जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने
आजची आधुनिक स्त्री हिरकणीचे प्रतीक आहे.जुने व नवे ह्याची सांगड घालून तिने जणू सुवर्णमध्य साधला आहे. त्यामुळे ती समतोल राखू शकते.
आपले सण – समारंभ,चाली – रीती आपल्या परंपरा जपण्याबरोबर स्वतःची व घरच्यांची हौस मौज ही ती करते.
हे सर्व निभावताना त्याचे तिला दडपण वाटत नाही कारण ती घरातील सर्वांना सोबत घेऊन त्याचा आनंद घेते.सर्वांना संघटित करते. सर्व एकत्रित जमल्याने कामाचे नियोजन ही होते .ह्यात लहान मुलांपासून जेष्ठांना सामील केल्याने एक उत्साही व आनंदी वातावरण निर्माण होते.
ती ह्या सर्व गोष्टीना नावीण्याची जोड देते. त्यामुळे सर्वांची मने सांभाळली जातात व सर्व सण अतिशय उत्साहात साजरे होतात.स्त्री सर्वांना एकत्र ठेवण्याचे काम अगदी सहज करू शकते.एकीचे बळ असले की अशक्य गोष्टी देखील शक्य होतात.
स्त्री जी भूमिका निभावते तेव्हा ती आपले सर्वस्व पणाला लावते .हाती घेतलेले काम अगदी प्रामाणिकपणे, शिस्तबद्ध पद्धतीने व वेळेत पार पाडते. तिला यासाठी कोणत्याही पारितोषिकाची गरज नाही. फक्त तुमचे दोन प्रेमाचे शब्द ,ती कौतुकाची थाप तिला दहा हत्तीचे बळ देते.
जेव्हा ती एका मुलीची भूमिका पार पडते तेव्हा ती आपल्या आजी – आजोबा,आई – वडील,बहीण भाऊ ह्यांना आपल्या मायेने आपलंसं करते.ती आपली जबाबदारी अगदी चोख निभावते.
जेव्हा लग्न होऊन सासरी येते, तेव्हा ही स्त्री सासर व माहेर ह्यांना जोडून ठेवते आणि हे केवळ स्त्रीलाच शक्य आहे.लग्न झाल्यावर आपले सासू – सासरे,दिर – जाऊ ,नणंद, भाचे ह्यांना प्रेमाने आपलेसे करते.सर्वांशी एकरूप होऊन ती नाती सांभाळते, ते जपते.
ती आपल्या पतीची अर्धांगणी असते. त्याच्या सर्व सुखात दुःखात वाटेकरी होते. म्हणून तर म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.त्याच्या प्रगतीत तिचा मोलाचा वाटा असतो .तो दिसत नसला तरी तिच्या विश्वासाच्या आधारावर तो आयुष्याची कोणतीही लढाई जिंकू शकतो कारण तिची साथ तिची सोबत नेहमी त्याच्या पाठीशी असते.
आयुष्याच्या वाटेवर कितीही संकटे आली तरी ही अद्भुत, अदृश्य शक्ती कायम त्याचा सोबत असते जी त्याला जगण्याचे बळ देते . त्याच्यातील आत्मविश्वास जागरूक करण्याचे सामर्थ्य केवळ स्त्री मध्ये असते.ती त्याला हरलेले कधीही पाहू शकत नाही. त्याच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करते.
दिसायला कोमल असली तरी ती मनाने खूप खंबीर असते. त्या मानाने पुरुष दाखवत नसले तरी हळवे असतात. एखादे दुःख आले की ते खचून जातात. मात्र स्त्री खंबीरपणे प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकते कारण सहनशीलता हा गुण तिच्यात जन्मताच असतो.ती डगमगत नाही. हार मानत नाही. हिमतीने पुन्हा उभे राहण्याची जिद्द ही स्त्री मध्ये जास्त असते त्यामुळे कदाचित आयुष्याच्या वाटेवर जोडीदार तिला सोडून गेला तरीही ती एकटी देखील आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी उभी राहते .
दुःख पचवण्याची ताकद स्त्री मध्ये जास्त असते.ती कधीही थांबली नाही व कधीही थांबणार देखील नाही ह्याची प्रचिती कोरोनाच्या बिकट काळात तुम्ही पाहिलीच असेल.सर्व जग थांबले होते मात्र ती नाही.
ती काट्याकुपट्यातून वाट काढू शकते मात्र कधीही आपल्या कुटुंबासाठी कोणाची लाचार नसते.ती अत्यंत स्वाभिमानी असते. ती आपल्या मुलांसाठी आई व वडिलांची भूमिका सांभाळू शकते.
