16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeदिन विशेष*आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा*

*आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा*

‘बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर’- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

बीड जिल्ह्यातील श्री. मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले या वारकरी दांपत्याला महापूजेचा मान

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचे वितरण

सोलापूर /पंढरपूर दि. १०(जिमाका) :-आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी राज्यासमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे त्यांनी विठ्ठला चरणी घातले.

आषाढी एकादशीनिमित्त श्री. शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी मानाचे वारकरी मु.पो. रुई, ता.गेवराई, जि.बीड येथील मुरली भगवान नवले (५२) आणि सौ. जिजाबाई मुरली नवले (४७) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, यांच्यासह समितीचे अन्य सदस्य, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मागील दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी होऊ शकलेली नाही. त्यामुळे यावर्षी १० लाखापेक्षा अधिक वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. लाखो वारकरी विठू नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहाने चालत आलेले आहेत. या सर्व वारकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. शासन शेतकरी, वारकरी शेतमजूर व कामगार यांच्यासह राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

समाजातील प्रत्येक घटकाला विकासाचा लाभ मिळवून देणा

राज्यात कृषी, उद्योग, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रासह अन्य सर्व क्षेत्रात चांगली कामे केली जाणार असून विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शासन सर्वसामान्याचे आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न राहतील असेही त्यांनी सांगितले.

राज्यात यावर्षी पावसाला उशीरा सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती निर्माण झालेली असली तरी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. चांगला पाऊस पडल्यास चांगले पीक येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल. शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील १२ कोटी जनतेच्यावतीने महापूजा

राज्यात आषाढी एकादशीची वारी एक महापर्व असून या वारीला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. आषाढी एकादशीला महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने हा दिवस जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यातील १२ कोटी जनतेच्यावतीने आपण ही शासकीय महापूजा केली असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

वारकरी सन्मान व एसटी मोफत पास वितरण
आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते ‘रिंगण’ या वारी विशेषांकाचे प्रकाशन देखील याप्रसंगी करण्यात आले.

निर्मल दिंडी पुरस्कार वितरण
पंढरीची वारी ही महाराष्ट्राची प्राचीन आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन ‘निर्मल वारी हरित वारी ‘ अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल जिल्हा रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक-वै.ह भ. प. भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडी, मु.पो.शेरा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर (७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री संत जगनाडे महाराज दिंडी घोटी बुद्रुक जिल्हा नाशिक (५० हजार व सन्मान चिन्ह) दिंडीला प्रदान करण्यात आले. तसेच ‘ग्रीन बिल्डिंग’ पुरस्काराचे वितरणही या वेळी करण्यात आले.

प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.लता शिंदे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. श्री औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले, तर आभार समिती सदस्य प्रकाश जंजाळकर महाराज यांनी मानले.

यावेळी खासदार सर्वश्री डॉ.श्रीकांत शिंदे, संजय(बंडू) जाधव, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, तानाजी सावंत, दादाजी भुसे, संजय राठोड, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरतशेठ गोगावले, रवींद्र फाटक, राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकरी गजानन गुरव यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

       ********

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]