यशोगाथा
स्वकर्तुत्वाने, स्वबळावर जेव्हा एक स्त्री यशस्वी होते, आत्मनिर्भर होते समाजात ‘ स्व ‘ ची ओळख निर्माण करते तेव्हा एक अद्भुत तेज तिच्या चेहऱ्यावर येते .
ती झळाळी असते आत्मविश्वासाची. जीवनातील प्रवासात लढल्याची व जिंकल्याची.
प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी
घराबाहेर जाण्याची गरज नसते. घरात राहून देखील जेव्हा स्वतःच्या कलागुणांचे रूपांतर व्यवसायात करता येते तेव्हा यशप्राप्ती तर होतेच व त्या जोडीला लाभते ते आनंद व समाधानी आयुष्य.ज्या कामातुन आपल्याला आनंद मिळतो तेच काम जेव्हा पैसे कमावण्याचे साधन होते तेव्हा दुपटीने काम केले तरी थकवा जाणवत नाही अथवा त्या कामाचा कंटाळा देखील येत नाही. अथवा त्याचे ओझे वाटत नाही.
तर आज जाणून घेऊ अशाच एका कर्तबगार महिलेची , अन्नपूर्णेची कहाणी जी केवळ स्वतःच विविध चटकदार पदार्थ करायला देश विदेशात शिकली नाही तर ते शिक्षण, ते ज्ञान स्वतःपुरते मर्यादित न ठेवता इतरांना देखील देऊन त्यांना देखील स्वावलंबी बनवत आहे.
आजची ही अन्नपूर्णा म्हणजे सौ कांचन तुषार गोरे होय. जाणून घेऊ या तिची जीवनगाथा..
कांचन हिचा जन्म ३१ ऑक्टोबर १९८५ रोजी पुणे येथे झाला. तिचे शालेय शिक्षण कन्या शाळेत झाले. तर पुढील शिक्षण एस.पी.कॉलेज मध्ये झाले.पुढे तिचा २०१० साली विवाह झाला.
कांचनचे पती तुषार दीनानाथ गोरे हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून मलेशिया येथील मजेस्कॉ कंपनीत सॉफ्टवेअर टेस्टिंग हेड म्हणून गेली १२ वर्षांपासून कार्यरत आहेत पण सध्या वर्क फ्रॉम होम करत आहे.
मुलगी त्रिशा एक वर्षाची असताना म्हणजे २०१२ साली गोरे दाम्पत्य मलेशियात गेले.
मलेशियात स्वस्थ न बसता कांचन ने
बेकिंग इन्स्टिट्यूट शोधले. तिथे तिने प्रवेश घेऊन केक व पेस्ट्री
बनविण्याचे प्रशिक्षण घेतले.वेगवेगळे कोर्सेस केले.काही एक महिना दोन अथवा तीन महिन्यांच्या कालावधीचे होते.
मलेशियात असताना कांचन केकच्या ऑर्डर्स घेऊ लागली. तिथे तिला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. नवीन ओळखी झाल्या.मुळातच मनमिळावू, हसतमुख स्वभाव असल्याने परदेशात देखील ती सगळ्यांशी जोडून राहिली. त्यामुळे ती कधीही एकटी पडली नाही.पती दिवसभर नोकरी साठी बाहेर असत. अशा वेळी कुटुंब व काम अशी दुहेरी कसरत कांचन करत असे.
यु ट्यूब च्या माध्यमातून विविध पदार्थ कसे करता येतात याची सखोल माहिती कांचन घेत असे व घरात त्याचे प्रयोग ही करत असे. अनेक प्रसिद्ध शेफच्या पदार्थांच्या पुस्तकांचा देखील तिने अभ्यास केला .
गोरे दाम्पत्य २०१६ साली पुण्यात आले. २०१७ साली त्यांना दुसरी मुलगी लिशा झाली.पुण्यात आल्यावर देखील कांचनने प्रतिष्ठित संस्थांमधून विविध पदार्थांचे प्रशिक्षण घेतले.
कांचनने मुलगी लहान असताना देखील शनिवार व रविवार स्वतः क्लासेस घेण्यास सुरवात केली.तिला पतीचे संपूर्ण सहकार्य लाभले . दोन्ही मुली देखील खूप समंजस व शांत आहेत. अशा प्रकारे महिन्यातून तीन चार क्लासेस सुरवातीला होत.त्यामध्ये केक्सचे विविध प्रकार, ब्रेड,बिस्कीट,पिझ्झा बेस,पंजाबी व आइस्क्रीम करायला ती शिकवत असे.