मात्र ! पुरुष कधीही स्त्री शिवाय राहू शकत नाही.समाजात अशा अनेक विधवा स्त्रिया आहेत ज्यांनी आपल्या संसाराचा गाडा एकटीने व हिंमतीने ओढला आहे . आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे देखील आहेत.ही शक्ती स्वतः परमेश्वराने केवळ स्त्रीलाच प्रदान केली आहे म्हणून तर त्या महिषासुराचा वध करणारी एक स्त्री होती.
लोकांनी उडवलेल्या चिखलाचा, दगडांचा मारा सहन करून मुलींना शिकवणारी त्यांना स्वावलंबी बनवणारी ती स्त्री सावित्रीबाईं फुलेच्या रुपात होती, स्वराज्याचे धडे देणारी त्या शिवबाला घडवणारी ती स्त्री जिजाऊंच्या रुपात होती, आपल्या बाळाला हृदयाशी घेऊन लढणारी ती स्त्री राणी लक्ष्मीबाईच्या रुपात होती. निर्भीडपणे निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधी ह्याच्या रुपात ती स्त्री होती.
असे अनेक इतिहास तिने रचले आहेत व ह्या पुढे ही रचणार आहे. म्हणून तर प्रत्येक पुरुषाला देखील आपले मस्तक ह्या स्त्री शक्ती पुढे झुकवावे लागते. म्हणजे….. धन प्राप्तीसाठी त्या लक्ष्मीमातेकडे, ज्ञान प्राप्तीसाठी सरस्वती मातेला शरण जावे लागते तर शक्ती साठी त्या कालिका मातेला वंदन करावे लागते. नवरात्रीचे देखील उपवास करणारे अनेक पुरुष आहेत कारण त्या दुर्गेची शक्ती त्यांना लढण्याचे बळ देते.
असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे स्त्री ने आपला ठसा उमटवला नाही.पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याचे सामर्थ्य आज तिच्यात आहे.स्वयंपाकपासून ते बाहेरच्या जगातील व्यवहार ती पहाते.
एका गृहिणीपासून ते एका उद्योजिकेपर्यंत तिची मजल गेलेली आहे.योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ आज तिच्यात आहे. दहा अंगांनी काम करणारी स्त्री अष्टभुजा आहे.
आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करणारी स्त्री उद्याचे देशाचे भविष्य घडवण्याचे मोलाचे कार्य करते.ती त्यांना वेळ देते. त्यांच्या आवडी निवडी जपते. त्यांचे कलागुण जाणून त्यांना योग्य दिशा देते.
आपली जबादारी पार पाडताना आजची स्त्री स्वतःचा देखील विचार करते .स्वतःला वेळ देत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करते. स्त्रीमुळेच घराला खऱ्या अर्थाने घरपण असते.
ती मैत्रीचे नाते देखील खूप छान निभावते .ती हसते. दंगा मस्ती करते. जीवनाचा पुरेपूर आनंद घेते.
तिच्या मायेची वीण ही अशा अदृश्य धाग्याने जोडलेली असते जी सर्व नात्याची एक सुंदर माळ ती विणते व जन्मभर त्याचा सांभाळ करते.
जेव्हा आजच्या काळात ह्या सर्व शक्तीचे संघटन होईल तेव्हा विश्व क्रांती घडेल .हे तेव्हा शक्य आहे जेव्हा स्त्रीला तिच्या शक्तीची जाणीव होईल व ती ह्या दागदागिने,अथवा बाह्य सौंदर्य पलीकडे विचार करून आपल्या अंतरगुणांचा विकास करेल. कारण चांगल्या जगाची निर्मिती करण्यासाठी महिला जागृती परम आवश्यक आहे.
जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्री ला साथ देईल,प्रोत्साहन करेल,तिची प्रेरणा असेल तिच्यातील आत्मविश्वास जागृत करेल तेव्हा तिच्या कलागुणांना न्याय मिळेल. ती स्वतःला ह्या जगात सिद्ध करेल तेव्हा चमत्कार होईल कारण ती स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करेल. तेव्हा ह्या समस्त स्त्री शक्तीचा विजय असेल. तेव्हा ती स्त्री दुसऱ्यांची प्रेरणा असेल.
जेव्हा प्रत्येक स्त्री स्वावलंबी होईल अत्मनिर्भर असेल तेव्हा एक साखळी तयार होईल व तो दिवस लांब नसेल. जेव्हा ह्या समाजाचा आपल्या देशाचा कारभार चालवणारी एक स्त्री असेल व तो दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल. तो दिवस खऱ्या अर्थाने महिला दिन म्हणून साजरा होईल.
ती ममता, ती माता
ती भक्ती,ती शक्ती
ती प्रेम,ती छाया
ती तेजस्वी,ती सरस्वती
ती अन्नपूर्णा,ती अष्टभुजा
ती स्त्री,ती गृहिणी
सर्व जगाची ती जननी
अशा समस्त ‘स्त्री’ ला सलाम.
लेखन – रश्मी हेडे.
संपादन – देवेंद्र भुजबळ.9869484800.