*आषाढी एकादशी*
दिंडी निघाली त्यादिवशी गुरूजींना दिवसभर वेळच नव्हता.सर्वांना सुचना ,फोन नंबर , राहायची व्यवस्था ,पंढरपूरला आपल्या महाराजांचा आश्रम कुठे आहे.हे ते नवीन लोकांना सांगत होते. काही जुन्या लोकांना नव्यांना सांभाळायला सांगत होते. शिवाय सर्व मंडळी नमस्कार करायची त्यांना आशीर्वाद द्यायचा .मी येतोच आहे रे एकादशीला. तिथे भेटू हे पालूपद होतेचं., खूप उशीरा गुरूजी मंदिरात आले. विठ्ठलाच्या मुर्तीला मनोभावे नमस्कार करून म्हणाले “विठ्ठला आमच्या गावच्या मंडळींची काळजी घे रे बाबा.”
गुरूजी शाळेतून निवृत्त झाले आणि या गावाला विठ्ठल मंदीराचे पुजारी म्हणून आले . पण गुरूजी हे नाव कायमच राहीले. तेही मग गावच्या वारकर्यांसोबत पंढरपूरला जाऊ लागले.सतत हसतमुख.आजकाल वयामानाने थकवा जाणवायचा पण गुरूजींच्या चेहर्यावरचे समाधानी हास्य कायम असायचे. २-३वर्षापुर्वी एकदा विषमज्वराने खूप दिवस आजारी पडल्यानंतर त्यांच्या मुलाने पंढरपूरला जायचे नाही असे फर्मान काढले.पण गुरूजींना कसली चैन. आषाढी जवळ येऊ लागली तशी गुरूजींची घालमेल वाढू लागली. अखेर बसने का होईना मला पाठव असा लकडा त्यांनी मुलाकडे लावला. शेवटी सोबत दोन परिचीत स्नेह्यांसह( त्यात त्यांचे मित्र सोमाभाई )त्यांना पाठवायला तो तयार झाला. खरेतर या अगोदर ११वेळा गुरूजी दर्शन करून आले होते. आता तब्येतीकडे पहा. इथेच पांडूरंगाची सेवा करा असे मुलाचे म्हणणे. तर कर्ता करविता तोच जोपर्यंत जीवात जीव आहे आणि हातीपायी धड आहे तोपर्यत जाणार असे गुरूजींचे म्हणणे.
एकादशी जवळ आली. सोबत दोन लोक घेऊन गुरूजी बसमध्ये चढले. गुरूजींचे गाव ते पंढरपुर अंतर तब्बल सोळा तास.पण एकदा बस सुटली की गुरूजींना प्रवासाचे काही वाटत नसे. थोडी झोप,थोडे नामस्मरण, झोपेतही विठ्ठलाची मुर्ती दिसायची आणि त्याला भेटायची ओढ अजूनच तिव्र व्हायची.पंढरपूर आले की प्रवासाचा थकवा क्षणात दूर व्हायचा.
गुरूजी दुपारी पोहचले. आपल्या महाराजांच्या आश्रमात गेले.तिथे गावाकडची मंडळी भेटली.पुन्हा गुरूजींना सर्वांनी नमस्कार केला. मग स्वच्छ स्नान करून गुरूजी महाराजांना भेटायला गेले.महाराजांच्या पायावर डोके ठेवल्यावर महाराजांनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिले. बराच वेळ गप्पागोष्टी झाल्या. रात्री सर्वांनी भजन म्हटले.उद्या एकादशी तेव्हा लवकर आटोपून सर्व झोपावयास गेले. झोपताना गुरूजींना छातीत जळजळ झाली.आजकाल प्रवास केला की पित्त वाढते.गुरूजींनी आपल्या थैलीतून एक आयुर्वेदीक गोळी काढली .घेतली.थोड्याच वेळात थकव्याने झोप लागली.
