राज्यासह मनपातील सत्ताधार्यांचे अपयश लातूकरांपर्यंत पोहचवा
आ. संभाजी पाटील निलंगेकरांचे शक्ती केंद्रप्रमुखाना आवाहन
लातूर/प्रतिनिधीः- मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तीन भिन्न विचाराच्या पक्षांनी एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली. तसेच मनपाच्या सभागृहातही विश्वासघात करूनच काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे. सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात करून राज्यासह मनपात सत्ता प्राप्त केलेल्यांनी गेल्या दोन ते आडीच वर्षात सर्वसामान्यांच्या हिताचे कोणतेच काम केलेले नाही. केवळ आणि केवळ स्वतःचे हित सांभाळण्याचे काम केले असून जी विकास कामे होत आहेत ती केंद्र सरकारच्या व मागील काळात मंजूर झालेल्या निधीच्या माध्यमातूनच होत आहेत. हे सत्ताधार्यांचे अपयश असून यामुळे लातूरचा विकास थांबलेला आहे. सत्ताधार्यांचे हे अपयश शक्ती केंद्रप्रमुखांसह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लातूरकरांपर्यंत पोहचवावे असे आवाहन आ. संभाजी पाटील निलंगेकरांनी केले आहे.
लातूर शहरात शहर भाजपाच्या विविध मंडलाअंतर्गत असलेल्या शक्ती केंद्रप्रमुखांसह बुथ प्रमुखांशी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या निवासस्थांनी जाऊन संवाद साधला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्याच्या समवेत शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, भाजयुमोच्या प्रदेश सचिव तथा प्रदेश प्रवक्ता प्रेरणा होनराव, मनपा गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे, सरचिटणीस शिरिष कुलकर्णी, अॅड. दिग्विजय काथवटे, भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, महिला आघाडी अध्यक्ष मिना भोसले आदी होते.

मतदारांचा विश्वासघात करून राज्यात तीन भिन्न विचाराच्या पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केल्याचे सांगून आ. निलंगेकरांनी केवळ आणि केवळ या सत्तेच्या माध्यमातून स्वहित साधत महावसुली करण्यामध्ये मग्न असलेल्या या सरकारने समाजातील सर्व घटकांचा मोठा विश्वासघात केलेला आहे. यासोबतच मनपा मध्येही विश्वासघाताने सत्ता स्थापन केलेल्या काँग्रेसनेही लातूरकरांचा विश्वासघात करून गेल्या दोन वर्षात कोणतेही नवीन विकासकाम केलेला नाही. राज्य व मनपात सत्तेत असलेल्या या सत्ताधार्यांनी कोविड सारख्या संकटाच्या काळातही सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केलेले नसून या संकट काळात भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीच सर्वसामान्यांना मदतीचा हात पुढे केलेला होता. जो लोकप्रतिनिधी किंवा पक्ष पदाधिकारी संकटकाळात सर्वसामान्या जनतेसोबत नसतो तो इतर काळातही जनतेसोबत राहू शकत नाही असे सांगून आ. निलंगेकरांनी याबाबत सत्ताधार्यांना जाब विचारण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मागील दोन वर्षात या सत्ताधार्यांनी कोणतेही नवीन विकासकाम केलेले नसून मागील काळात झालेल्या मंजूर निधीवरच राज्यात व शहरात कामे सुरु असल्याचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

याउलट केंद्र सरकारच्या माध्यमातून लातूर शहरासाठी मागील दोन वर्षात अनेक विकासकामे मंजूर करण्यात आलेली असून यामध्ये प्रामुख्याने शहरातील रिंगरोडचे काम झाले असल्याचे आ. निलंगेकरांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्रसरकारच्या विविध योजनांचा लाभ गेल्या दोन वर्षात सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात झालेला असून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्नही सत्ताधार्यांकडून होत असल्याचे आ. निलंगेकरांनी सांगितले. त्यामुळेच आगामी काळात शक्ती केंद्रप्रमुखासह पक्षपदाधिकारी व बुथप्रमुख यांनी राज्य व मनपातील सत्ताधार्यांचे अपयश लातूरकरांपर्यंत पोहचविण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन करून भाजपा हा सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारा पक्ष असल्याचे लोकांना पटवून द्यावे अशी अपेक्षाही आ. निलंगेकरांनी यावेळी व्यक्त केली.
लातूर शहरातील सिद्धेश्वर मंडल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडल, महात्मा बस्वेश्वर मंडल, छत्रपती शिवाजी महाराज मंडल, महर्षी दयानंद सरस्वती मंडल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंडल अंतर्गत असलेल्या नय्युम शेख, अजय भुमकर, सौ. निर्मला कांबळे, शशिकांत हांडे, दिनेश भंडारे, सौ. स्वाती जाधव, सौ. रोहिणी देशमुख या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या निवासस्थांनी आ. निलंगेकर यांनी भेट दिली. या दरम्यान लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वराचे दर्शन घेतले तर सर्वधर्मीयांचे श्रद्धांस्थान असलेल्या हजरत सुरतशहावली दर्ग्यास चादरही अर्पण केली. या भेटीप्रसंगी मंडल अध्यक्ष, बुथ प्रमुख यांच्यासह पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


—