जेष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबीर,
लातूर, दि. ०१ : दरवर्षी ०१ ऑक्टोंबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून आज लातूर जिल्हा क्रिडा संकुल येथे सकाळी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालय, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि अपोलो मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने जेष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीर झाले. तसेच समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयात आधारवड कृतज्ञता सोहळा झाला. या दोन्ही कार्यक्रमांना ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आरोग्य शिबिरामध्ये ११२ जेष्ठ महिला व पुरुष यांनी सहभाग नोंदवून आरोग्याची तपासणी करून घेतली. या आरोग्य तपासणी शिबीरामध्ये रक्तदाब, मधुमेह, हृद्यरोग इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक हनुमंत किणीकर, अपोलो मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज कदम, डॉ. गिरी दोन्ही हॉस्पिटलमधील यांच्यासह परिचारिका, फार्मासिस्ट व इतर कर्मचारी आणि समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयातील कर्मचारी यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश धादगीने होते. समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तेजस माळवदकर यावेळी उपस्थित होते. श्री. देवसटवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी जेष्ठांसाठी शासनाचे अधिनिमय, शासन निर्णयाची व जेष्ठांच्या योजनाची माहिती दिली.
जेष्ठ नागरिकांचा सत्कार व कृतज्ञता सोहळा
या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील उपस्थित ३० जेष्ठ नागरिक यांचा आधारवड कृतज्ञता सोहळा म्हणून मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. आशिष चेपुरे यांनी जेष्ठांच्या आरोग्याविषयी माहिती दिली. तसेच जेष्ठांनी नियमित व्यायाम करणे, सकस आहार घेणे याबाबत मार्गदर्शन केले. जेष्ठ नागरिक कार्यकारणी समितीचे सदस्य बी.आर.पाटील यांनी जेष्ठांना येत असलेल्या अडीअडचणी मांडल्या.
समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभाग ज्येष्ठ नागरिक संचाचे अध्यक्ष दामोदर थोरात, सचिव जगदीश जाजू, दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या महिला आघाडी अध्यक्ष माया कुलकर्णी, लातूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर.बी.जोशी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण धायगुडे यांनी केले. नागेश जाधव यांनी आभार मानले.