पहाटे अंधारातच आन्हीक आटोपून गुरूजी निघणार तेवढ्यात महाराजांनी हाक मारली. “गुरूजी…उशीर होईल दर्शनाला फराळ करून जा,”
” नको महाराज. चहा घेतला. विठ्ठलाचे दर्शन घेतल्याशिवाय अशीही भूक लागतच नाही . येतो मी.”
गुरूजी लाईनीत उभे राहीले.जिकडेतिकडे विठ्ठल नामाचा गजर.गुरूजींनी सहज विचार केला.अकरा वेळा येऊन गेलो याअगोदर तरीही दरवेळेस तिचं हुरहुर.तिचं दर्शनाची ओढ.बा विठ्ठला,आता आयुष्याच्या अंतापर्यंत अंतर देऊ नको रे बाबा. दुपार सरता सरता दर्शन घेऊन गुरूजी बाहेर पडले. एका बाजूला येऊन अगोदर घरी फोन लावला. “अगं मी बोलतोय .छान झालं बरका दर्शन . तुझाही नमस्कार सांगितला बरका विठ्ठलाला. म्हटलं बाबा आजकाल नाही सहन होत तिला दगदग. बरं ठेवतो हं”
गुरूजींनी घाम पुसला. दर्शन झाल्यानंतर त्यांच्या चित्तवृत्ती फुलून आल्या.गावकर्यांबरोबर गप्पा मारत ते परत आले. थोडा फराळ केला.खरेतर सोमाभाई म्हणत होते थोडा आराम करा.पण संध्याकाळी लेटणे बरे नाही म्हणत ते पुन्हा गप्पागोष्टी करत बसले.
रात्री अर्थात किर्तन.किर्तनात गुरूजी रंगून गेले. त्यांच्या रंध्रारंध्रातून विठ्ठल विठ्ठल नाव निघत होते. अचानक गुरूजींच्या छातीतून कळ आली. गुरूजींनी दोन क्षण श्वास रोखून ठेवला.कळ कमी झाली.हातापायात मुंग्या आल्या. दरदरुन घाम फुटला. “देवा.पांडुरंगा. का त्रास देतो रे बाबा.उगाच किर्तनात रसभंग करु नको रे.”
गुरूजींनी उपरण्याने घाम पुसला. सोमाभाईंच्या ते लक्षात आले.
“काय झाले गुरूजी? बरे वाटत नाही का?”
“काही नाही रे. थोडी छाती दुखते आहे. साबुदाणा खाल्याने होत असेल.काही घाबरण्यासारखे नाही .”
दोघेही परत किर्तनात रंगून गेले.
“गुरूजी….गुरूजी …” अचानक गुरूजींना जाग आली. कोण हाका मारतयं रात्रीचे ? उठून पाहीले आजूबाजूला तर सर्व वारकरी शांत झोपलेले. तेवढ्यात समोर काहीतरी चकाकले म्हणून गुरूजींनी पाहिले तर साक्षात कटीवर हात ठेऊन पांडुरंग उभे.चेहऱ्यावर मंद स्मित. गुरूजी धन्य धन्य झाले.सर्व अंग गदगदू लागले .डोळ्यातून अश्रूंची धारा. आपण स्वप्नात आहे की जागे हेच त्यांना कळेना. त्यांनी दोन्ही हात जोडले.तोंडातून शब्द फुटेना. मंद हसत विठ्ठल म्हणाले “चलायचं ना?”
गुरूजींनी अतीव समाधानाने मान डोलावली. एक प्रकाश आपल्या आजूबाजूला पडल्याचे गुरूजींना जाणवले. आपले शरीर खूप हलके झाल्याचे त्यांना समजले….
पहाटे सोमाभाई गुरूजींना ऊठवायला गेले तेव्हा त्यांना समजले गुरूजी केव्हाच अनंताच्या प्रवासाला निघून गेले होते. चेहऱ्यावर तेच प्रसन्न हास्य.जणू म्हणत असावेत”आनंदाचे डोही आनंद तरंग”…….
©विवेक चंद्रकांत वैद्य . नंदुरबार .