लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना
लातूर, दि. 17( माध्यम वृत्तसेवा) : –विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर शहर विधानसभा मतदारसंघ आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत नियुक्त करण्यात आलेले सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि विविध पथकांचे नोडल अधिकारी यांच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला. तसेच निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीला लातूर ग्रामीण मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी, लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सौदागर तांदळे, डी.एम. काळे, गणेश सरोदे, लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा भगत यांच्यासह पोलीस प्रशासन व इतर विभागाचे अधिकारी, सर्व क्षेत्रीय अधिकारी सर्व नौदल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आलेल्या अडचणी लक्षात घेऊन सर्व नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांनी आपल्या कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करावे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क राहून काम करावे. तसेच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध पथकांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. विशेषतः स्थिर निगराणी पथके आणि भरारी पथकांनी निवडणूक काळात कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी दक्ष रहावे. कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास तातडीने कार्यवाही करून, त्याबाबतचा अहवाल संबंधित नोडल अधिकारी यांना सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून या निवडणुकीमध्ये सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मतदार जागृतीवर भर देण्यात यावा. तसेच मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनीही आपले मतदानाचे कर्तव्य बजावावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले. तसेच मतदान केंद्रांवर मतदारांसाठी किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रांवर मतदारांची गैरसोय होवू नये, यासाठी सर्व संबंधितांनी समन्वय ठेवून काम करावे, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि विविध पथकांचे नोडल अधिकारी यांच्या कामकाजाचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच त्यांना अनुषंगिक सूचना देण्यात आल्या.