कृषीतज्ञांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या ज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना द्यावा -डॉ.बुधाजीराव मुळीक
पुणे -दि.२४ मे
शेती हा व्यवसाय परवडेनासा झाला असल्याने शेतकरी अनंत अडचणीतून जात आहे. उत्पादनाला बाजारभाव मिळत नसतानाही खर्या अर्थाने मातीशी जुळलेल्या आणि शेतीशी जोडलेल्या व्यक्ती शेती व्यवसायात टिकून आहेत. कृषी तज्ज्ञांनी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही शेतकर्यांच्या शेतात जाऊन त्यांना आपल्या ज्ञानाचा फायदा करून द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले.
शेतीतील काही कळत नाही त्याला मंत्री करतात आणि अजिबात काही कळत नाही त्याला सचिव करतात अशी टिप्पणी कृषी विभागातील सावळ्या गोंधळाबाबत त्यांनी केली.
ऊस संशोधक डॉ. सुरेश पवार लिखित ‘रसराज’ या आत्मचरित्रपर ग्रंथाचे प्रकाशन डॉ. मुळीक, साखर आयुक्त शेखर गायकवाड, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकर मगर, पुणे विभागाचे माजी आयुक्त विकास देशमुख, प्रभाकर देशमुख, नांदेडचे माजी जिल्हाधिकारी तानाजी सत्रे, यशदातील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली यशदा येथे करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. मुळीक बोलत होते. स्वयंदीप प्रकाशन आणि ब्रेनस्टॉर्म कंपनीतर्फे या सोहळ्याचे आयोजन केले होते.
ऊस संशोधन क्षेत्रातील डॉ. पवार यांच्या कार्याचा गौरव करून डॉ. मुळीक म्हणाले, शेती हेच भारताचे भवितव्य आहे. असे असूनही जो माती विकायला जातो तो देशाचा अपमान करतो.
साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, उसाचा हंगाम संपण्यापूर्वी शेतकर्यांच्या बँक खात्यात त्यांच्या उसाचे पैसे जमा झालेले असतील. आतापर्यंत 42 हजार कोटी रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. ते पुढे म्हणाले चांगले काम दिसल्याशिवाय कळत नाही. संशोधनविषयक कार्याच्या डॉक्युमेंटेशनमध्ये आपण मागे पडत आहोत. शेती संदर्भातील संशोधनात्मक कार्याच्या माहितीची नोंद झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. नितीन करमळकर म्हणाले, डॉ. सुरेश पवार यांचे हे केवळ आत्मचरित्र नसून शोधनिबंध आहे जो सर्वार्थाने उपयुक्त आहे. अनेक प्रेरणादायी गोष्टी त्यांनी या ग्रंथात नमूद केल्या आहेत. कृषी क्षेत्रात होत असलेल्या बदलांबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तानाजी सत्रे आणि प्रभाकर देशमुख यांनी शैक्षणिक वाटचालीतील आठवणींना उजाळा दिला.
नव्या पिढीला उपयुक्त ठरावे यासाठी लेखन केल्याचे सांगून डॉ. सुरेश पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले, शेतीविषयक होणारे संशोधन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. ज्या गोष्टींचे संशोधन केले त्या गोष्टी शेतात दिसल्या पाहिजेत यासाठी शेती करण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या समस्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले ‘माझ्या शेतातला ऊस तोडयला 20 महिने लागले, मीच जर ऊस तोडायला गेलो तर संशोधन कधी करणार’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भविष्यातही शेतकर्यांसाठी सतत काम करीत राहीन अशी ग्वाही डॉ. पवार यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बबन जोगदंड यांनी केले. मान्यवरांचे स्वागत डॉ. सुरेश पवार, लेफ्टनंद कर्नल सुनील पवार, सुजय पवार, प्रकाशक सुमंत जोगदंड यांनी केले.
फोटो : यशदा येथे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात (डावीकडून) नीला पवार, डॉ. सुरेश पवार, तानाजी सत्रे, डॉ. बुधाजीराव मुळीक, डॉ. नितीन करमळकर, विकास देशमुख, शंकर मगर, डॉ. बबन जोगदंड.
=-