गोपाळ कुळकर्णी
ज्येष्ठ पत्रकार
9422071166
कुठलाही चित्रपट यशस्वी व्हायचा असेल तर त्या चित्रपटाचे कथानक , दिग्दर्शन , गाणी , आणि संगीत चांगले असावे लागते तरच तो चित्रपट सिने रसिकांना भावत असतो ; आणि प्रेक्षक अशा चित्रपटांना डोक्यावर घेत असतात …. ! मधुर भांडारकर आणि पराग मेहता प्रस्तुत आणि आकाश पेंढारकर दिग्दर्शित व अभिजीत कवठाळकर संगीत दिग्दर्शित ‘ सर्किट ‘ हा मराठी चित्रपट कथानक , संगीत , गाणी ही त्रिसूत्री घेऊन बनवलेला चित्रपट दिसतोय आणि उत्कंठावर्धक असलेला हा मसालापट बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी होईल असे वाटते .
‘सर्किट ‘ हा चित्रपट येत्या 7 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाचे ट्रेलर आणि गाणी सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आली होती ती पाहिल्यानंतर माझ्या मनात या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता होती . कधी एकदा हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहायला मिळेल असे वाटत होते.त्याप्रमाणे मुंबईतील अंधेरी भागातील रेड बल्ब या स्टुडिओमध्ये या चित्रपटाचे स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते . खास निमंत्रितांसाठी ठेवण्यात आलेला हा शो मला पाहायला मिळाला आणि चित्रपट सुरू झाल्यानंतर शेवट होईपर्यंत जागेवर खिळवून ठेवलेला हा चित्रपट मला कमालीचा भावला…. !
हा चित्रपट जेव्हा सुरू होतो तेव्हा काही कालावधीनंतर हा चित्रपट भयपट आहे की काय ? असे प्रेक्षकांना वाटते, परंतु कथानक जसजसे पुढे सरकत जाते तसतसे पुढे काय होणार ? याची उत्सुकता प्रेक्षकांना वाटते. यातून प्रेक्षक आपल्या खुर्चीवरून हलत नाहीत कुठेही कंटाळवाणा वाटेल असा हा चित्रपट बनवण्यात आलेला नाही. आपण एखाद्या वीकेंडला फॅमिलीसोबत रेस्टॉरंटमध्ये जातो आणि जेवायला त्याच्यासमोर सजवलेले ताट येते तेव्हा त्याला आवडेल ते पदार्थ खावासा वाटतो आणि तो ताटातील पदार्थ आवडीने खात तृप्तीची ढेकर देत रेस्टॉरंट बाहेर येतो तसाच हा चित्रपट आहे .अगदी किशोरवयीन मुला-मुलींपासून, साठ वर्षांच्या आजी-आजोबांनी एकत्रित बसून पाहावा असा हा चित्रपट आहे . सगळ्यांना जे जे हवे ते या चित्रपटात आहे. त्यामुळे आम्ही या लेखाचे शीर्षक देताना मसालापट असा उल्लेख केलेला आहे तो चुकीचा नाही असे प्रेक्षकांना चित्रपट पाहून लक्षात येते आणि ते तृप्तीची ढेकर देत आपापल्या घरी परततात .
चित्रपटाचे नावच ‘ सर्किट ‘असल्यामुळे त्याचे कथानक काय असेल त्याचा अंदाज प्रेक्षकांना काही मिनिटातच येतो. चित्रपटातील नायक सिद्धार्थ( वैभव तत्ववादी ) हा शीघ्रकोपी असतो . त्याला लहान लहान गोष्टीवरून , आवाजावरून राग येत असतो आणि तो राग आला की आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही .यातून उद्भवणारे प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहेत.दिग्दर्शकांनी या चित्रपटात हे प्रसंग उत्तमपणे रेखाटलेले आहेत .नायकाच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याच्या स्वभावात बदल करण्यासाठी नायिका आरोही ( ऋता दुर्गुळे) तिला करावी लागणारी कसरत आणि यातून होणारी तिची घुसमट वाखाणण्याजोगी अशीच आहे. ऋताने साकारलेली आरोहीची भूमिका खूपच सुंदर झाली आहे .वैभव आणि ऋता या दोघांनीही आपल्या भूमिकांना खऱ्या अर्थाने न्याय दिलेला आहे असेच म्हणावे लागेल . पूर्वार्धात हा चित्रपट प्रेम कथा ,गाणी आदी बाबतीत पुढे पुढे सरकत जातो आणि मध्यंतरानंतर या चित्रपटाचे रूपांतर भयपटात रूपांतरित होते. नायकाच्या रागाला कंटाळलेली नायिका आपलं घर सोडून आपल्या माहेरी जायला निघते आणि तिथून कुठ कुठले भयानक प्रसंग तिच्या वाटेला येतात … एका ढाब्यावर त्यांच्यावर आणि तिच्यावर काय बेतते , रागामुळे किती अनास्था प्रसंग निर्माण होतो … हे सगळं तुम्हाला पाहायचं असेल तर चित्रपट ग्रहातच जाऊन हा चित्रपट तुम्हाला पाहावा लागेल .
मराठवाड्यातील लातूरचा सुपुत्र अभिजीत कवठाळकर यांनी या चित्रपटाला संगीत दिलेले आहे . कथानकाला साजेशी त्याने संगीत दिग्दर्शन दिलेले आहे. अभिजीत हा तसा गुणी संगीतकार आहे. त्याला कुठलेही काम द्या तो ते करताना त्याच्यात अक्षरश: जीव ओततो… या गुणी कलावंताने सर्किट या चित्रपटाला संगीत देताना जीवापाड मेहनत घेतलेली आहे, हे हा चित्रपट पाहताना आवर्जून लक्षात येते. त्याने संधीचे सोने केले आहे असेच म्हणावे लागेल . त्यामुळे या चित्रपटातील गाणी हिट ठरत आहेत आणि कथानकाला साजेशी संगीत अभिजीत कवठाळकर या तरुण संगीतकाराने दिल्यामुळेच हा चित्रपट उत्कंठावर्धक ठरलेला आहे.
आणि हो, मिलिंद शिंदे व रमेश परदेशी या आघाडीच्या गुणी कलावंतांनी साकारलेल्या भूमिका देखील चित्रपट हिट ठरण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या आहेत एवढे मात्र खरे …! सोनू निगम,अवधूत गुप्ते, बेला शेंडे, मधुवंती बोरगांवकर या गायकांनी उत्तमपणे गाणी गायल्यामुळे या चित्रपटातील गाणी अविट झाली आहेत आणि अर्थातच त्याला चांगले संगीत मिळाल्यामुळे ती हिट ठरत आहेत असेच म्हणावे लागेल.