कांचनने सोशल मीडिया चा सूयोग्य वापर करून फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जाहिरात द्यायला सुरुवात केली. ही सर्व तांत्रिक बाजू तिचे पती तुषार सांभाळत होते.हळूहळू क्लासेस चा जम बसत गेला.शिकून गेलेले विद्यार्थी एकमेकांना सांगत. अशा पद्धतीने अनेक विद्यार्थी अगदी गावापासून ते शहरापर्यंत तिच्या कडे आवडीने शिकायला येत असत.
विशेष म्हणजे कॉलेज मधील मुलं, मुली, गृहिणी ते थेट वयस्कर लोकांपर्यंत ती सगळ्यांना अगदी मनापासून शिकवते.
सहावीत शिकत असलेली मुलगी ते थेट ७२ वर्षांच्या या हौशी आज्जीनी देखील तिचे क्लासेस केले आहेत.आज पर्यंत ४ हजार हून अधिक लोकांना तिने ज्ञान दिले आहे.सातारा,बारामती,
कोल्हापूर,तुळजापूर, पंढरपूर,गुजरात,
हरियाणा वरून देखील लोकांनी येऊन तिचे क्लासेस केले आहेत.
कांचनकडून शिकून गेलेल्या अनेकांनी स्वतःचे क्लासेस सुरू केले आहेत तर काहींनी केक्सचे दुकान थाटले आहे. अनेक जणी घर बसल्या ऑर्डर्स घेऊन पूर्ण करत आहेत. अनेक जणींचा व्यवसाय आज मोठया प्रमाणात चालू आहे.उत्तम दर्जा,चविष्ट पदार्थ व स्वछता असल्याने अनेकींना उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे त्या आवर्जून कांचनला संपर्क करून सांगतात. कोरोनाच्या काळात सर्व ठप्प झाले असताना अनेक कुटुंब या व्यवसायावर आपले घर चालवत होते त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली नाही व या अतिशय बिकट परिस्थिती या व्यवसायामुळे त्यांच्या कुटुंबाला मोलाची साथ लाभली असे सांगताना घरातल्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरंगतात.
कोणतेही शिक्षण कधीही वाया जात नाही ते असे.त्या शिक्षणाचा कधी व कोणत्या प्रकारे भविष्यात उपयोग होऊ शकतो हे आपल्याला देखील माहीत नसते म्हणून सतत काहीतरी नवीन, आपल्याला आवडेल ते अवश्य शिकले पाहिजे व सतत नाविन्याची कास धरली पाहिजे. कारण बदल ही काळाची व परिस्थितीची गरज आहे.जो स्वतःमध्ये बदल घडवतो तोच टिकतो तग धरू शकतो.
गुरुपौर्णिमेला अनेक विद्यार्थी कांचन ला आवर्जून भेटायला येतात.त्यांचा आत्मविश्वास व आनंद पाहून कांचनला देखील खूप समाधान वाटते.
अनेक महिला, गृहिणी उत्तम स्वयंपाक करतात मात्र त्या आपली रेसेपी इतरांना सांगत नाही. कारण त्यांना भीती असते की त्या स्वतः व्यवसाय करून मार्केट मध्ये त्यांच्या स्पर्धक होतील म्हणून. मात्र कांचनचे या उलट मत आहे. तिने तिचे काम हा फक्त एक व्यवसाय म्हणून न पाहता महिलांना रोजगाराची जणू एक संधी उपलब्ध करून दिली आहे . या महिला देखील स्वतः क्लास घेऊन ही साखळी पुढे नेण्याचे मोलाचे काम करत आहे.
पुण्यात बेकिंगचे कमी प्रमाणात क्लासेस घेतले जातात.यु ट्यूब वर बघून अनेकांना जमते असे नाही .सखोल ज्ञान, प्रशिक्षण व माहिती घेतली की घरीच ते पदार्थ अगदी हॉटेल सारखे बनवले जातात. त्यामुळे पैशांची बचत तर होतेच व हॉटेल सारखे पदार्थ घरच्या स्वच्छ वातावरण केले जातात ज्याला चवही असते व प्रेमाची जोडही लाभते .त्या गृहिणीचे कौतुक होते ते वेगळे.
