सिनेमा सिनेमा
‘ओम राऊत’ आज जे बोललेत त्यावरून असं वाटतंय, कि आदीपुरुष पडद्यावर येण्याआधी जनक्षोभ पाहून काही बदल केले जातील.
त्यांची ही भूमिका स्वागतार्ह आहे.यात काही कमीपणा नाही. कुणी कितीही काड्या केल्या तरी राऊत तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम रहा.
आज त्यांच्याबरोबर आलेले मनोज ‘मुंतशिर’ नावाचे उत्कृष्ट शायर ,कवि , विद्वान लेखक ज्यांनी आदीपुरुषचे डायलॉग व गाणी लिहिली आहेत ते या चुकीची भलामण करण्याच्या प्रयत्नात होते.मनोजजी जानवं घातलं आणि त्रिपुंड्र लावलं तरी तुमचा रावण काही आपल्या रामायणातला रावण वाटत नाही.या ठिकाणी मला सैफ़ अली खानच्या धर्माबद्दल काही म्हणायचं नाही.कलाकार एखाद्या भूमिकेत कलाकार म्हणूनच पहावा.तसा त्यानं केलेला ‘ओमकारा’ मधला ‘लंगडा त्यागी’ मला आवडला होता.अत्यंत समर्थपणे ते निगेटिव्ह कॅरेक्टर त्याने उभं केलं होतं.’तैमूर’ प्रकरणाने वादग्रस्त झालाय असो !
अजूनही एक खूप जुना चित्रपट आठवतोय तो म्हणजे ‘संघर्ष’.काशीच्या लुटारू ठगांची ( ब्राह्मण होते ते ) सूडकथा होती ती . वयोवृध्द पुजा-याची भूमिका केली होती अमजद खानचे वडील ‘जयंत’ यांनी आणि त्यांच्या नातवाची भूमिका केली होती अभिनय सम्राट दिलिप कुमार यांनी.विषय एवढा स्फोटक , त्यात कलाकार मुसलमान पण बघणा-यानं शपथेवर सांगावं हे दोघं ब्राह्मणच आहेत म्हणून.आजही तो सिनेमा कुठेतरी लागतो काही रसिक पाहतातही.कुठेच गडबड होत नाही.त्यात पुन्हा संजीव कुमार , बलराज सहानी , वैजयंतीमाला,महंमद रफ़ी व लताबाई अजून काय हवं? परंतु या मागे भूमिकेला अनुरुप सगळे दिसत होते हे महत्वाचे कारण आहे.हा रावण तसा दिसत नाही हो.रावण दरबारात गेल्यानंतर हनुमानाला रावण किती तेजस्वी दिसला होता व रामालाही तो प्रथमदर्शनी किती मोहक वाटला याचं वर्णन वाल्मिकी रामायणात आहे.
बरं तुम्ही म्हणता रावण जेवढा वाईट दाखवता येईल तेवढा दाखवला पाहिजे पण रावणातला वाईटपणा नेमका काय होता? चार वेद व सहा पुराण जाणणारा प्रकांड पंडित,थोर शिवभक्त ,ज्याला शिवाने आत्मलिंग दिलं ( गोकर्ण महाबळेश्वरात आहे ),शिवतांडव रचणारा, रुद्रवीणा पारंगत, आयुर्वेदावर ‘अर्कप्रकाश’ व रावण संहिता लिहिणारा ज्योतिषी व महापराक्रमी पुरुष सामर्थ्याने मातला, अहंकाराने देवांचा शत्रू झाला.शेवटी परस्त्रीच्या मोहाने अध:पतीत झाला.हा त्याचा वाईटपणा पण सीता एकटी, असहाय्य असताना तिच्यावर कुठलाही अतिप्रसंग न करणारा,तिच्या होकाराची वाट बघणारा, त्याचं पांडित्य वगळून त्याचा फक्त वाईटपणा व क्रूरपणा दाखवणारा चेहरा मान्य होईल?
रामायणात शेवटी रावण मृत्यूशय्येवर असताना राम आणि लक्ष्मण त्याच्याकडून राजकारण व जीवनविषयक ज्ञान घेतात असं वर्णन रामायणात आहे.प्रभू श्रीरामचंद्रांच्या व्यक्तिमत्वाचं अलौकिकत्व सांगणारा हा प्रसंग आहे.स्वभार्येचं हरण केलेल्या शत्रूकडे असलं तरी ज्ञान विटाळत नाही.ते ग्रहण करावं असा आग्रह ते लक्ष्मणाला करतात.आता इथं फक्त क्रूर दिसणा-या या रावणाकडून कसं ज्ञान मागितलं असेल ? कि तो प्रसंगच नाही या चित्रपटात?
बाकी हनुमंत आणि बाकीचे वानर मिळून ते प्लॅनेट ऑफ एप्स काही बरं वाटतं नाही…हनुमंताच्या दर्शनाने भक्तिभावाने बघणा-याचं मन पुलकित झालं पाहिजे.ज्याच्या हृदयात रामरूपी भगवान विष्णू आहेत तो कसा दिसावा? तुम्हीच विचार करा मनोज जी. का?भुललासी वरलीया रंगा. हे माणसांसाठी आहे.देव देवांसारखेच दिसले पाहिजेत.ते श्रद्धा या अत्युच्च मानवी भावनेचं साकार रूप आहे.
राम आणि त्याचे सिक्स पॅक व मिशा या विषयी काही म्हणायचे नाही. मर्यादा पुरुषोत्तम तुम्हाला कसा दिसतो? तसा विचार करून दाखवा.होय वनवासात असताना असलेली दाढी अयोध्येत आल्यावर काढली असं वाल्मिकी रामायणात लिहिलंय म्हणता, तुम्ही मिशीवर भागवलंय. ठीक आहे. दाढी हनुमान आणि आला हज़रत यांना भरपूर दाखवली आहेच.
तुम्हाला रामकथा नव्या पिढीसमोर न्यायची आहे कबूल आहे पण ती तिच्या गुणवैशिष्ट्यांसह न्या.सद्ध्या जगाच्या सांस्कृतिक सरमिसळीत त्यांना आपली ओळख मिळेल. एवढं लाकूड कातण्याचं कारण…
सुतार सद्ध्या रिकामा आहे….😀
– अजय पांडे, लातूर.