माणसे जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो,
हे सिद्ध करणारा एक अवलिया
- धनंजय देशपांडे
पुणे
गाणं आणि खाणं ही माणसाच्या आनंदाची तीर्थस्थानं आहेत. त्यामुळेच गाण्यातले दर्दी जसे सवाई गंधर्वच्या प्रेमात तसेच खाण्यातले दर्दी नेहमीच श्री विष्णू मनोहर या जगप्रसिद्ध अशा शेफच्या प्रेमात. या भन्नाट अवलियाची एकदा माझ्याच कार्यक्रमात औपचारिक ओळख करून देताना त्यांचा उल्लेख मी “हवाई गंधर्व” असा केला होता. त्याचे कारण म्हणजे हा अवलिया सकाळी नागपुरात असतो तर दुपारी मुंबईत अन रात्री उशिरा दिल्लीत असतो. सतत पायाला भिंगरी लावल्यासारखं भ्रमण विमानातून करतात त्यामुळे ते “हवाई” गंधर्व !
फेसबुकने जी काही धमाल माणसे मला मिळवून दिली त्यात हे एक. सुरुवातीला एकमेकांच्या पोस्ट पाहणे, कॉमेंट करणे इतपतच सगळं होत. अन अचानक एकेदिवशी त्यांनी मेसेंजरमधून फोन नम्बर मागून घेऊन थेट फोन केला,
“यार डीडी, आप से मिलने को जी करता है, पूना मे हू, आ जाव रात को”
अन मी त्याप्रमाणे त्यांच्या म्हात्रे पुलाजवळील विष्णूजी की रसोई मध्ये पोचलो. अन पुढचे तीन तास जणू मंतरलेले गेले. तसे त्यांच्या सोबतचे सगळेच क्षण, मैफिली या मंतरलेल्याच असतात.
असेच हळूहळू मैत्र आमच्यात वाढत गेले. त्यांच्या अनेक पुस्तकाची कव्हर्स करण्याची संधी मिळाली. दरवेळी त्यांच्याकडून बिजिनेसमधलं नवीन काहीतरी शिकायला मिळायच. असेच एकदा सहज बोलता बोलता फोनवर बोलले की,
“लवकरच आपण पुण्यातील विष्णूजी कि रसोई मधेच एक नवीन सेक्शन सुरु करतोय. पूर्ण शाकाहारी असे “रोटी शॉटी कबाब” सुरु करतोय”
मीच दचकलो ! कारण कबाब / तंदूर हे सगळे आयटेम नॉनव्हेज साठी फेमस ! आणि विष्णूजी तर प्रवाह उलटा फिरवू पाहत आहेत ! मी तसे बोलून दाखवले तर एकच वाक्य बोलले ते….
म्हणाले, “क्या है डीडी, मुझे ऐसीही आदत है, कुछ अलग करने की, तो क्या करू?”
यावर मी तर काय बोलणार ? कारण त्याची इच्छाशक्ती नेहमी मी जवळून पाहिलेली आहे !
आणि मग ते एकदम म्हणाले, “तो डीडी, काम शुरु करो, इसकी अंदर कि सजावट आप को करनी है”
आता पुन्हा मी चकित ! कारण आजवर त्यांच्या पुस्तकाची कव्हर्स केली होती पण मनात कुठेतरी इच्छा होतीच कि त्यांच्या हॉटेलचे असे काहीतरी काम आपल्याला करायाला मिळावे ! आणि बाप्पाने थेट तीच इच्छा पूर्ण केली !
विष्णूजीनि एकच सांगितले कि, “मी जसे इथे पदार्थ एकदम हटके करतोय, तसेच तुम्ही इंटेरियरला पण हटके काहीतरी करा”
आणि मग ते आव्हान समजून जवळपास महिनाभर एकूणच “कबाब / तंदूर” त्याचा अगदी आदिम इतिहास शोधला आणि मग त्यावरून गौरव व्दिवेदी (तिथले मेन बॉस) यांच्या मदतीने वेगळेच इंटेरियर सजले !
आणि मग हे “रोटी शॉटी कबाब” खवय्यांच्या सेवेत रुजू झाले !
*
असाच एक रविवार. सुट्टी, अचानक फोन वाजला. थोडा दचकलो. इतक्या रात्री अकरा वाजता कुणाला आठवण झाली बुआ?
तर तोवर पलीकडून आवाज आला,
“हॅलो डीडी, मै विष्णू बोल रहा हूं कॅलिफोर्नियासे !”
