शिष्टमंडळाव्दारे प्रांताधिका-यांना मागणीचे निवेदन सादर
इचलकरंजी ; दि.२१-(प्रतिनिधी ) — मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूंसह शैक्षणिक व आरोग्य सेवेवर जीएसटी लागू केल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने
प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. जीवनावश्यक वस्तुंवर कर लादण्याऱ्या सरकारचा धिक्कार असो, मोदी सरकार चले जाव, जीएसटी कौन्सिल रद्द करा, यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना सादर करुन यासंदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
देशात वस्तु व सेवा कराची अंमलबजावणी सुरू होवून पाच वर्षे लोटली आहेत. तरीही केंद्रातील मोदी सरकारला वस्तु व सेवा करांमध्ये सातत्याने बदल करावा लागत आहे. या धोरणाचा भाग म्हणून केंद्र सरकारने १८ जुलैपासून जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटीची आकारणी करण्याबाबत धोरण अंमलात आणले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आवश्यक असणाऱ्या पीठ, पनीर, दही आदी वस्तुंवर ५ टक्के, तसेच विद्यार्थ्यांना लागणारे पेन्सील, शार्पनर, लेखनसामुग्री यावर १२ ते १८ टक्के, बँकींग व्यवहारातील खातेदारांना आवश्यक असणारे चेकबुकवरील शुल्कावर १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. याचा परिणाम म्हणून महागाईमध्ये प्रचंड वाढ होणार आहे. यापूर्वी कधीही जीवनावश्यक वस्तुंवर कोणताही कर लावला जात नव्हता. मात्र, सध्या लागू केलेल्या या कराच्या ओझ्यामुळे सर्वसामान्य माणसाला प्रचंड महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.तसेच शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ.विकास खरात यांना देण्यात आले.तसेच या मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी ,
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावचकर, माजी नगरसेवक राहुल खंजिरे, युवक अध्यक्ष युवराज शिंगाडे, समीर शिरगावे, अजित मिणेकर, समीर जमादार, हारुण खलिफा ,दिलीप पाटील , शेखर पाटील , ओंकार अवळकर,चंद्रकांत मिस्ञी ,
रियाज जमादार, सावित्री हजारे, राजू काटकर, ताजुद्दीन खतीब, नंदकिशोर जोशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.