माकणी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून तात्काळ पाणी सोडण्यासहजलसाठयातील पाण्याचे नियोजन योग्य करावे
माजीमंत्री आ.निलंगेकरांची पालकमंत्र्याकडे मागणी
लातूर प्रतिनिधी:-
उन्हाची दाहकता वाढू लागलेली असुन वाढत्या उन्हाने पाण्या अभावी शेती पिकांचे नुकसान होवू लागले आहे. त्यांच बरोबर ग्रामीण भागात पाणी टंचाईचाही फटका बसू लागलेला आहे. त्यामुळे माकणी धरणातील उजवा आणि डाव्या कालव्यातून तात्काळ पाणी सोडण्यासह जिल्हयातील जलसाठयामध्ये असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी टंचाई संपुष्टात आणण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्राद्वारे जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
मार्च महिन्याचे १५ दिवस लोटलेले असुन उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आगामी काळात उन्हाची दाहकता अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी टंचाईसह अनेक शेतक-यांच्या शेतातील पाणी साठाही संपला आहे. ही बाब लक्षात घेवून माकणी धरणातील उजवा आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडणे गरजेचे आहे. या धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या अंतर्गत निलंगा, औसा आणि उमरगा तालुक्यातील ७० गावांचा समावेश असुन १४ हजार ८४५ हेक्टर जमीन येते. सध्या माकणी धरणातील जलसाठा पाहता दोन्हीही कालव्यातून पाणी सोडणे सहज शक्य होणार आहे. या कालव्यातून पाणी सोडल्यास शेतक-यांना त्यांचा लाभ होणार असुन त्यांच्या पिकाला योग्य वेळी पाणीही देता येणार आहे. विशेषता: सध्या विजेच्या समस्येने शेतकरी मोठया प्रमाणात त्रस्त आहे. माकणी धरणाच्या दोन्हीही कालव्यातून पाणी सोडल्यास शेतक-यांना फायदा होणार असुन पाण्या अभावी होणारे त्यांचे नुकसानही टळणार आहे.
त्यांच बरोबर आगामी काळात जिल्हयात पाणी टंचाई उदृभवण्याची शक्यता असुन जिल्हयातील जलसाठयामधील पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे केल्यास पाणीटंचाईची दाहकता कमी होणार असुन नागरिकांसह पशुधनानाही पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. या बाबीचा गांर्भीयाने विचार करून पालकमंत्र्यानी तात्काळ माकणी धरणाच्या उजवा व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासह जिल्हयातील जलसाठयामध्ये असलेल्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी निर्देश दयावेत, अशी मागणी माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्राद्वारे केली आहे.