उदगीरमध्ये ८ ते १२ मार्च दरम्यान स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन- क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
▪️लातूर जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींना कुस्तीची ‘महादंगल’ अनुभवण्याची संधी
लातूर, दि. ३ (वृत्तसेवा): — जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा आहे. जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींसाठी ८ ते १२ मार्च २०२४ दरम्यान उदगीर येथे तालुका क्रीडा संकुल मैदानावर स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातील कुस्तीप्रेमी, क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले. स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा ९ मार्च, २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता उदगीर तालुका क्रीडा संकुल मैदानावर होणार आहे.
उदगीर येथे नवीन शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ना. बनसोडे बोलत होते. क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पै. अस्लम काझी, पोलीस उपअधिक्षक सोहेल शेख, तहसीलदार राम बोरगावकर, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत लोदगेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीची जोपासना व वाढ होण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. युवा पिढीला खेळाकडे आकृष्ट करणे व त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे गतवर्षीपासून राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्रात कुस्तीसारख्या देशी खेळाबाबत ग्रामीण व शहरी भागात विशेष आवड व आत्मियता आहे. लातूर जिल्ह्याला कुस्तीची उज्ज्वल परंपरा असून हरिश्चंद्र बिराजदार, काकासाहेब पवार यांच्यासारखे कुस्तीपटू या मातीत घडले आहेत. जिल्ह्यातील कुस्ती परंपरा लक्षात घेवून स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लातूर जिल्ह्यात उदगीर येथे आयोजित करण्यात आल्याचे ना. बनसोडे म्हणाले.
या स्पर्धेमध्ये राज्यातील ३६० खेळाडू व संघ व्यवस्थापक सहभागी होणार आहेत. यामध्ये फ्रीस्टाईल १० संघ, ग्रीको रोमन १० संघ व मुलीचे १० संघ असे एकूण ३० संघ सहभागी होणार असून, प्रत्येक संघात दहा वजनगटातील १० खेळाडू तसेच प्रत्येक संघासोबत एक संघ व्यवस्थापक व एक मार्गदर्शक असा १२ जणांचा संघ सहभागी असणार आहेत, असे ना. बनसोडे यांनी सांगितले.
उदगीर तालुक्यातील नागरिकांसाठी यापूर्वीही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय युवा महोत्सव यासह विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढेही असे उपक्रम राबविण्याचे नियोजन असल्याचे ना. बनसोडे म्हणाले.
प्रारंभी क्रीडा उपसंचालक श्री. नाईक यांनी प्रास्ताविक केले.