सर्व कुटुंब आनंदी होते. शेवटी म्हणतात ना पतीच्या अथवा घरच्यांच्या हृदया पर्यंत पोहचायचे असेल तर तो रस्ता पोटातून जातो ते बहुदा यासाठी.मन प्रसन्न की घर प्रसन्न.
आजकाल लहान मोठे समारंभ असो ,केक शिवाय सेलिब्रेशन होत नाही .त्यामुळे काळाची गरज लक्षात घेऊन
“जशी मागणी तसा पुरवठा” केला तर घरात बसून हा व्यवसाय सहज करता येतो.
पंजाबी डिश ची ग्रेव्ही प्रिमिक्स जर आधीच करून फ्रीज मध्ये ठेवली तर वेळेला अथवा अचानक पाहुणे मंडळी आली तरी झटपट घरची सकस, चविष्ट भाजी अवघ्या १५ ते वीस मिनिटात करता येते. त्यामुळे घरीच मस्त गप्पा गोष्टी मारत भोजनाचा आस्वाद घेता येतो.
व्यवसाय कोणताही असो, कष्ट,चिकाटी ही लागतेच.तिचे संपूर्ण दिवसाचे देखील क्लासेस असतात. म्हणजे सकाळी १०.०० पासून ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. आधी पदार्थ कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले जाते व नंतर काही शंका अथवा प्रश्न असेल तर त्याचे निरसन केले जाते.सर्व नोट्स लेखी स्वरूपात पुरवल्या जातात.
कांचनच्या केक्स व कुकिंग क्लासेस सरकार मान्यताप्राप्त आहेत. बेकरी आणि कन्फेकशनरी मध्ये दहा दिवसाचा डिप्लोमाच्या अभ्यासक्रमात फोंडंट केक्स, कप केक्स, ब्राऊनीज,icing तंत्र,पफ पेस्ट्रीज,बेसिक टू अँडव्हान्स केक,बिस्कीट चे अनेक प्रकार,ब्रेड,पिझ्झा डोनट्स,पिझ्झा, मॅकरॉन्स, चॉकलेट्स पर्यंत सर्व शिकवले जातात.या कोर्स मध्ये डिप्लोमा पुस्तिका व सरकारी प्रमाणपत्र दिले जाते.
इतर कोर्सेस मध्ये सिझ्झलर्स,हॉटेल सारखी पंजाबी ग्रेव्ही,आइस्क्रीम,कुल्फी,मस्तानी,
फालुदा,मिल्कशेक, mocktail,muffins, फ्रोझन स्टार्टर असे अगदी पारंपरिक मोदकांच्या पासून ते अगदी हॉटेल मधील सर्व चमचमीत चटपटीत आधुनिक पदार्थां पर्यंत जे आजच्या मुलांना अतिशय प्रिय आहेत असे सर्व पदार्थ शिकवले जातात.एकाच छताखाली सर्व काही.
पदार्थांची अरेंजमेंट कशा पद्धतीने करावी तसेच बेसिक पासून ते थेट मार्केटिंग अथवा स्वतःचा व्यवसाय कशा पद्धतीने करावा याचे देखील ज्ञान दिले जाते.
कांचन गोरे ह्यांच्या कूकिंग क्लासला आज पाच वर्षे झाली आहेत पण या पाच वर्षात खूप मोठी उंची गाठली. पुण्यात मध्यवर्ती भागात हे गव्हर्नमेंट ऑथोराईज ट्रेनिंग सेंटर आहे व येथे रितसर बेकिंग व कूकिंग चे प्रशिक्षण दिले जाते.१ दिवसाचा कोर्स ते दहा दिवसाचा डिप्लोमा अशा प्रकारचे १८ वेगवेगळे बेकिंग व कूकिंग क्लासेस येथे घेतले जातात.
महिलांबरोबर काही पुरुष मंडळी अथवा मुलं देखील शिकायला येतात. कारण ही देखील आजच्या आधुनिक काळाची गरज आहे.
जी मुलं एकटी शिक्षण अथवा नोकरी साठी बाहेरगावी किव्हा परदेशात जातात, त्यांना याचा खूप उपयोग होतो. किमान चपाती ,भाजी करता आली अथवा असे काही वेगळे पदार्थ करता आले की कोणताही त्रास होत नाही व उपाशी रहाण्याची वेळ येत नाही.
