आँन दी स्पाँट रिपोर्ट
वरदविनायक मंदिर आणि स्मशानभूमीत शिरले पाणी
इचलकरंजी ; दि.१४-( सागर बाणदार यांजकडून )–
इचलकरंजी येथे चार दिवसांपासून सर्वत्रच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढच होत चालली आहे. यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले असून बुधवारी नदीकाठावरील श्री वरदविनायक मंदिर आणि स्मशानभूमीत पाणी शिरले आहे. मागील काही तासात पाणी पातळी दीड फुटाने वाढ झाली असून 68 फुटावर इशारा आणि 71 फुटावर धोका पातळी आहे. संथ गतीने पाणी पातळीत वाढ होत असली तरी सध्या इशारा पातळीच्या दिशेने पंचगंगेची वाटचाल सुरु आहे.
कोकणासह धरण पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यापासून पावसाने संततधार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. जून महिना तसा कोरडाच गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच हजेरी लावली आहे. मागील आठवड्यापासून संततधार धरली असून सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.
जोराचा पाऊस आणि धरणातून सुरु असलेला पाणी विसर्ग यामुळे नद्यांची पाणी पातळी वेगाने वाढत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दोन दिवसात 3 ते 4 फुटांनी वाढ झाली आहे. मंगळवारी सायंकाळी 59 फूट 9 इंचावर असलेली पातळी बुधवारी सकाळी 8 वाजता 60 फूट 3 इंच , 10 वाजता 60 फूट 9 इंच , दुपारी अडीच वाजता 61 फुट आणि सायंकाळी 6 वाजता 61 फूट 3 इंच इतकी झाली होती. मागील 24 तासात दोन फुटांनी पाणी वाढले असून रात्रीत जुन्या पुलावरुन पाणी वाहू लागले आहे.आज गुरुवारी सकाळी 8 वाजता 62 फूटांवर पाणी पातळी राहिली आहे.
पाणी पात्राबाहेर पडून पसरत चालले असून काठावरील श्री वरदविनायक मंदिरासह स्मशानभूमीतही पूराचे पाणी शिरले आहे. महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.