इंजिनीयर विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
अजि सोनियाचा दिनु,
वर्षे अमृताचा घनु
हरी पाहिला रे, हरी पाहिला रे..!
उदगीर ;दि.१७ ( वृत्तसेवा )भक्ती भावनेने सादर केलेली कला थेट पांडुरंगाला समर्पित होते. कारण प्रत्येक कलेत विठ्ठल सामावलेला आहे. याची प्रचिती उदगीरकरांना आज याची देही याची डोळा आली ती आषाढी एकादशी निमित्त झालेल्या “आषाढी महोत्सवात”. इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनने आयोजित केलेल्या विठ्ठल भक्तिमय सोहळा उदगीर येथील ललित भवनात अतिशय उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे दिव्यांग कलावंताच्या विठ्ठल नामात भाविक रंगून गेले होते.
इच्छा असूनही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील पालखी सोहळ्यात सहभागी होऊ न शकलेल्या वारकऱ्यांसाठी विठू नाम सोहळा आयोजित केला गेला होता. या सोहळ्याला क्रीडा मंत्री मा.ना.श्री. संजय बनसोडे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अभंगवाणी आणि विविध स्पर्धा घेण्यात आल्या. बोधडी ता.किनवट येथील ‘ स्वराज संगीत’च्या दिव्यांग चमूने गायलेल्या विठ्ठलाच्या अभंगात उदगीरकर रंगले.
बाल वारकरी वेशभूषा स्पर्धेत लहानग्यांनी महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे साक्षात दर्शन घडवले. यात पहिली ते पाचवी वर्गातील सहभागी आणि विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. आदिती गुट्टे, आरोही संमगे, समृद्धी दाडगे,अनुष्का पाटील, ज्योती रक्षाळे, संजीवनी मुळे, बजरंग बिरादार, प्रणव वाघमारे, शरयू केंद्रे शिवकन्या मळगे, संस्कृती गुट्टे, संध्या समगे, सुप्रिया मुंडे, श्रेया वाघमारे या पारितोषक प्राप्त विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार सुधाकर भालेराव, इंजि. विश्वजीत गायकवाड, कल्याण पाटील, श्रीकांत पाटील, माजी नगराध्यक्ष बसवराज बागंबदे, अमोल निडवदे, मनोज पुदाले, शिवशंकर धुप्पे, आनंद बुंदे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर पवार, माजी नगरसेवक रामेश्वर पवार, गणेश गायकवाड आदी उपस्थित होते.