिवस खोत माधवला शोधतात आणि घेऊन येतात आणि राधाक्काला सांगतात की लक्ष्मीचं लग्न करायचंय. राधाक्का म्हणतात लक्ष्मीला विचारा. राधाक्का मुलींना आईला बोलवायला पाठवतात. लक्ष्मी येते. सगळं केशवपन केलेल्या अन् विधवांचे कपडे परिधान केलेल्याअवस्थेमध्ये. अनावधानाने घडलेल्या चुकीचे आयुष्यभर प्रायश्चित करण्याच्या निश्चयाने. इकडे माधव आपल्या अपेक्षा घेऊन घरामध्ये उंबरठ्यावर उभा आहे आणि इथंच सिनेमाचा शेवट होतो.

खरंच हे अंतूनी सहजसुलभ शारीरिक भावनांच्या कडे केलेलं दुर्लक्ष आणि त्यावर घातलेलं पांघरूण….

की लक्ष्मी आणि माधव या दोघांनी जे काही चुकीचं केलं त्यावर घातलेले पांघरूण…

की केवळ आपल्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलींच्या भरण-पोषण यासाठी केलेले लग्न आणि बाकी इतर पत्नी म्हणून तिला वागणूक देण्यास असमर्थ ठरलेल्या बाबीवर घातलेलं पांघरूण…

की अंतूसारख्या अध्यात्मिक ख्यातकीर्त व अधिष्ठान प्राप्त कीर्तनकाराने ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण आहे कोरडे पाषाण’ अशा पद्धतीच्या वर्तणुकीतून आपल्याच पत्नीला पोषणा व्यतिरिक्त काही बाबींची गरज असते याकडे केलेल्या दुर्लक्षावर घातलेलं पांघरूण…

की शारीरिक सुखाची नैसर्गिक गरज असताना देखील समाजानं अशा बाबींना मज्जाव करण्यासाठीचे घातलेलं पांघरूण…

की एकंदरच मानवी स्वभावातील विविध प्रतलावरील वेगवेगळ्या परिघांच्या कवचावर आपण वेगवेगळ्या वेळी घातलेलं वेगवेगळं पांघरूण…

की अशा अनेक घटनांच्या वेगवेगळ्या थरांमध्ये घुसमटलेला समाज आणि या समाजाच्या सामुहिक वृत्तीवर समाज घालीत असलेलं पांघरूण….

आपणच आपल्या मनातील आतील अंधारात वाकून पाहून, स्वतःला विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारा आणि चित्रपट पाहून बाहेर निघत असताना आपल्याच मनाच्या कोशांमध्ये आपल्यालाच पांघरूण घेऊन विचार करायला प्रवृत्त करणारा एक सहज सुंदर आणि सुंदर चित्रपट म्हणजे पांघरुण.

चित्रपटगृहातून बाहेर निघाल्यानंतर प्रत्येक प्रेक्षक रसिक हा निःशब्द होऊन बाहेर पडतो यातच या चित्रपटाचे यश सामावलेले आहे.

कोकणातील निसर्गरम्य परिसरातील विलोभनिय चित्रण, कर्ण मधूर संगीत, आशयघनाने ओतप्रोत सुश्राव्य गीतरचना, विलक्षण शब्दरचनायुक्त संवाद, हळूवार पण पकड सैल न होऊ देणारी दृश्यश्रंखला आणि सर्व कलाकारांनी केलेला सशक्त अभिनय चित्रपटाला सर्वांगीण उंची देऊन मनःपटलावर कायमस्वरूपी ठसा उमटवण्यात यशस्वी ठरतो.

खंत एकच. मराठी भाषेबद्दल मराठी माणसाचं असलेलं बेगडी प्रेम प्रतीत करणारा रविवारी सुटीच्या दिवशी रात्री ८.०० वाजताच्या चित्रपटाला एकूण १८ प्रेक्षकांचा (प्रचंड) प्रतिसाद. त्यात १० वर्षाखालील आशय न समजण्याजोगा ०६ मूलांचा समावेश. म्हणजे डझनभर उपस्थिती विचार करायला लावणारी. असो.

एका अविस्मरणीय चित्रपटाच्या आयोजनाबद्दल अभिजात समूहाचे अभिनंदन.

प्रा. नंदू कुलकर्णी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]