2012 पासून ज्ञान प्रबोधिनीचे मराठवाड्याच्या काळ्या आईसाठीच्या जलसंधारणाचे काम सुरू झाले. विवेकवाडीच्या छोटयाशा क्षेत्रावर जलसंधारणाचे आणि मृदासंधारणाचे प्रयोग करताना एक आत्मविश्वास आलेला होता. गेल्या दहा वर्षांत जवळपास 100 गावात जलसंधारण,मृदासंधारण आणि जलसाक्षरतेचे काम केले. सामूहिक इच्छा शक्ती जागृत केली व संघटित प्रयत्न केले तर खूप मोठे काम उभे राहते याचा खूप चांगला अनुभव आला.
शेतकऱ्यांसाठी शेतजमीन म्हणजे आपल्या आई सारखीच. तो आपल्या शेतजमिनीवर अपार प्रेम करतो. मागच्या वर्षी प्रचंड पाऊस पडला. अंबाजोगाई तालुक्यातील हिवरा गावातील होळणा नदीला चांगलाच पूर आलेला. पाण्याचा वेग प्रचंड होता. प्रवाहात महाकाय वृक्ष नुसतेच उन्मळून पडले नाहीत तर नदीतून वहात जाऊन नदीपात्रातील कोल्हापूरी बंधाऱ्यात अडकली. बंधाऱ्यातुन वाहणारा नदी प्रवाह अशा महाकाय वृक्षानी अडला गेला. याचा परिणाम प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीने आपली दिशा बदलून बाजूच्या शेतातून मार्ग काढला. काढावरील सर्वच शेतकरी अल्पभूधारक. डोळ्यासमोर ते प्रलयंकारी दृश्य पाहत मनातल्या मनात आक्रोश करत होता बळीराजा. सोयाबीनचे ढीगच्या ढीग वाहून गेले. जीवापाड प्रेम जिच्यावर केले त्या काळया आईचा जीव असणारी माती पूर्ण वाहून गेली. होत्याचे नव्हते झाले. त्याही पेक्षा मनात पुन्हा असे झाले तर ही भीती ठाण मांडून बसली.

गावाचे सरपंच काकडे, ग्रामसेवक मामडगे व ग्रामस्थ गिराम यांनी आपली कैफियत मला सांगितली. तसा त्यांना हे मला सांगायला उशीर झाला होता.पाऊस तोंडावर आलेला. काम कसे पूर्ण होणार ही चिंता. तरीही काम करण्याचे ठरवले. सेव्ह इंडियन फार्मरच्या बांधवानी आर्थिक मदत करण्याचे मान्य केले.
बंधाऱ्यात अडकलेली महाकाय वृक्ष बाजूला केले. नदीचे दोन्ही काठ भरून घेतले. नदी मार्गातील अवरोध काढून टाकून नदीमार्ग मोकळा केला. प्रचंड वेगाने काम पूर्ण केले.
सरपंच काकडे व ग्रामसेवक मामडगेची इच्छा होती मी गावात यावे. काम पूर्ण झाल्यावरच गावात जायचे हे मनाशी ठरवले होते.

ग्रामऊर्जा फौंडेशनचे सर्व बांधवांच्या सोबतच आज हिवरा गावात गेलो. झालेले काम पाहिले. समाधान वाटले.गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगत होता. परतल्यावर विवेकवाडीला गेलो.
मोठ्या प्रेमाने मागच्या वर्षी तिथे मुक्तांगण फुलवले होते. ऑक्टोबर मध्ये माझी आई आजारी पडली आणि मला झाडांना पाणी देणे अवघड होतं चालले. पुढे तर आईला ICU मध्ये ऍडमिट करावे लागले. झाडे कोमेजून जाऊ लागली. माझी अवस्था प्रचंड बिकट झाली होती. खूप प्रेमाने ती झाडे लावली होती. माझा त्यांच्यावर अपार जीवजडला होता.
आपला मित्र महादेव नरवटे मदतीला धावून आला. त्यांनी झाडांना फुलवले. संकटं काही पाठलाग सोडत नव्हती. मे महिन्याच्या सुरुवातीलाच महादेवचे वडील आजारी पडले व तो गावी गेला. आता परत परिस्थिती बिकट.

आईला सोडून विवेकवाडीत जाण्याचे धाडस मला होत नव्हते. शेवटी मनावर घेतले आणि झाडांना पाणी देण्यासाठी विवेकवाडीला गेलो. झाडे पुरते कोमेजून गेली होती. त्यात अजून एक मोठे संकट समोर आले. त्याभागातील जनित्र खराब झाले. आता लाईट नाही म्हणजे पाणी नाही. आहे त्या पाण्यात मे महिन्याच्या तीव्र उन्हात झाडे जगवणे अतिशय अवघड होते.
प्रयत्नाची शर्थ केली. टँकरचे पाणी विकत घेतले. झाडे जिवंत ठेवण्याचे खूप प्रयत्न केले. अशातच मस्त बहरलेल्या वडाच्या झाडांची पाने गळायला लागली. वड पूर्ण निष्पर्ण आणि बोडखा झाला. त्याच्याकडे पाहताना पोटात खड्डा पडायचा.
गेली आठ दिवस सकाळी 10 ते 5 भरपूर पाणी झाडांना दिले. त्याच सोबत तीन तालुक्यातील पाच गावात जलसंधारणाची कामं सुरू होती. वस्तीवरील मुलं माझ्या येण्याची वाट पाहत असत. दिवसाचे 24 तास कमी वाटत होती.
आज हिवऱ्याचे काम पूर्ण झाले. वटपौर्णिमा म्हणून वडांचे दर्शन घेण्यासाठी विवेकवाडीला आलेलो. वडाला कोवळी कोवळी छोटी पाने यायला सुरुवात झाली. मन गलबलून आलं. अचानक एक काळा मेघ प्रसवला. भाजून काढणाऱ्या उन्हात पावसाच्या सरीचा सुखद अनुभव होता. फार काळ तो टिकणार नाही म्हणून तिथेच थोडा थांबलो. पाहता पाहता आकाश मेघांनी दाटून गेले. विवेकवाडीवर मेघ अपार प्रेमाने बरसू लागली. मी पण त्या प्रेमळ सरीत चिंब भिजून गेलो. जोरात पडणाऱ्या पावसातून हळूहळू मार्ग काढत दुचाकीवरून घरी आलो. काही वेगळीच जाणीव होती. घरी आलो आणि चांगल्याच मोठ्या आजारपणातून उठलेल्या आईने मस्त गरमागरम वेफर्स, पापड्या आणि कुरवड्या खाण्यासाठी तळल्या.
काळी आई असो की माझी आई असो त्याच्यासाठी काहीही करण्याची तयारी ठेवली तर नक्कीच यश येतं याची प्रचिती आज परत आली.
Save Indian Farmers
