उदगीर : ( प्रतिनिधी) सामाजिक भान जोपासत गोरगरीब विद्यार्थी शिकविणारे महाविद्यालय म्हणून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. केवळ शैक्षणिक, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात देखील संपूर्ण जिल्हाभरात महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा दबदबा निर्माण झाला आहे. ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे, असे मत पर्यावरण राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ‘बास्केटबॉल कोर्ट, व्यायामशाळा व वॉकिंग ट्रॅक’ उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर हे होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, प्रा. रणजीत चामले, चंद्रकांत लोदगेकर, संस्था सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य प्रा. आडेप्पा अंजूरे, नाथराव बंडे, बस्वराज पाटील मलकापूरकर, शिवराज वल्लापुरे, प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एम. संदीकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ना. बनसोडे म्हणाले, उदगीरला ‘बारामती पॅटर्न’ राबवून तालुका क्रीडा संकुलाची उभारणी भविष्यात केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारे क्रीडा क्षेत्रासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. उदयगिरी महाविद्यालयाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना जगन्नाथ लकडे म्हणाले, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाला जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल. संघभावनेतून क्रीडा विकासासाठी सर्वजण मिळून कार्य करूयात, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पाडण्याचे काम क्रीडा विभागाने सातत्यपूर्ण केले आहे. चांगले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी उदयगिरी महाविद्यालयाची भूमिका कायम अग्रेसर राहील, असे मत व्यक्त केले. यावेळी पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयप्रकाश पटवारी, प्रा. रणजीत चामले यांचीही भाषणे झाली.
पर्यावरण जनजागृती स्टिकरचे तसेच कृष्णा काकरे लिखित ‘कॉलेज’ कादंबरीचे विमोचन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एम. संदीकर यांनी तर क्रीडा विभागाविषयीची सविस्तर माहिती क्रीडा संचालक प्रा. सतिष मुंढे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले. यावेळी उदगीर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, खेळाडू, क्रीडाप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.