गुरुपौर्णिमा विशेष
संगीतमहामहोपाध्याय डॉ. सूरमणी पं. कमलाकर परळीकर यांच्या कल्पनेतून साकारलेली “गरुडेश्वर यात्रा” दिनांक 23 मे 2016 रोजी सहकुटूंब संपन्न झाली. गरुडेश्वर हे ठिकाण गुजरात राज्यात असून ते नर्मदेच्या काठावर आहे. श्री. वासुदेवानंद सरस्वती म्हणजे श्री. टेंबे स्वामींनी येथे अनेकवेळा “चातुर्मास” करुन हे ठिकाण जागृत केलेले असल्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्व आहे. कलावंत हा नेहमी दुसऱ्यांसाठीच सतत आनंद देऊन नवनिर्मिती करीत असतो. असा अनुभव या यात्रेनिमित्त परत एकदा आला. मराठवाडयातील दुष्काळ संपून वरुणराजाने लवकरच कायम कृपा करावी असे मागणे मागून याठिकाणी पं. कमलाकर परळीकर यांनी टेंबे स्वामी रचित निवडक पदरचनांची गायन सेवा सादर केली. परिव्राजकाचार्य परमहंस श्री. टेंबे स्वामी स्थापीत जागृत श्रीदत्त मंदिरात हा कार्यक्रम सादर करण्याचा संकल्प पूर्ण केला. त्यांनी स्वत: काहि पद रचना गायल्या. कोण या जगाची करी परिपाळ (यमन), आता वाटे लाज (असावरी), अति सुलभ दत्तनाम (भीमपलास), दत्तनामे पाप पळे (शिवरंजनी), चिंतू दत्तात्रया (शुध्द सारंग), मोक्षाचे आम्हासी (चारुकेशी), नको देवू मज तू (मधूकंस), भावभक्ती अंगी उठे (जोगिया), दत्ता मजला प्रसन्न होसी (जोग), आजी आनंद आनंद (भूप), भेटी लागी माझे मन (भैरवी) इत्यादि रचना सादर केल्या. यातील काहि पदरचना त्यांच्या मुंबईत वास्तव्य करीत असलेल्या दोन्ही कन्या सौ. कविता राजीव कुलकर्णी व सौ. स्मिता सुधीर बरवे यांनी सादर केल्या. तबला साथ त्यांचे जावई सुधीर बरवे व संवादिनी साथ श्री. विश्राम परळीकर यांनी केली. स्वरसाथ त्यांचे विदयार्थी श्री. मंगेश जवळेकर व सुन सौ. अपर्णा परळीकर , नातू चि. मयंक परळीकर, चि. अभिराम परळीकर यांनी केली. श्रोत्यांच्या भूमिकेत सौ. शकुंतला परळीकर, जेष्ठ जावई श्री. राजीव कुलकर्णी हे होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सुधीर बरवे यांनी केले. तर या कार्यक्रमाचे नियोजन श्री. विश्राम परळीकर यांनी पाहिले.

“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” हा श्री दत्त परंपरेतील गजर सर्वांच्या तोंडि सहजपणे ज्यांनी रुळवला त्या श्री. टेंबे स्वामी यांनी या गजराची निर्मिती केली आणि त्याचा प्रसारही टेंबे स्वामींनीच केला. आजही वासुदेवानंद सरस्वती यांचे गरुडेश्वर हे स्थान अतिशय जागृत म्हणून मानले जाते. त्यांच्या अनेक दत्त भक्तांना आजही ते प्रचिती देतात.
गुरुवर्य पं. कमलाकर परळीकर यांनी परभणी शहरात गेल्या पन्नास वर्षांपासून विविध कार्यक्रमांतून रागदारी संगीताचा मोठया प्रमाणावर प्रसार केलेला दिसून येतो. ते स्वत: मितभाषी असूनही त्यांचे अनेक कलाकारांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्टय मानावे लागेल. मराठवाडयात सर्वच अंतरराष्ट्रिय ख्यातीचे गायक, वादक, कलावंत सहज ऐकायला मिळाले, याचे श्रेय गुरुवर्य पं. कमलाकर परळीकर यांनाच जाते.
संगीत महामहोपाध्याय पं. कमलाकर परळीकर सर यांनी सातत्याने संगीत महोत्सवाच्या ओयाजना बरोबरच सर्वसामान्य श्रोत्यांचा देखील विचार करुन रागरदारीवर आधारित अनेक कार्यक्रम परभणीकरांसाठी केले आहेत. थाट दर्शन, मल्हार राग दर्शन, शास्त्रीय संगीतातील विविध गीतप्रकार, ठुमरी दर्शन, भाव दर्शन, उर्दू, मराठी गझल, अनेक संतांच्या काव्य रचनांचा स्वरबध्द केलेला कार्यक्रम, शास्त्रीय रागदारी वृंदवादन, वृंदगान इत्यादि. त्यांनी संगीतबध्द केलेल्या नाटिका शरयु नदी, दानशूर कर्ण हया देखील खूप गाजल्या. परभणी मधील सुप्रसिध्द कवी बी. रघुनाथ यांच्या निवडक कवितांना स्वरसाज देऊन कार्यक्रम गाजवला. या व्यतिरिकत् गुरुवर्य परळीकर सरांकडून अनेक बंदिशीही विविध विषयाच्या व आशयाच्या रचल्या गेल्या. त्यासुध्दा आज “चित्तमोहिनी” या पुस्तक रुपाने उपलब्ध आहेत. एव्हढेच नाही तर आज आपल्या संगीत चिंतनातून , साधनेतून, नवीन तीन राग त्यांनी तयार केले आहेत. तेही रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. ते तीन राग म्हणजे – विष्णूकंस, चित्त मोहिनी व मनकर्णिका होय.