एकदम झोप उडाली. अन एकदम ट्यूब पेटली की, ते सध्या अमेरिकेत त्यांच्या नवीन ब्रँच सेट करण्यात दंग आहेत. तिकडे यावेळी दिवस असतो.
तर ते तिथल्या स्थानिक एफ एम वर लाईव्ह होते. अन मी ऑनलाईन पाहून त्यांनी तिथल्या स्टुडिओतून फोन लावलेला. फरमाईश ऑन फोन, असे त्या कार्यक्रमाचे स्वरूप होते. स्थानिक आर जे श्री वरिंदरजित उभी व श्री विष्णू मिळून रसिकांशी संवाद साधत होते अन त्यात त्यांनी मला कॉल केला होता. अन संवाद सुरु झाला.
“हाय, विष्णूजी. कैसे हो, और कैसे याद किया ?”
“डीडी, मै कॅलिफोर्निया एफ एम से बात कर रहा हू. मै मजे मे हू. लो बात किजीये वरिंदरजी से”
असं म्हणून मग त्या आर जे शी थोडं बोललो शेवटी त्यांनी विचारलं,
“आप कि फरमाईश बताव, तो हम भी आपका दिल खुश कर सके”
मग मी त्यांना माझ्या आवडीचे “मोह मोह के धागे” गाणे सुचवले. त्यांनीही ते तत्परतेने लावले. गाणं संपलं. छान तंद्री लागली. एका छान दिवसाची सुंदर समाप्ती झाली.
एकदा पुण्यात “श्यामरंग” हा गाण्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. विष्णूजी गाण्याचे प्रचंड दर्दी व स्वतःही गायन कलेत पारंगत. तर “श्यामरंग” साठी ते येणार, हे मी मनाशी गृहीत धरलं होत. मात्र त्यांचा निरोप आला कि, खूप आधीच त्यांनी ती डेट दिल्लीच्या एका कार्यक्रमासाठी दिलीय. त्यामुळे आमचा नाईलाज झाला.
आणि काय आश्चर्य, एक दिवस आधी त्यांचा फोन आला व म्हणाले, “डीडी, मी तुझ्या शो ला येतोय” (त्यांनी त्यासाठी काय काय जुगाड केले, हे नंतर मला त्यांचे सहायक श्री गौरव यांच्याकडून कळले)
हे ऐकल्यावर मीही नकळत आनंदाने गहिवरलो.
कुणीतरी एकजण मला विचारत होते कि, असाच कार्यक्रम आमच्या नागपुरात पण करता येईल का ?
त्यांना मी उत्तर देण्याआधीच स्टेजवरून विष्णूजींनी उत्तर दिल,
“हे डीडी आहेत, ठरवलं तर चंद्रावर पण कार्यक्रम सादर करतील”
यातच सगळं आलं.
*
भल्या पहाटे असाच एकदा कॉल आलेला, “डीडी, अमेरिका मे जो हॉटेल हम शुरु कर रहे है, उसका मेनूकार्ड डिझाईन आप को करना है. काम को लग जाओ”
(काम करणार का, होईल का? असले फॉर्मल प्रश्न त्यांना कधीच पडत नाहीत. नागपुरी स्टाईलने थेट मोकळा ढाकळा आदेश देऊन मोकळे !)
माणसं जिंकावीत कशी अन जिंकलेली जोडून कायम ठेवावीत कशी? हे त्यांच्याकडून खरेच शिकण्यासारखं आहे. मैत्री सांभाळताना त्यात व्यवहार देखील जपला तर मैत्री दीर्घकाळ टिकते. हेही त्यांनी नकळत शिकवलं.
*
आज हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे, माझ्या मित्र खजिन्यातील अनेक हिरे माणकांचा परिचय मी त्यांच्या वाढदिनी करून देत असतो. त्या मालिकेतले हे आजचे पुष्प विष्णूजी याना अर्पण ! तुम्हाला कधी निराशा आली असेल, संकटातून बाहेर कसे पडावे कळत नसेल तर वेळ काढून यांची भेट घ्या. नक्की रिचार्ज व्हाल हे खात्रीने सांगतो.
और
विष्णू जी
आप को अलग से क्या बधाई दु ?
मै बहोत छोटा आदमी !!
लेकिन फिरभी ये तोफा कुबुल करो जहाँपनाह !!
@ dd
(पोस्टमधील फोटो तिथलाच आहे, जिथलं इंटेरियर मी केलेलं)