शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत
पीक विमा कंपन्यांना सूचना द्या
गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढल्याने आमदार धिरज देशमुख यांची अधिवेशनात मागणी
—
लातूर : गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची दखल घेवून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना पीकविमा भरपाई मिळाली पाहिजे. यासंदर्भात निकषात बदल करून मदत देण्याबाबत पीकविमा कंपन्यांना राज्य शासनाने सूचना द्याव्यात, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी गुरुवारी (ता. २०) पावसाळी अधिवेशनात केली.
मागील वर्षाप्रमाणेच यंदाही शेतकऱ्यांसमोर गोगलगाय प्रादुर्भावाच्या रूपाने संकट उभे राहिले आहे. हा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती आमदार श्री. धिरज देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनात दिली. अशा संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
लातूर ग्रामीण मतदारसंघातील रेणापूर तालुक्यात सोयाबीनच्या कोवळ्या मोडांवर गोगलगायींचा हल्ला होत आहे. गोगलगाय पिके फस्त करत असल्याने यंदाही पीक येईल की नाही, याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे. अनेक ठिकाणी चिंताजनक स्थिती बनली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सरकारने तत्काळ मदत द्यावी. तसेच, गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना पीकविमा भरपाई देण्यासंदर्भात सरकारने पीक विमा कंपन्यांना योग्य ते निर्देश द्यावेत, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.
—