सिनेमा सिनेमा
Y हा अजित वाडीकर यांची कथा व दिग्दर्शन असलेला चित्रपट पाहिला. ”ऑल इज इन माइंड”.. असे वाटले. माणसाचा मेंदू किती गलिच्छ आणि अॅस्पिरेशन नसलेला समाज निर्माण करू शकतो? किती आकांक्षा विरहीत आणि उज्वल भविष्याच्या आशांना मानवी मेंदू ठार करतो , याची प्रचिती चित्रपट पाहताना येते. स्त्रीभ्रूण हत्या ही मध्यवर्ती कथा असलेला हा चित्रपट आहे. स्त्रीभ्रूण हत्येचा बाजार आणि त्यामागची सरकारी व खासगी यंत्रणांतील अभद्र युती यात दाखवली आहे. या विषयावर चिक्कार लिहिले जाते. चिंता व्यक्त केल्या जातात. संताप व्यक्त केला जातो. मात्र वाय चित्रपट पाहताना मन अंतर्मुख होते. चित्रपट वास्तववादी असल्याने अनावश्यक झगझगीतपणा किंवा लेडी लॉयन अशी इमेज मुख्य भूमिकेत असलेल्या मुक्ता बर्वेची बनवलेली नाही. ते एका दृष्टीने चांगले आहे. सरकारी अधिकारी म्हणून स्त्रीभ्रूण हत्येची समस्या सचोटीने हाताळणारी म्हणून मुक्ता बर्वे पडद्यावर दिसते. तिचा प्रस्थापित यंत्रणेशी, धनदांडग्यांशी मुकाबला हा अत्यंत संयमाने पटकथेत लिहिलेला आहे. जसे घडते किंवा घडत आहे तसे ते पडद्यावर उतरवले आहे.

”यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः”असे म्हणणारा आपला समाज. नवरात्रात शक्तीची पूजा करणारा आपला समाज. जय जीजाऊ, जय सावित्री, जय भवानी अशा घोषणा देणारा आपला समाज. पोटच्या स्त्री अर्भकाला पोटातच ठार करतो तेव्हा समाजाचे अंतर्मन किती पोकळ, बुरसटलेले,जळमटं लागलेले आहे हे समजते.स्त्रीला पोटातच ठार करणारा आपला समाज फक्त तांत्रिकदृष्ट्या व बाह्यदृष्ट्या आधुनिक झाला आहे. अत्यंत गंभीर व संवेदनशील विषयाला चित्रपटातून विविध अंगाने दर्शवले आहे.
डॉ. पुरूषोत्तम या गुन्ह्यांना सरावलेल्या, निर्ढावलेल्या, सोकॉल्ड प्रतिष्ठीत डॉक्टरची भूमिका नंदू माधव यांनी साकारली आहे. डॉ. पुरूषोत्तम यांच्या तोंडी काही संवाद यात आहेत. ”मी जे स्त्रीभ्रूण अॅबॉर्ट करतो ही समाजाची गरज आहे… मी काहीही वाईट किंवा लज्जास्पद करत नाही..”. असे डॉ. पुरूषोत्तम म्हणतो. डॉक्टर असुनही, सुशिक्षित असुनही त्यानं असं बोलावं का? असे वाटू शकते. मात्र हे संवाद ऐकताना मला वाटले पुरूषोत्तमला हा आत्मविश्वास कोणी दिला? आपण काहीही चूक करत नाही असे त्याला वाटण्याइतपत झोड कोणी बनवले. तर आपल्या समाजाच्या मागसल्या मानसिकतेने. जे पालक आपलेच मुल निर्ममतेने पाडतात त्यांनाच काही वाटत नाही. उलट त्यांना पुरूषोत्तम सारख्या प्रवृत्ती म्हणजे देणच वाटते, अनेकदा तर देवही वाटते. तेव्हा आपण समाज म्हणून गुन्हेगार आहोत हाच निष्कर्ष निघतो.
मुक्ता बर्वेने डॉ. आरती देशमुखची भूमिका (नेहमीप्रमाणेच) अत्यंत मोजूनमापून, नेमकी साकारली आहे. नंदू माधव यांची देहबोली अगदी सराईत व कोडग्या डॉक्टरला शोभेशी आहे. चित्रपटातील कलाकार मग तो कम्पाऊंडर असू देत किंवा माऊली सगळ्यांनी सहज वावर आणि चांगले पात्र वठवले आहे. मध्यंतरापूर्वीची काही दृश्ये टेक्निकली फारच पुवर वाटली आहेत. (विशेषत: प्राजक्ता माळीच्या घरातील) .
वाय हा चित्रपट एका मानवी समस्येला हाताळणारा असल्याने स्त्री-पुरूषांनी मिळून पाहावा. आपल्याकडे एक स्टीरिओ टाइप आहे की फॅमिली ड्रामा म्हणजे सगळे गोड गुलाबी. वाय हा चित्रपट फॅमिली ट्रॅजिडी आहे. त्यामुळे सहकुटुंब पाहावा… ज्या कुटुंब व्यवस्थेला आपण आपले बलस्थान मानतो तिला सुरूंग आपल्यातीलच अनेक लावत आहेत ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे सहकुटुंब वाय चित्रपट पाहावा असे वाटते…
- तृप्ती डिग्गीकर