अ. भा. मराठी साहित्य संमेलन
ऐतिहासिक व्हावे – आ. कराड
लातूर दि.६–
उदगीर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे केवळ उदगीरचे नव्हे तर लातूर जिल्ह्याचे आहे. मिळालेली ही संधी लातूरच्या वैभवात भर टाकणारी असून जिल्हयाचा बहुमान वाढवणारी आहे. असे कार्यक्रम सहजा सहजी मिळत नाहीत त्यामुळे पिढ्यानपिढ्या नाव राहील असे ऐतिहासिक साहित्य संमेलन व्हावे यादृष्टीने आपण सर्वजण मिळून काम करू असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजक आणि संयोजकाची बैठक उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शनिवारी पार पडली. या बैठकीत आ. रमेशआप्पा कराड बोलत होते. या बैठकीचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर हे होते तर यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, कोषाध्यक्ष मनोहर पटवारी, कार्यवाह रामचंद्र तिरुके, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, महादेव बोंबडे, विक्रम शिंदे, भागवत सोट, सतीश आंबेकर, रामप्रसाद लखोटीया, प्राचार्य डॉ. आर.आर. तांबोळी यांच्यासह साहित्यिक, प्राध्यापक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर मध्ये होते हे जेव्हा समजले तेव्हा मनापासून आनंद वाटला. निस्वार्थी, प्रामाणिक आणि हक्काच्या कार्यकर्त्यावरच संमेलन यशस्वी होत असते असे सांगून आ. कराड म्हणाले की उदगीरला साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला जिथं दानत असते तिथेच संधी मिळते ही दानत उदगीर आणि लातूरात आहे हे अनेक वेळा आपण अनुभवले आहे या साहित्य संमेलनाचा आनंद ग्रामीण भागातील जनतेला मिळाला पाहिजे या कार्यक्रमाचे नियोजनाचे वैभव दिसून आले पाहिजे साहित्य संमेलनातील काही कार्यक्रम निश्चितपणे सर्वांसाठी खुले ठेवावेत अशी सूचना करून आमच्यावर जी जबाबदारी द्याल ती समर्थपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडू अशी ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयास वैभव संपन्न वारसा असल्याने हे साहित्य संमेलन यशस्वी होईल असा आशावाद सुधाकर भालेराव यांनी व्यक्त केला तर साहित्य संमेलन पक्ष, जात, धर्म यापुढे जावून सर्व जिल्हा वासियांचे कसे होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठी भाषा आणि साहित्यीकांचा सन्मान करण्यासाठी संस्थेच्या हिरक मोहत्सवी वर्षाच्या निमित्ताने संमेलनाचे आयोजन केले आहे अशी माहिती कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर यांनी यावेळी बोलताना दिली.
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान उदगीरला मिळाला असला तरी लातूर जिल्हाचा हा बहुमान आहे. असे सांगून प्रारंभी रामचंद्र तिरुके आपल्या प्रास्ताविकात बोलताना म्हणाले की, हे संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. सर्वांच्या सहभागातून साहित्य संमेलन यशस्वी होणारच आहे यात शंका नाही असे सांगून उपस्थितांचे स्वागत केले. बैठकीचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. भालचंद्र करंडे यांनी केले तर शेवटी प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.