साहित्यकांच्या लेखनीतून दिशाहीन राजकारण्यांना दिशा दाखविण्याचे साहित्य घडावे- माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर
शिरुर अनंतपाळ येथील मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केली अपेक्षा
लातूर/प्रतिनिधीः– साहित्य आणि लेखनीच्या माध्यमातून अनेक क्रांत्या घडलेल्या असून साहित्यामध्ये परिवर्तन करण्याची सुद्धा ताकद आहे. साहित्यांने वेळोवेळी समाज व इतर ठिकाणी घडणार्या घटनांचे विश्लेषन करून सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडले आहे. सध्या राजकारणात अनेक चढ-उतार होत असून अनेक राजकीय मंडळी दिशाहीन झालेली आहेत. त्यामुळेच साहित्यकांनी आपल्या लेखनीतून दिशाहीन राजकारण्यांना दिशा दाखविण्याचे साहित्य घडवावे ,अशी अपेक्षा व्यक्त करून माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या बाबींवरही परिसंवाद घडवून आणावा असे आवाहन केले.

मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून साहित्य आणि संस्कृती संवर्धन मंडळ व श्री अनंतपाळ नुतन विद्यालय शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमानाने शिरुर अनंतपाळ येथील स्वामी रामानंद तीर्थ साहित्य नगरी (मोरया लॉन्स) मध्ये एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून आ. निलंगेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष धनंजय गुडसूरकर, स्वागताध्यक्ष अॅड. संभाजीराव पाटील तर विशेष अतिथी म्हणून माजी जि.प. अध्यक्ष रामचंद्र तिरुके, प्रसिद्ध व्याख्याते सोमनाथ रोडे, तहसीलदार काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्रभाकर कुलकर्णी, नामदेव जगताप, कवि योगिराज माने, आदींसह नगराध्यक्षा सौ. मायावती धुमाळे, उपनगराध्यक्षा सौ. सुषमा मठपती यांची उपस्थिती होती.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यासह मराठवाडा मुक्तीसंग्रामचा यज्ञ अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी मराठी साहित्याने मोठे योगदान दिले असल्याचे सांगत आ. निलंगेकर यांनी मराठी साहित्याच्या माध्यमातून साहित्यकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदविणार्यांचा उत्साह वाढविण्यासाठी नेहमीच प्रभावशाली साहित्य लिहून त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले असल्याचे सांगितले. साहित्याच्या माध्यमातून जगात विविध क्रांत्या घडलेल्या असून सातत्याने परिवर्तनही घडविण्याची ताकद साहित्यामध्ये असल्याचे आ. निलंगेकर यांनी आवर्जून सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रभावना अधिक प्रबळ करण्यासाठी साहित्यकांनी सातत्याने आपली लेखणी चालविलेली असून लेखनीमधील ही ताकद अनेकांना झुकविणारी आहे. सध्याच्या राजकारणात काम करणारी अनेक राजकीय मंडळी दिशाहीन झालेली असल्याने राजकारणही गढूळ होऊ लागेलेले आहे. या दिशाहीन राजकीय मंडळींना दिशा दाखवून राजकारणातही क्रांती घडविणारे साहित्य लेखीनीच्या माध्यामातून साहित्याकांनी घडवावे अशी अपेक्षा आ. निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

देशाचा इतिहास सातत्याने लोकांसमोर मांडण्याचे कामही साहित्यातून झालेले असल्याने आपल्या वैभवशाली देशाचे नाव भारत असल्याचे समोर आले असल्याचे मत आ. निलंगेकर यांनी व्यक्त करून इंग्रजानी आपल्या राजवटीत भारताचे नाव बदलत इंडिया केले असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र आपल्या देशाचे वैभव अधिक उंचाविण्यासाठी भारत हेच नाव योग्य असल्याचे सांगत आगामी काळात इंडियाला हटवून इंग्रजांच्या गुलामगिरीचे प्रतीक झटकून द्यावे असे आवाहनही यावेळी आ. निलंगेकर यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास भावी पिढीला
करून देणे आवश्यक
मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाचे धडे शालेय अभ्यासक्रमात असावेत
मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी जो संग्राम करण्यात आला होता त्याला मोठा इतिहास आहे. शालेय अभ्यासक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामच्या इतिहासाचे धडे समाविष्ट करून मराठवाडा मुक्ती संग्रामच्या इतिहासाची ओळख आगामी पिढीला करून द्यावी अशी मागणी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आ. निलंगेकर यांनी केली. मराठवाडा मुक्ती संग्रामचे औचित्य साधत पहिल्यांदाच मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल आ. निलंगेकर यांनी संयोजकांचे कौतुक करून हा मान निलंगा विधानसभा मतदारसंघाला मिळाल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.