खूप दिवसांपासून जमेल तशी कविता,चारोळी ,स्फुटलेखन करतोय….पण, कविता सादर करण्याची संधी मिळूनही ती मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे सादर करु शकलो नव्हतो…पण ,काल गुरुवारी इचलकरंजी पञकार कवि मंचच्या वतीने आयोजित केलेल्या काव्य संमेलनात माञ मला माझी मुक्त छंदातील स्वरचित कविता सादर करण्याची संधी मिळाली… यातून मिळालेला आनंद हा मनस्वी तर होताच पण पुढच्या वाटचालीसाठी मोठा आत्मविश्वास देणारा ठरला…विशेष म्हणजे हक्काचं व्यासपीठ,हेच मनाला करतं नीट ,याचाही प्रत्यय यानिमित्ताने घेता आला…
उधळू फुले प्रकाशाची
अंधाराच्या वाटेवरी ,
याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून
सामाजिक आशय ही आग्रही भूमिका घेत या काव्य संमेलनाचे आयोजन करुन इचलकरंजी श्रमिक पञकार संघ व इचलकरंजी प्रेस क्लब या दोन्ही पञकार संघटनांनी साहित्य क्षेत्राच्या विकासाबरोबरच शाश्वत सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला बळ देण्यात मोठा वाटा उचलला आहे,यात तिळमात्र शंका नसावी….या सामाजिक उपक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक ,कवी – पञकार , सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेत्यांचे लाभलेले मार्गदर्शन व सर्व पञकार बंधूंचे मोठे सहकार्य निश्चितच कौतुकास्पद ठरले आहेत…
या काव्य संमेलनात आपल्या अवतीभवतीच्या घटनांचा मागोवा घेत सामाजिक स्वास्थ्य बिघडवणा-या व्यवस्थेला मुक्तछंदातील
माझ्या स्वरचित काव्यातून एक खडसावून प्रश्न विचारावा वाटला ,तो म्हणजे असा ,
माणूस, आहोत ना आपण ?
पुस्तकातल्या ज्ञानाने शिकून सवरुनही
शहाणपणाला देत राहतो मूठमाती
स्वार्थासाठी करतो आपल्याचांच घात
मग् वाटतं, माणूस आहोत ना आपण..?
कायद्याला बिनदिक्कत पायदळी तुडवत
वासनांध बनून घालत राहतो
आया-बहिणींच्या इज्जतीला हात
मग् वाटतं, माणूस आहोत ना आपण…?
वंशाचा दिवा हवा म्हणून
ज्योतच विझवून टाकतो आपण
हि कसली असते माणुसकीची जात ?
मग् वाटतं, माणूस आहोत ना आपण…?
नुसताच तोंडानं माणुसकीचा बोलबाला
यातील आचरण नसतेच काही
वेळप्रसंगी एकमेकांचा जीव राहतो घेत
मग् वाटतं, माणूस आहोत ना आपण…?
लोकशाहीच्या या देशात आम्हाला
भ्रष्टाचार, अविश्वासानेच पुरते घेरले
कशी करावी या संकटांवर मात
मग् वाटतं, माणूस आहोत ना आपण…?
शिक्षणाचा मुलभूत हक्कच कोसोदूर
आर्थिक शोषण झाला अलिखित कायदा
यातूनच संस्थाचालक धुवून घेतात हात
मग् वाटतं, माणूस आहोत ना आपण…?
मस्तवाल गुंडांना राजकीय वरदहस्त
म्हणूनच चालतो त्यांच्या कारनाम्यांचा धुमाकूळ
दुर्देव हेच,पोलीस कारवाईसाठी बांधतात हात
मग् वाटतं, माणूस आहोत ना आपण…?
जातीयतेचा अंगाला रंग फासून
मनेही भडकावतात एकमेकांची
इथेच होतो समतेचा, शांततेचा अंत
मग् वाटतं, माणूस आहोत ना आपण…?
आता विचार व्हावा या सगळ्याचा
काय चूक अन् काय बरोबर ?
अविचारांना कायमचं दूर सारत
जगावं समाजाच्या भल्यासाठी माणूस म्हणून…!
- सागर बाणदार
मो.८८५५९१५४४०