आज रामेश्वर येथे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते ‘पूर्णब्रह्मयोगिनी
त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड जीवनगौरव पुरस्कार’ वितरण सोहळा
लातूर दि.२६ :- विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे तर्फे आयुष्यभर समाजप्रबोधन, सांप्रदायिक सेवाभावी कार्य, समर्पित व निरपेक्ष भावनेने काम करून समाजासमोर आदर्श निर्माण करणार्या थोर तपस्विनी पंचकन्याना २७ मे २०२२ शुक्रवार रोजी सकाळी १०.३० वाजता लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर येथे लोकसभेचे माजी सभापती व माजी केद्रीय गृहमंत्री मा.श्री. शिवराज पाटील चाकुरकर आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपती व जगप्रसिद्ध संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार” वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या नवव्या पुण्यस्मरण स्मृती दिनाचे औचित्य साधून ज्ञान विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून आयुष्यभर समाज प्रबोधन व सांप्रदायिक सेवाभावी कार्य समर्पित व निरपेक्ष भावनेने अविरतपणे करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील थोर तपस्वी सतीसातवी अशा कुलीन पंचकन्याना पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार” देण्यात येणार असून यात समाज सेवा संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक व पुणे येथील पुण्यधाम आश्रमाच्या अध्यक्षा माता कृष्णा कश्यप, ज्येष्ठ समाजसेविका व थोर तपस्विनी श्रीमती शशिकला भिकाजी केंद्रे, सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व ज्येष्ठ समाजसेविका डॉ. तेजस्विनी जनार्दन वाडेकर, निवृत्त प्राचार्या व आपुलकी या संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. ललिता शरद (नानासाहेब) गुप्ते आणि ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती लक्ष्मीबाई महादु शेळके यांचा समावेश आहे.
सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख रु. २१,०००/- (रुपये एकवीस हजार) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार, दि. २७ मे २०२२ रोजी, सकाळी १०.३० वा. रामेश्वर (रूई), ता.जि. लातूर येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. आय. टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असणार आहे.
या जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त राहुल विश्वनाथ कराड व एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड यांनी दिली.