गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनची पाहणी; शासनाने शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी
लातूर : रेणापूर तालुक्यामधील आनंदवाडी व परिसरात सततच्या पावसामुळे आणि गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांची लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी गुरुवारी पाहणी केली. संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना धीर देत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू, असा दिलासाही त्यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला.

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी, संततधार पाऊस यासोबतच गोगलगायीचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन व इतर पिके अडचणीत सापडली आहेत. शेतकरी बांधव हतबल झाला आहे. त्यांना धीर देण्यासाठी आमदार श्री. धिरज देशमुख आज बांधावर पोहचले. त्यांच्या अडचणी जाणून घेत नुकसानग्रस्त पिकांची आमदार श्री. धिरज देशमुख यांनी पाहणी केली.
सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पिके पिवळी पडली आहेत. तर काही ठिकाणी पेरलेले बियाणे उगवले नाही. ते कुजले. अनेक भागांत गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला आहे व तो दिवसेंदिवस जाणवत आहे. पिकांच्या झालेल्या या नुकसानीचे पंचनामे तातडीने होत नसल्याने बहुसंख्य शेतकरी बांधव दुबार-तिबार पेरणी करावी की नाही, या विवंचनेत आहेत. तेव्हा प्रशासनाने लवकर पंचनामे करणे आवश्यक आहे, याकडे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी यावेळी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

यावेळी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, गटविकास अधिकारी मोहन अभंगे, तालुका कृषी अधिकारी एच. एम. नागरगोजे, कृषी सहाय्यक एस. व्ही. कदम, कृषी पर्यवेक्षक एस. जी. वाघमारे, मंडळ कृषी अधिकारी के. जी. सुरवसे, तलाठी अमोल काळे तसेच, ट्वेंटीवन कारखान्याचे व्हाइस चेअरमन विजय देशमुख, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, गोविंद पाटील, विश्वासराव देशमुख, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, रेणा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन अनंतराव देशमुख, विश्वनाथ कागले, मतीन अली सय्यद आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
रेणापूर तालुक्यामधील नुकसानग्रस्त भागाची आमदार श्री. धिरज देशमुख यांनी आज पाहणी केली. तेव्हा शेतकरी पंडित बांडे, शेतकरी बब्रुवान नारायण टमके यांनी आपल्या शेतात सकाळपासून वेचलेल्या गोगलगायी दाखविल्या. अर्ध्या एकरमध्ये टोपलीभर गोगलगायी जमा होत आहेत. त्या वेचल्या तरी दिवसेंदिवस गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचेही काही शेतकऱ्यांनी सांगितले. अद्याप नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत, अशी व्यथा मांडताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्याशी संवाद साधून आमदार श्री. धिरज देशमुख यांनी त्यांना धीर दिला.