साहित्य संवाद
२० जून १९६६ ला मी जि प प्रा शाळा तळेगाव ता.चाळीसगाव जि जळगाव या शाळेत दाखल झालो होतो.माझे वडील अप्पासाहेब यांंची जिल्हा परिषद जळगाव येथून तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली होती.सुरुवातीला अप्पासाहेब एकटेच तळेगावी गेले होते.नंतर माझी आजी अंबाबाई आणि मी अप्पांनी घरभाड्याने घेतले तेव्हा राहायला गेलो होतो.तळेगावला जाण्यासाठी चाळीसगावला रेल्वे पँसेजरने जळगावहून आजीसोबत पहिलाच रेल्वे प्रवास होता.कोळश्यावर चालणा-या या अगिनगाडीत आयुष्याचा पहिला प्रवास मी अनुभवला होता.मनाने मी हवेतच उडत होतो.हिरापूर स्टेशनला गाडी थांबली .तिथे उतरलो.पहिल्या प्रवासाचा आनंद मनात मावत नव्हता.आजी, मी अप्पा आम्ही तळेगावी जाण्यासाठी एस टी ने पुन्हा प्रवास केला आणि पोहचलो तळेगावला.नदीच्या अलिकडे आणि पलीकडे टुमदार असे तळेगाव वसलेले.निसर्गरम्य असलेले हे खेडे मनाला स्पर्शून गेले.

पहिल्यांदाच नदीचा स्पर्शही मी या गावी अनुभवला.पुल्लंकित झालो.खेड्यातले जनजीवन प्रथमच अनुभवत होतो .सुखावूनही जात होतो.घराच्या पाठीमागे तांडा वस्ती होती.तांड्यातली माणसे पारंपारिक वेषभुषेत पहायचो.त्यांना पाहून आनंदीही व्हायचो.निर्मळ मनाची माणसे तिथे अनुभवली.लहान वयातच काही माणसे मनात घर करुन गेली.शेजारचे,एकनाथ काका,कांबळे गुरुजी,भटू लोहार,मेश्राम सिस्टर,बबलू माझा नवा मित्र,शेजारची मंडा काकी, असे माझे छोटेसे भावविश्व होते.आजी रोज मला हवे ते खाऊ घालायची.अप्पा खूपच लाडही करायचे. एकत्र कुटुंब होते.शाळा सुरु झाल्या होत्या.माझी आई चमेली,मोठे भाऊ सुर्यकांत,मोठी बहिण विजयाताई,लहान भाऊ संजय हेही सर्वजण तळेगावी आले.घरात पुन्हा नवा आनंद संचारला.मोठे भाऊ- बहिण चौथी पाचवीत दाखल झाले आणि नियमित शाळेत जाऊ लागले.लहु,विजय कांबळे गुरुजींची मुले भाऊंच्या सोबत एका वर्गात होती.संध्याकाळचे जेवण झाले की आम्ही सारे सर्व लहान मुले कांबळे गुरुजींकडे जमा व्हायचो.गोष्टी सांगायचे ,कविता पाठ करुन घ्यायचे.”येरे येरे पावसा तुला देतो पैसा ” ही पहिली कविता मी ऐकली आणि भरपावसात भिजताना अनुभवलीही.कवितेची गोडी अशी माझ्या मनात भिजत गेली.सकाळची शाळा.मला सकाळी उठायचा कंटाळा.या कंटाळ्यामुळे आणि मला शिकवायला असलेल्या मुछदार गुरुजींच्या भितीमुळे मी शाळेत गेलोच नाही.सतत गैरहजर म्हणून शाळेतून नाव कमी.असा शालेय दाखला घेऊनच मी तळेगाव सोडले.

नंतरच्यावर्षी वडिलांची बदली एरंडोलला झाली पुन्हा जून१९६७ जीवन शिक्षण प्राथमिक शाळा एरंडोल येथे प्रवेश घेतला आणि नव्याने शालेय प्रवासाला सुरुवात झाली.जळगाच्या ला ना हायस्कुल मध्ये,एम जे महाविद्यालय,नूतन मराठा महाविद्यालय,बुलढाणा जिजामाता महाविद्यालय,शासकीय अध्यापक महाविद्यालयात शिकत गेलो.आणि 5 आँगष्ट 1986 ला पुन्हा शिक्षक म्हणून कोठारी विद्यालयात शिक्षक म्हणून दाखल झालो.तिथूनही एम पी एस पी परीक्षा देऊन पुन्हा शाळेतून निसटलो.पण आयुष्यभर शाळा काही सुटली नाही.गटशिक्षणाधिकारी,प्रकल्प अधिकारी,शासकीय माध्यमिक प्राचार्य, शिक्षणाधिकारी, विभागीय सचिव लातूरबोर्ड येथे सेवा संपन्न केली. आज अस्ताव्यस्त घर व्यस्थित लावत असताना प्रशांत गायकवाड या तळेगावी हायस्कूल मध्ये शिक्षक असलेल्या मित्राने जळगावी शिक्षणाधिकारी असताना माझा तळेगावचा शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाधिकारी होतो.म्हणून गाव आणि शाळेच्यावतीने मानपत्र देऊन सत्कार केला होता.ते अडगळीतले मानपत्र मी पुन्हा आनंदाने माझ्या घराच्या प्रवेश दारावरच बसवून घेतलेय.घरात येता जाता मी तळेगाव येथील माझी पहिली शाळा आणि तिथे झालेला माझा हृद सत्कार आठवत असतो.मनात सुवर्ण आठवणींच्या पानांसारखा जपत राहतो.

शशिकांत हिंगोणेकर
7218792186