लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये पटकावले १ लाखाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक; चाकूर द्वितीय तर लातूर संघ तृतीय स्थानावर
लातूर : ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी 10’ च्या जिल्हास्तरीय स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मुख्य पारितोषिक कोण पटकावणार? याची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत होती. अखेर जोरकस फटकेबाजी करीत उदगीर तालुक्याच्या नक्षा क्रिकेट टीमने स्पर्धेवर आपली मोहोर उमटवत प्रथम क्रमांक पटकावला. तर चाकुर तालुक्याच्या रॉयल क्रिकेट क्लबने द्वितीय आणि लातूर शहरातील श्री गणेश क्रिकेट क्लबने तृतीय क्रमांक मिळवला.
तरुणाईच्या जल्लोषात क्रीडा संकुलाच्या मैदानावर ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी 10’ च्या जिल्हास्तरीय स्पर्धेतील मुख्य पारितोषिकाचे वितरण माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते आणि लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी झाले.
जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या उदगीर संघास १ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक, चाकुर संघास ५१ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक तर लातूर शहर संघास ३१ हजार रुपयांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले. तसेच, मालिकावीर पुरस्कार उदगीर येथील रुपेश तूपडे यांना (३ हजार रुपये), उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार लातूर येथील बाळू पांचाळ यांना (३ हजार रुपये), उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार चाकुर येथील अभि केंद्रे (३ हजार रुपये) यांना देऊन गौरवण्यात आले.
लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या पारितोषिक वितरण सोहळ्यास सौ. दीपशिखा धिरज देशमुख, माजी आमदार त्र्यंबक भिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, युवा उद्योजक डॉ. बिनिष देसाई, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, ट्वेंटी वन शुगर्सचे उपाध्यक्ष विजय देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य समद पटेल, अॅड. किरण जाधव, प्रवीण पाटील, अनुप शेळके, सपना किसवे, पुनीत पाटील, रमेश सूर्यवंशी, पृथ्वीराज शिरसाट, ज्ञानेश्वर भिसे, राजकुमार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
:खेळामुळे आरोग्य सदृढ बनते : दिलीपराव देशमुख
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने तालुका आणि जिल्हास्तरावर या स्पर्धा झाल्या. अतिशय कमी वेळेत झालेल्या या स्पर्धेत हजारो तरुण सहभागी झाले. ही स्पर्धा तरुणांना प्रोत्साहन देणारी, प्रेरणा देणारी ठरली. याचा आनंद आहे. तरुण मैदानावर असले की त्यांचे आरोग्य सदृढ राहते आणि विचार सकारात्मक बनतात. त्यामुळे तरुणांनी मैदानावर रमले पाहिजे. पुढच्या वर्षी या स्पर्धेतील पारितोषिकाची रक्कम वाढवली जाईल. शिवाय, मराठवाडा स्तरावर या स्पर्धा घेण्याचे प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा श्री. दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केली.
:’लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी 10′ या स्पर्धेतील विजेत्या संघाचे व सर्व खेळाडूंचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या स्पर्धेत तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग उमेद वाढवणारा ठरला. त्यामुळे स्पर्धेत सातत्य राहील. शिवाय, पुढील वर्षी जिल्ह्यातील मुलींसाठी क्रिकेट स्पर्धा घेतली जाईल.
– धिरज विलासराव देशमुख, आमदार
—