24 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसांस्कृतिक*एका विचारवंताची अपरिचित गोष्ट!!*

*एका विचारवंताची अपरिचित गोष्ट!!*

रजनीश जोशी

विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे समग्र दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणारा बराचसा सुविहित प्रयोग परवा सोलापुरात पाहिला. कलाक्षेत्राची उत्तम जाण असणारे आणि विचक्षण बुद्धिमत्तेचे सनदी अधिकारी (निवृत्त) अजय अंबेकर यांनी या प्रयोगाचे लेखन, दिग्दर्शन आणि विविध भूमिका साकारल्या आहेत. मूळात नरहर कुरूंदकर यांच्यासारख्या प्रज्ञावंताबाबत रंगमंचीय आविष्काराची कल्पना अभिनव आहे, आणि त्याचे सादरीकरण कौतुकास्पदच आहे. अभिवाचन आणि आविष्कार अशा दोन स्तरावर ते होते, हेही त्याचे वेगळेपण म्हणता येईल.

नव्या पिढीची मानसिकता, फेसबुक आणि अन्य तत्सम समाजमाध्यमांचा प्रभावाच्या काळात एक लेखिका नरहर कुरुंदकरांचे विचार आणि व्यक्तिमत्वावर संहिता लेखन करीत आहे, ते करताना स्वतःशी आणि प्रेक्षक-श्रोत्यांशी संवाद साधते आहे, असा प्लॉट घेऊन संहितेची बांधणी करण्यात आली आहे. ही कल्पनादेखील वेधक आहे. मात्र, संहितेमध्ये कुरुंदकरांचे व्यक्तिगत जीवनातील आचार, विचार आणि व्यवहार त्यांच्या नास्तिक या सार्वजनिक भूमिकेशी बऱ्याचदा सुसंगत नाहीत, असे प्रसंग नाहक उठावदार करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ – आईच्या समाधानासाठी केलेले कर्मकांड वगैरे. ”आईच्या प्रेमापोटी पोखरणी येथे अभिषेक केला, नृसिंहाला शब्द तू दिला, पूर्ण मी केला. तुमच्याकरिता हे करतो. जगात देव नाही, पण धार्मिक लोकांच्या भावना दुखवू नयेत, असे वाटते,” मुलीचा पारंपरिक विधीनुसार झालेला विवाह किंवा मुलाची मुंज हे वगळले असते तरी चालले असते किंवा संहिताकाराने ‘आईसाठी त्यांनी तडजोड केली’ अशी समर्थनाची भूमिका घेतली नसती, त्याबाबतची प्रेक्षक-श्रोत्यांनाच निर्णय घेऊ दिला असता तर अधिक नेमके झाले असते. एकीकडे त्यांच्या जडवादी विचारांची जोपासना लहानपणापासून होत गेल्याचे दाखवले आहे, दुसरीकडे ही तडजोड. गुरुजी नास्तिक, जडवादी, मार्क्सवादी की धर्मवादी?; वर्णव्यवस्था ईश्वरप्रणीत आणि गुरूजी नास्तिक अशी संदिग्धता टाळता आली असती तर बरं झालं असतं. ‘व्यवहारात तडजोड करतो, विचारात नाही’ अशा आशयाचे विधान त्या अनुषंगाने आले आहे. (ज्यांना कुरुंदकर काहीच माहीत नाहीत, अशी नव्या पिढीसाठी हा तपशील महत्त्वाचा आहे. कुरुंदकरांचे विचार ज्ञात असणाऱ्या अभ्यासकांना वेगळे सांगावे लागत नाही. आपला प्रयोग नव्या पिढीला कुरूंदकर समजावेत यासाठी आहे, असे मला वाटते.)

