राजमाता जिजाऊ शाळा माझी न्यारी आमदार अभिमन्यू पवार यांचा प्रेरणादायी उपक्रम – जिल्हाधिकारी वर्षा घुगे – ठाकूर
राजमाता जिजाऊ शाळा माझी न्यारी उपक्रमाअंतर्गत लामजना शाळेतील विकसित करण्यात आलेल्या शैक्षणिक व शिक्षणेत्तर सुविधांच्या लोकार्पण
औसा -( माध्यम वृत्तसेवा):- वेगवेगळ्या फंडातून वेगवेगळ्या उपक्रमांने औसा विधानसभेत काही प्रेरणादायी कामे झाली आहेत. मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक सुविधा व डिजिटल शिक्षण हा आ अभिमन्यू पवार यांनी राबविलेला स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम असून, हि शाळा पाहाताना मनापासून आनंद होत असल्याचे सांगून शिक्षणाशिवाय व्यक्ती आत्मनिर्भर होवू शकत नाही असे प्रतिपादन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा घुगे – ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
आमदार अभिमन्यू पवार व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या राजमाता जिजाऊ शाळा माझी न्यारी उपक्रमाअंतर्गत लामजना जिल्हा परिषद शाळेत विकसित करण्यात आलेल्या शैक्षणिक व शिक्षणेत्तर सुविधांच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, तहसीलदार घनश्याम अडसूळ, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे सचिव सुहास पाचपुते, गटविकास अधिकारी सोपान अकेले, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, क्रिएटीव्ह फाऊंडेशन चे अध्यक्ष अॅड परिक्षीत अभिमन्यू पवार, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव खिचडे, सरपंच महेश सगर, उपसरपंच बालाजी पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे, उपाध्यक्ष आमरीन खजुरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा घुगे - ठाकूर बोलत होत्या कि जिथे शासनातर्फत अनेक अडचणी असतात त्याठिकाणी मुलांच्या प्रगतीसाठी आमदार निधी व सीएसआर फंडातून वेगवेगळे उपक्रम आमदार अभिमन्यू पवार यांनी हाती घेतले आहेत. आणि ते निश्चित प्रेरणादायी आहेत मुलांना डिजिटल ज्ञान मिळणे आवश्यक आहे हि शाळा निश्चित माॅडेल शाळा म्हणून पुढे येईल राज्यातून चांगली शाळा म्हणून पुढे आली पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.आम्ही अनेक लोकार्पण, उद्घाटन बघतो मात्र सीएसआर व आमदार निधीतून विशेषता लहान मुलांच्या शिक्षणासाठी आ अभिमन्यू पवार यांनी राबविलेला हा स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम आहे. लातूर पॅटर्न हा प्रसिद्ध आहे.येथे शेत तिथे रस्ता अभियानाअंतर्गत चांगले कामे झाले असून शेतरस्त्यांचा औसा पॅटर्न म्हणूनही पुढे येत आहे. असे त्यांनी सांगितले..
यावेळी बोलताना आ अभिमन्यू पवार म्हणाले की मुले चांगले शिकले पाहिजे त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे जेणेकरून त्यांचे चांगले भविष्य घडावे या हेतूने मतदारसंघातील ३ शाळा प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यात आल्या असून येणाऱ्या काळात या धर्तीवर ७० शाळेत शैक्षणिक व शिक्षणेत्तर सुविधा उभारल्या जाणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या शाळेत मुलांना डिजिटल व मैदानी खेळासाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेऊन हि माझी शाळा आहे या भावनेने सेवा करणे गरजेचे आहे कारण विद्यार्थी घडविणे हे देशसेवेचे काम आहे. असे सांगून शिक्षण क्षेत्रात जे जे आवश्यक ते आपण देण्याचा प्रयत्न करीत आहोत असे ते म्हणाले.तर यावेळी बोलताना लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी ज्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातील अडचणी येतील त्या सोडविण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू दर्जेदार शिक्षणातून ग्रामीण भागातील विद्यार्थी सनदी अधिकारी घडू शकतात त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत अशा सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.