कृषी महाविद्यालयाच्या जागेची किंमत देण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाची मंजुरी,
लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा
महाराष्ट्र शासन व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मानले आभार
लातूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जागेची किंमत म्हणून लातूर कृषी महाविद्यालयास ३ कोटी ३२ लाख ६८ हजार रुपये वर्ग करण्यास मंजुरी दिली असल्यामुळे लातूर येथील जिल्हा रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
या संदर्भातील अधिक माहिती अशी, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूर व परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात,वैद्यकीय क्षेत्रात जाणाऱ्या लातूरच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून लातूर येथे जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले होते. त्यानंतर त्यांच्याच कार्यकाळात लातूरसाठी स्वतंत्र जिल्हा रुग्णालयही मंजूर झाले, मात्र या रुग्णालयासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने, या रुग्णालयाची उभारणी करण्यात अडचण निर्माण झाली होती. माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यासंदर्भात पाठपुरावा करून लातूर मधील कृषी महाविद्यालयाची १० एकर जागा रुग्णालय उभारणीसाठी मंजूर करून घेतली होती, कृषी महाविद्यालयाची जागा रुग्णालय उभारणीसाठी उपलब्ध झाली मात्र त्या जागेची किंमत शासकीय स्तरावरून कृषी महाविद्यालयाकडे पर्यायाने वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाकडे वर्ग करण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या, सदरील अडचण दूर करण्यासाठी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी काही दिवसापूर्वी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री, प्रा तानाजी सावंत यांची भेट घेऊन कृषी महाविद्यालयाच्या जागेचे बाजार मूल्य म्हणून ३ कोटी ३२ लाख ६८ हजार रुपये वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठात वर्ग करण्याची विनंती केली होती, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी सदरील निधी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे वर्ग करण्यास मंजुरी दिली आहे.
लातूर जिल्हा रुग्णालयासाठी जागा उपलब्ध होण्याचा प्रश्न आता मार्गी लागला असल्यामुळे लवकरात लवकर हे रुग्णालय उभारले जाईल या ठिकाणी,सर्वसामान्य रुग्णांना उच्च दर्जाच्या अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध होतील असे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.सदरील जागा उपलब्ध होण्यासाठी माझं लातूर परिवारासह विविध संस्था संघटना यांनीही प्रयत्न केले असून त्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आले असल्याचे सांगून त्यांचेही आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आभार मानले आहेत.