◆शरद पवारांना पडलेला अगतिक प्रश्न●
●राजेंद्र शहापूरकर●
औरंगाबाद : शरद पवार म्हणजे चाणक्य. शरद पवार म्हणजे जाणता राजा. शरद पवार म्हणजे देशाच्या राजकारणातील बडे प्रस्थ. शरद पवार म्हणजे सह्याद्री. शरद पवार म्हणजे शेती. शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे भूत, वर्तमान आणि भविष्यही.शरद पवार म्हणजे बिगबुल. शरद पवार म्हणजे असे. शरद पवार म्हणजे तसे. शरद पवार म्हणजे कुणालाही मुख्यमंत्रीपदाच्या मुंडावळ्या बांधणारे. शरद पवार म्हणजे कुणाच्याही बुडाखालची खुर्ची अलगद खेचू शकनारे.शरद पवार म्हणजे साखर. शरद पवार म्हणजे वाईन. शरद पवार म्हणजे दाऊद. शरद पवार म्हणजे भूखंड.शरद पवार म्हणजे विश्वास. शरद पवार म्हणजे विश्वासघात. शरद पवार म्हणजे गांधीवाद, समाजवाद आणि जातीयवादही. शरद पवार म्हणजे शाहू-फुले-आंबेडकर वाद मार्क्सवाद आणि नक्षलवाद सुद्धा ! शरद पवार म्हणजे बारामती . शरद पवार म्हणजे पुणे, मुंबई, महाराष्ट्र आणि आख्खा भारत सुद्धा! छत्री असताना भिजवणारा पाऊस. शरद पवार म्हणजे कायमचेक्स भावी पंतप्रधान. शरद पवार म्हणजे ‘तुमच्या देवाचा बाप’. शरद पवार म्हणजे असे आणि शरद पवार म्हणजे तसे सुद्धा … नेती नेती !!
तर असे हे आपले शरद पवार. तब्बल पाच दशकातील महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि इतर अनेक कारणावर पकड ठेवून असलेले महाराष्ट्रीय चेहऱ्याचे राष्ट्रीय नेते. राजकारणातील भीष्माचार्य. ‘पवार म्हणजे पावर’ अशी एक व्याख्या मला वाटते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा कशाच्या तरी निमित्ताने केली होती. आता बाळासाहेबच ते ..त्यांच्या हरएक शब्दात एकप्रकारची वेगळीच ताकद होती. तर असो.

शरद पवार म्हणजे काय चीज आहे हे समजण्यासाठी एवढे वर्णन पुरेसे आहे असे समजण्यास हरकत नाही. तर अशा शरद पवारांनी अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कारिक विचाराचे सरकार आणून दाखविले. चमत्कार घडविला. ‘रिमोट कंट्रोलवर’ विश्वास असलेल्या ठाकरे कुटुंबातील वारसाला , उद्धवजींना थेट मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसविले .. (हे माझे म्हणणे नाही तर दस्तुरखुद्द उध्दवजींनीच ‘लाईव्ह’ सांगितले आहे.) भाजपच्या तोंडाला पाने पुसली. भाजपला रोखण्याचा आदर्श देशामधील तमाम विरोधी पक्षासमोर ठेवला. त्यामुळे त्यांच्याकडे तमाम मोदींविरोधी मंडळी मोठ्या ‘कौतुकाने उत्सुकलेल्या’ नजरेने पाहात असतानाच घात झाला. म्हणजे तशी सुरवात ‘वाजे पाऊल आपले’ म्हणत आठ एक महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी गृहमंत्री (माजी) अनिल देशमुख आणि पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या साथीला तुरुंगात भरती झालेल्या दुसरे राष्ट्रवादी मंत्री नबाब मलिक यांनी केली ; मात्र हे ‘राजकीय द्वेषातून’ म्हणत पवारांनी कसेतरी (म्हणजे कसे ?) निभावून नेले . इमेजला लहानसा का होईना पण तडा तर गेलाच असणार पण अशा तड्याना तडकवीत पवारांनी ‘इमेज’सांभाळण्याचा प्रयत्न केला असे दिसते.
राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निमित्ताने शरद पवार या नावाची पावर ‘डीम’ झाल्याचे दिसून येत असतानाच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी पवारांच्या ‘चमत्कारिक चमत्काराला’ थेट आव्हान दिले आणि पावरला अखेरची घरघर लागली असे म्हटंले तर वावगे ठरणार नाही. कालच्या पत्रकार परिषदेत प्रथमच पवार ‘पावरलेस’ असल्याचे जाणवले. आपल्या पक्षाच्या गृहमंत्री , दिलीप वळसे पाटीलांना ‘ हे मंत्री आणि एवढे आमदार एकाच वेळी राज्याबाहेर गेलेच कसे ?’ असे विचारताना हतबल दिसले. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी भाजपला दिलेल्या ‘क्लीनचिट’ खोडून काढताना त्यांची होणारी चरफड, निराशा आणि अगतिकता पाहाताना वाईट वाटावे अशीच परिस्थिती आहे. प्रत्येक नेत्यांची काही वर्षे असतात . शरद पवारांची अनेक वर्षे होती. आता ती जादू , ती पकड , तो चमत्कार राहिलेला नाही हे त्यांच्या बरोबरच त्यांच्या कार्यकत्यांनी , हितचिंतकांनी लक्षात घेतले पाहिजे असे मनापासून वाटते कारण राज्यातील एका उत्तुंग व्यक्तिमत्वावर या वयात यापेक्षा वाईट वेळ येऊ नये असे मनापासून वाटते , म्हणून हा प्रपंच !