ट्वेन्टीवन ॲग्री लि. लातूर जिल्हयात ट्वेन्टीवन शुगर लि.च्या मदतीने
आयुर्वेदीक वनस्पती व सुगंधी औषधी वनस्पती लागवड आणि जैवसंपदाचे जतन करणार
अश्वगंधा लागवड पथदर्शी योजना जिल्हयातील सर्व तालुक्यात राबवीणार
सौ. अदिती अमित देशमुख
· समृद्ध आयूर्वेदीक वारसा संवर्धनासाठी ट्वेन्टीवन ॲग्री लि.,चा पुढाकार
· लातूर तालुक्यातील पथदर्शी प्रयोग जिल्हयातील सर्व तालुक्यात राबविणार
· येणाऱ्या खरीप व रब्बी आयुर्वेदीक वनस्पती लागवडीचे नियोजन
· आधुनिक माहिती तंत्रज्ञान (डिजीटल मिडीया) चा वापर
· आयुर्वेदीक वनस्पती लागवड योजनेसाठी आंतरराष्ट्रीय कंपनी सोबत करार
· विक्रीची हमी, शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा
लातूर ;दि. २(प्रतिनिधी) –
ट्वेन्टीवन ॲग्री लि.,च्या माध्यमातून लातूर तालुक्यातील शेतकऱ्यासाठी राबवीलेली अश्वगंधा लागवड योजना यशस्वी झाल्या नंतर ही पथदर्शी योजना जिल्हयातील सर्व तालुक्यात राबवण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून येथील जैवसंपदाचे जतन करून आयुर्वेदीक वनस्पती व सुगंधी औषधी वनस्पती लागवड करण्यात येणार आहे. तसेच आयुर्वेदीक औषधी आणि सौंदर्य प्रसाधन उत्नादनास चालना दिली जाणार आहे, अशी माहिती ट्वेन्टीवन ॲग्री लि.,च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी दिली आहे.
समृद्ध आयूर्वेदीक वारसा संवर्धनासाठी
ट्वेन्टीवन ॲग्री लि.,चा पुढाकार
लातूर जिल्हयात समृद्ध आयूर्वेदीक वारसा लाभलेला आहे. येथील शेती आणि वनक्षेत्रात वनस्पती, जडीबुटी, रानभाजी मुबलक प्रमाणात आहे. यावर संशोधन करून जतन, सवर्धन होणे काळाची गरज आहे. ही जैवसंपदा वाढविण्यासाठी ट्वेंटीवन ॲग्री पूढाकार घेत आहे. या शिवाय एक चांगली बाजारपेठ आज आयुर्वेदिक वनस्पतीला उपलब्ध आहे. या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणेसाठी आयुर्वेदीक वनस्पती लागवड वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपनी सोबत करार करण्यात आला आहे. ही कंपनी शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या आयुर्वेदिक वनस्पतीच्या खरेदीची हमी देणार आहे.
या बरोबरच लातूर जवळील मळवटी येथील ट्वेन्टीवन शुगर लि. कारखान्याला सोबत घेऊन सेंद्रिय साखर, सेंद्रिय गुळ, पांढरी साखर, गुळ पावडर व आसवनीतील उत्पादीत (एसडीएस व आरएस – आल्कोहोल) चा वापर करून आयुर्वेदीक औषधी आणि सौंदर्य प्रसाधन उत्नादनास चालना देण्यात येणार आहे, अशी माहिती ट्वेन्टीवन ॲग्री लि., च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी दिली आहे.
लातूर तालुक्यातील पथदर्शी प्रयोग
जिल्हयातील सर्व तालुक्यात राबविण्याचे नियोजन
ट्वेंटीवन ॲग्री लि., च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लातूर तालुक्यात ३०० एकर क्षेत्रावर अश्वगंधा लागवड केली. या सर्व उत्पादनांची कंपनीने थेट विक्री केली आहे. शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून केलेला अश्वगंधा लागवड प्रयोग पथदर्शी ठरला आहे. आता लातूर तालुक्यासह जिल्हयातील रेणापूर, औसा, चाकूर, अहमदपूर, शिरूरअनंतपाळ, देवणी, जळकोट, उदगीर, निलंगा या ठिकाणी येणाऱ्या खरीप हंगाम व रब्बी हंगामापासून आयुर्वेदीक वनस्पती लागवड शेतीस या योजनेच्या माध्मातून चालना देण्यात येणार आहे. त्या त्या तालुक्यातील भोगोलीक परीस्थितीनुसार आयुर्वेदीक वनस्पतीची लागवड करण्यासाठी निवड करण्यात येणार आहे.
येणाऱ्या खरीप व रब्बी
हंगामापासून लागवडीचे नियोजन
येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामापासून ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्या कडील उपलब्ध साधनसामर्गी, शेतकऱ्यांचे कौशल्य याचा विचार करून अश्वगंधा लागवडीसह सेंद्रिय शेती, सुगंधी व औषधी वनस्पतीच्या लागवड करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत त्या त्या तालुक्यातील वातावरण आणि शेतकऱ्यांची मागणी प्रमाणे अश्वगंधा, लेमनग्रास, कालमेघ, शतावरी, हळद, सर्पगंधा, खस, अमरूजा, जिरेनियम, तुळस वनस्पतीची लागवड केली जाणार आहे. ही वनस्पती कमी पाण्यावर व कमी मेहनतीवर येते. सोयाबीन व हरभरा पिकाला पर्यायी पीक म्हणून या पिकांची लागवड करणे फायदेशीर आहे. नवीन लागवड होणाऱ्या उसामध्येही यातील काही वनस्पतीची आंतरपीक म्हणून लागवड करता येते.
आधुनिक माहिती तंत्रज्ञान (डिजीटल मिडीया) चा वापर
स्थानीक पातळीपासून जागतिक पातळी पर्यंत आयुर्वेदाचे महत्व आहे. या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे. आयुर्वेदीक वनस्पती लागवड, जतन, संवर्धन आणि काढणी व थेट विक्री ही सर्व अद्ययावत माहिती आपल्या शेतकऱ्यांना मिळावी यासाठी डिजिटल मीडियाचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना थेट शेतावर येऊन तज्ज्ञ मदत, मार्गदर्शन करणार आहे.
आयुर्वेदीक वनस्पती लागवड योजनेसाठी
आंतरराष्ट्रीय कंपनी सोबत करार,विक्रीची हमी
शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा