सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांचा विश्वास; मांजरा परिवारात नवा कारखाना दाखल; उत्साहाच्या वातावरणात कंचेश्वर शुगरचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न
—
लातूर / तुळजापूर : कंचेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून धाराशिवमधील शेतकऱ्यांचा विकास करण्याची संधी मांजरा परिवाराला मिळाली आहे. त्यामुळे लातूरप्रमाणेच धाराशिवमध्येही आम्ही परिवर्तन करून दाखवू. येणाऱ्या काळात कंचेश्वर शुगरच्या माध्यमातून आदर्श कारखाना कसा असतो, याचा वस्तुपाठ आम्ही घालून देऊ, असा विश्वास सहकारमहर्षी, माजी मंत्री श्री. दिलीपराव देशमुख यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.
मांजरा परिवारात नव्याने दाखल झालेल्या तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ (जि. धाराशिव) येथील कंचेश्वर शुगरचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सहकारमहर्षी, माजी मंत्री श्री. दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व ‘लातूर ग्रामीण’चे आमदार, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. धिरज विलासराव देशमुख, सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

माजी मंत्री श्री. दिलीपराव देशमुख म्हणाले, धाराशिव लातूरचा मोठा भाऊ आहे. धाराशिवसोबत विलासराव देशमुख आणि देशमुख कुटुंबीयांचे जुने नाते आहे. त्यामुळे येथे कंचेश्वर शुगरच्या माध्यमातून समाजकारण करू. शेतकर्यांना केंद्रभागी ठेवून कंचेश्वर शुगरची वाटचाल सुरू राहील. येथील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. मांजरा परिवाराप्रमाणेच येथील शेतकऱ्यांना चांगला भाव देऊ. सर्वांना सोबत घेऊन शेतकरी, कामगार, साखर कारखान्याचे हीत साधण्याचा आमचा प्रयत्न असेल.
शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करू :
आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, दुष्काळी भागातील शेतकरी ताठ मानेने जगला पाहिजे, तो आर्थिक सक्षम झाला पाहिजे, या विचाराने माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूरमध्ये मांजरा साखर कारखान्याची उभारणी व विस्तार केला. यामुळे लातूर जिल्ह्याचा विकास झपाट्याने झाला. हा विकास इथल्या भागातही व्हावा, यासाठी मांजरा परिवाराचे युनिट येथे सुरू व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती. यानुसार कंचेश्वर कारखान्याच्या रुपाने मांजरा परिवारातील नवा कारखाना येथे सुरु होत आहे, याचा आनंद आहे. या कारखान्याच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षा येणाऱ्या काळात पूर्ण करू.
यावेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, लातूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. श्रीपतराव काकडे, मुकुंदराव डोंगरे, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्याम भोसले, संभाजी रेड्डी, सतीश पाटील, जागृती शुगर चे जनरल मॅनेजर गणेश येवले, कंचेश्वर शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जाधव, वर्क्स मॅनेजर अजित कदम, आर. के. कदम यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व उस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—

कंचेश्वर कारखान्याची वाटचाल नेत्रदीपक असेल – धिरज देशमुख
अवर्षणामुळे कारखानदारीत अडचणी येत असल्या तरी आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे कंचेश्वर साखर कारखान्याचीही वाटचाल मांजरा परिवारातील इतर साखर कारखान्यांप्रमाणेच नेत्रदीपक राहील, असा विश्वास आमदार श्री. धिरज देशमुख यांनी व्यक्त केला.
—