लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र मिळवून देण्याची ग्वाही
लातूर/प्रतिनिधी: अंबाजोगाई येथे होऊ घातलेले सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे सुरू करावे,या मागणीसाठी मागील चार दिवसांपासून लातूर बाजार समितीच्या परिसरात उपोषणाला बसलेले हमाल मापाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी जाधव यांनी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या लेखी आश्वासनानंतर आपले उपोषण मागे घेतले. सोयाबीन संशोधन केंद्र लातूरला मिळवून देण्याची ग्वाही आ.निलंगेकर यांनी यावेळी जाधव यांना दिली.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंबाजोगाई येथे सोयाबीन संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.वास्तवात लातूर येथे हे केंद्र सुरू होणे अपेक्षित असताना ते अंबाजोगाई येथे सुरू होत असल्याने हमाल मापाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी जाधव यांनी शनिवारपासून (दि.२३) लातूर बाजार समितीच्या परिसरात आमरण उपोषण सुरू केले होते.

जलसाक्षरता अभियाना निमित्त लातूर शहरात असणारे आ.निलंगेकर यांनी मंगळवारी त्यांची भेट घेतली.जाधव यांच्याशी चर्चा करून सोयाबीन संशोधन केंद्र लातूरलाच स्थापन करून घेऊ,असे लेखी आश्वासन आ.निलंगेकर यांनी जाधव यांना दिले.यानंतर जाधव यांनी आपले उपोषण मागे घेतले.

लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होते. लातूर बाजार समितीत लातूरसह शेजारील जिल्हे आणि कर्नाटकातूनही सोयाबीनची आवक होते. असे असताना नैसर्गिक न्यायाने हे केंद्र लातूर येथे सुरू होणे अपेक्षित होते परंतु ते अंबाजोगाईसाठी मंजूर करण्यात आले आहे.आ.निलंगेकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे केंद्र लातूर येथे सुरू होण्यासंदर्भात शेतकरी आणि व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.