कोरोनाने हेच शिकवले स्वावलंबी असणे किती महत्त्वाचे असते याची प्रचिती कोरोनाच्या काळात आली.कधी कोणती वेळ येईल हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे जर आत्मनिर्भर जीवन जगायचे असेल तर किमान स्वतः पुरता स्वयंपाक करता आला पाहिजे मुलांना व मुलींना देखील.
प्रत्येक वेळी हॉटेल मध्ये जाणे शक्य नसते. पोटाचे विकार होऊ शकतात. पैसे कमावण्याच्या नादात स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करता येत नाही कारण उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.
कांचनला देश विदेशात फिरायला, हॉटेल मध्ये शेफला भेटून त्यांच्या पदार्थांची माहिती करून घ्यायला व शिकायला खूप आवडते.
सर्वांना पोटभर खाऊ घालून जेव्हा ते तृप्त होतात तेव्हा नकळत ते चेहऱ्यावरील हसू व भरभरून दिलेले आशीर्वाद हीच तिच्या कामाची पोच पावती आहे.ते कौतुकाचे शब्द दहा हत्तीचे बळ देतात व पुन्हा जोमाने काम करण्याचे प्रेरणा देतात असे तिचे मनस्वी मत आहे.नुसते बसून वेळ वाया घालविण्यापेक्षा वेळेचे उत्तम नियोजन व सदुपयोग केला तर अशक्य काही नाही.
फक्त पैशांसाठी नव्हे तर लोकांशी जोडून राहिल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. नवी नाती जोडली जातात. नात्यांची नवी वीण तयार होते. त्यामुळे भविष्यात जेव्हा मुलं मोठी होतात व ते आपल्या कामात व्यस्त असतात तेव्हा ही कला,हे काम आपल्याला एकटेपणा जाणवून देत नाही व काहीतरी केल्याचे समाधान व आनंद तर पैस्यात देखील मोजता येत नाही ना ?असे सांगताना कांचन खूप भावूक होते.
कांचंचे पती तुषार ,कौतुकाने सांगतात की कांचनचे प्रत्येक कामात परफेक्शन असते. ती अगदी मनापासून काम करते.ती नेहमीच आपले शंभर टक्के देते. तसेच निटनेटकेपणा,
टापटीपणा व स्वछता सर्व सांभाळते हेच तिच्या यशाचे रहस्य आहे .काम व घर यांचा ती समतोल साधते. तुषारला तिच्या कामाचे कौतुक तर आहे व आपल्या जोडीदाराचा अभिमान ही वाटतो.
कांचन सांगते की, पती तुषारने तिला खूप सहकार्य केले व आजही करत आहे. तेच तिचे प्रेरणास्थान आहे. तुषारची साथ नसती तर हे काम शक्य नसते. कारण क्लास चालू असताना मुलींची व घरची जबाबदारी तो सांभाळतो.आज ती या क्षेत्रात उंच भरारी घेत आहे व यशस्वी वाटचाल करत आहे.
असे हे जोडपं आजच्या तरुणांना एक आदर्श उदाहरण आहे.संसार हा दोघांचा असतो. जर पत्नीला आपल्या पतीच्या प्रगतीचा आनंद व अभिमान वाटतो तर तसाच अभिमान पुरुषाला देखील आपल्या पत्नीबद्दल वाटला पाहिजे व पुढे जाण्यासाठी तिला ही साथ दिली पाहिजे आवर्जून मदत केली पाहिजे. तिच्या कामाचा, तिच्या कलेचा आदर केला पाहिजे तेव्हा त्या स्त्रीचा प्रवास फक्त चूल व मुलं न होता एक उद्योजिका पर्यंत येऊ शकतो असा आत्मविश्वास तिच्या मध्ये निर्माण होऊ शकतो .ज्यामुळे केवळ तिचेच नाव नव्हे तर सासरचे नाव मोठे होते.
अशा ह्या मेहनती हसतमुख कांचनला तिच्या भावी स्वप्नपुर्ती साठी अनेक अनेक शुभेच्छा.
लेखन: रश्मी हेडे ,सातारा
संपादन: देवेंद्र भुजबळ
☎️9869484800