कुरूंदकरांचे आणीबाणीच्या काळातील वर्तन, मराठवाडा विद्यापीठ नामांतराची भूमिका, काळानुरूप बदलत जाणारे महात्मा गांधी, सर्वधर्म विलिन करा असे म्हणणारे सावरकर, राजकारण हा अध्यात्माचेच साधन मानणारे स्वामी रामानंद तीर्थ, डॉ. आंबेडकरांचा बौद्धधर्म स्वीकारण्याचा निर्णय, गो ब्राह्मणप्रतिपालक अशी बिरुदावली मिरवणारे छत्रपती शिवाजी महाराज (श्रीमान योगीची प्रस्तावना उद्बोधक आहे), हैदराबाद येथील तुरूंगवास हे सारे मुद्दे नाट्यपूर्ण आहेत. गुरूजींच्या व्यक्तिगत आयुष्यातील घटना-प्रसंग कमी करून या मुद्द्यांची चर्चा घडली असती तर संहितेची उंची आहे त्यापेक्षा आणखी वाढली असती.

भूमिका आणि कलावंतांबद्दल थोडेसे
कुरुंदकर गुरूजींची भूमिका करणारे दिलीप पाध्ये, गुरुजींची पत्नी आणि आईची भूमिका करणाऱ्या ज्योती पाध्ये, विविध भूमिका साकारणारे राजू किवळेकर, अजय अंबेकर आणि ज्योतीताईंनी आपापल्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला हे खरे आहे. मात्र, कुरुंदकर गुरूजींचा कणखरपणा आवाजातून व्यक्त करताना दिलीप पाध्ये यांनी गुरूजी आणि आई, गुरूजी आणि पत्नी, गुरूजी आणि मित्र, गुरूजी आणि पत्रकार अशा संवादांमध्ये आवाजाचा पोत वेगवेगळा वापरला तर त्यांची भूमिका आणखी चांगली होऊ शकेल. कारण या सगळ्या काळात गुरूजींचे वय वेगवेगळे आहे, मनोवस्था निरनिराळी आहे. आणि प्रत्येकाशी त्यांचे नाते वेगळे आहे.
राजू किवळेकर यांनी साकारलेल्या सगळ्या भूमिकांमधले नाट्य हेरले आहे. जेलर, कहाळेकर गुरूजी या व्यक्तिरेखा ठसठशीत होत्या.
ज्योती पाध्ये यांनी गुरूजींच्या आईची भूमिका फारच छान साकारली. त्यासाठीची देहबोली, संवादफेक, मुद्राभिनय उत्तमच. मात्र, प्रभावती (गुरूजींची पत्नी) साकारताना अनेकदा गुरूजींची आई डोकावत होती. त्याकडे काटेकोर लक्ष द्यावे असे वाटते.
ज्योती अंबेकर यांनी आपली भूमिका उत्तम केली आहे. प्रेक्षक-श्रोत्यांशी संवाद साधत आपली भूमिका पुढे नेली आहे. त्यांचा आवाज, उच्चार सगळेच छान आहे. तथापि, एकसुरीपणा कमी झाला तर प्रभाव आणखी वाढेल. सोलापूरच्या प्रयोगात एका प्रवेशात त्यांची एन्ट्री थोडी उशिरा झाल्यासारखे वाटले.
अजय अंबेकर यांनी विविध भूमिका केल्या आहेत. हैदराबाद तुरुंगातील प्रसंग त्यांनी रंगतदार केला आहे. पत्रकार आणि गुरूजींच्या प्रसंगातील जुगलबंदी अधिक टोकदार करता येऊ शकेल.
छोटा नरहर ठीकच.

तांत्रिक बाजू उजवी
या प्रयोगासाठीची तांत्रिक बाजू उत्तमच. गुरूजींच्या जीवनातील विविध प्रसंगांची रेखाटने, चित्रे मध्यभागी स्क्रीनवर दाखवण्याची कल्पना छान आहे. संहिता नेमकेपणाने समजून घेण्यासाठी ती उपयुक्त ठरली आहे. पार्श्वसंगीतदेखील मोजके, नेमके आणि प्रसंगांना उठाव देणारे आहे.
कुरुंदकर गुरूजींचे विचार प्रेक्षकसन्मुख करण्याचा प्रयत्न या प्रयोगातून झाला आहे, एवढे निश्चित.

रजनीश जोशी, सोलापूर
मोबाईल – ९८५००६४०६६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]