या संगीत प्रवासात अनेक कलाकारांशी झालेली मैत्री व त्यातून मिळालेल्या अनुभवांचे देखील लेखन करुन “स्वरांकीत” नावाचे पुस्तक प्रकाशित करुन त्यांनी एक वेगळा विचार सर्वांसमोर मांडला आहे. हे पुस्तक नक्कीच संग्रही असावे असेच आहे. असेच दुसरे संगीताशी संबंधित आणखी एक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्याचे नाव “स्वराकाश”. ज्यात स्फुटलेखन आणि काहि व्यक्ति चित्रण केलेले आहे. ते देखील वाचनीय असेच आहे. तसेच समर्थांच्या रागदारी वरील “समर्थ रामदासांचे संगीत चिंतन” हया पुस्तकाला देखील वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे या पुस्तकाच्या बघता बघता तीन आवृत्त्या निघाल्या. याच पुस्तकाची हिंदी आवृत्ती देखील निघाली आहे.
या व्यतिरिक्त गुरुवर्य डॉ. परळीकरांनी भारतातील व परदेशातील अनेक प्रतिष्ठित व्यासपीठांवर अपली सुरेल गायन कला अनेकदा सादर करुन रसिकांची मने जिंकली आहेत. या कलावंताने आपले संपूर्ण आयुष्यच केवळ संगीतासाठी वेचलेले आहे. वयाच्या पंचाहत्तरी नंतर देखील परळीकर सर तरुणांना लाजवेल अशा अतिशय उत्साहात नवनवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नात असताना दिसून येतात. आजही वेगवेगळया महाविदयालयाचे संगीत “विदयावाचस्पती” (पीएच.डी.) चे मार्गदर्शन घेण्यासाठी बाहेर गावचे देखील विदयार्थी येतात. “संगीत अलंकार” पदवीसाठी अनेक विदयार्थी त्यांच्याकडील संगीताचे ज्ञान घेण्यासाठी निरनिराळया गावाहून येत असतात. पं. परळीकर सर हे सर्व आवडिने व संगीताचा प्रसार म्हणून सतत करीत आहेत. हे सर्व आजही स्वत:चे कार्यक्रम सांभाळून करताना दिसून येतात. आज वयाच्या पंचाहत्तरी नंतर देखील रियाज सुरु आहे. सततच्या रियाजामुळे आजही आवाज गोड व सुरेल आहे. गुरु संगीत महामहोपाध्याय पं. स. भ. देशपांडे यांच्यावरील प्रगाढ निष्ठेमुळे व आशिर्वादामुळे ते आजही अनेक ठिकाणी मैफिली देखील करत आहेत.
या संगीताच्या प्रवासात ऐंशीच्या जवळपास भारतातील निरनिराळया प्रांतातील मानपत्र व सन्मान चिन्हांसहीत पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. ज्यात “सूरमणी” हा किताब सूरसिंगार संस्था, मुंबई, “परभणीभूषण” हा परभणी येथील दैनिक गोदातीर समाचार तर्फे तर “जीवन गौरव पुरस्कार” हा ओंकारोत्सवाचे आयोजक माजी आमदार माननीय श्री. सुरेशदादा देशमुख यांनी दिला आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविदयालय मंडळातर्फे “संगीतमहामहोपाध्याय” ही पदवी परळीकर सरांना देण्यात आली. तसेच कोल्हापूर करवीर पीठाचे जगतगुरु श्री. शंकराचार्य यांनी “स्वरयोगी” हा किताब दिला. तसेच आंतरराष्ट्रिय अध्यात्मिक गुरु श्री. श्री. रवीशंकर यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन सोलापूर येथे विशेष सन्मान दिला. तर नांदेड येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे दिल्या जाणारा “स्वरभास्कर” हा पुरस्कार गुरुवर्य परळीकर सरांना देऊन त्यांना गौरवान्वित करण्यात आले. अशा अनेक पुरस्कारांची यादि येथे संपणार नाही.

पण या कलावंताच्या कार्याची स्थानिक महानगरपालिकेने अदयाप दखल घेतलेली नाही याची खंत वाटते.
परभणीभूषण, संगीत महामहोपाध्याय स्वरयोगी गुरुवर्य डॉ. पं. कमलाकर परळीकर सर म्हणजे परभणीचेच नव्हे तर अवघ्या मराठवाडयाचे श्रेष्ठ सांस्कृतिक व्यक्तिमत्व आहे. याचा आम्हा सर्व संगीत रसिकांनाच नव्हे तर तमाम परभणीकरांना अभिमान आहे.
6 फेब्रुवारी 1940 हा गुरुवर्य परळीकर सरांचा वाढदिवस. आज वयाची 80 वर्षे पूर्ण करणाऱ्या नादब्रह्माच्या या साधकाचा “सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा” साजरा करण्याचे भाग्य आम्हाला लाभत आहे. परंतु कोरोना च्या पार्श्वभूमिवर जाहिर कार्यक्रम करणे शक्य नसल्यामुळे सरांना ही शब्दरुपी आदरांजली व्यक्त करते.

मूळ लेखिका – सौ. स्मिता बरवे, मुंबई
मो. 9619476444
संपादन –प्रा. केदार केंद्रेकर, परभणी
मो. 7038215346
Email – kkendrekar@rediffmail.com
( संदर्भ –दैनिक समर्थ दिलासा 15 जून 2016 )