लेखमाला
भाग ४
आईची गोष्ट
अंबाजोगाईच्या दक्षिण पूर्वेला असलेला भाग म्हणजे देशपांडे गल्ली. संत दासोपंतांचे थोरले आणि धाकटे देवघर याच भागातील. अरुंद रस्ता व बाजूला असणारे चिरेबंदी वाडे. उत्तरेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याहून उजवीकडील एक छोट्या बोळीतून पुढे आले की एक भलामोठा चिरेबंदी वाडा. काळ्या शिसवाच्या लाकडाचा मजबुद दरवाजा आणि त्याला भक्कम आधार देणारी मोठी आगळ. वाड्यात प्रवेश करताच उजव्या बाजूला डॉ. व्यंकटराव देशपांडेचा दवाखाना. त्यात मोठ्या काचेच्या बाटलीत असणारे वेगवेगळ्या रंगाची औषध. डाव्याबाजूला डॉ. व्यंकटरावांचे निवासस्थान. पुढे गेले की भले मोठे आयताकार अंगण आणि मधोमध पारिजातकाचे झाड. सकाळी अंगणात त्याच्या कोवळ्या आणि कोमल फुलांचा सडा पडलेला असे. वातावरणात एक शांत करणारा सुगंध. परसाकडे जाताना अंजिराचे झाड. त्याची पिकलेली अंजीर अप्पा (डॉ. व्यंकटराव ) आईच्या सगट आम्हा सगळ्यांना फार प्रेमाने देत असत.
अंबाजोगाईत असे एकाहून एक सुंदर आणि अद्भुत वाडे आहेत. काही वाड्यांच्या चौकात कारंजे होती तर काही वाडे म्हणजे अलिबाबाची गहन गुहाच. लादण्या हे वाड्यांचे विशेष दालन. काही भाग भूमिगत असणाऱ्या लादण्या उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात उबदार असायच्या. पाणी साठवण्यासाठी मोठी मोठी हौद तर वाड्यातच एखाद्या कोपऱ्यात असायचा पाण्याचा आड. घराचे छत माळवदाचे. लाकडांच्या या छतांवर सुंदर नक्षीकाम केलेलं असायचे. गावातील वाडे जसे भव्यदिव्य तसे इथले जलाशय पण सुंदर आणि अद्भुत. प्रत्येक मंदिराच्या शेजारी पाण्यानी भरलेले मोठे बारव किंवा तीर्थ असायचे. कधीकाळी पाण्यासाठी स्वावलंबी हा भाग होता हि आता परिकल्पना वाटते.
अंबाजोगाईचे नाव होते मोमिनाबाद. निजामाची मोठी सैन्य छावणी इथे होती. मराठवाड्यातील उंचावरील ठिकाणा पैकी हे एक गाव. मोठ्या संख्येने मुसलमान बांधवांचे वास्तव्य. अनेक मुसलमान कुटुंबांचे अप्पा (डॉ. व्यंकटराव ) हे फॅमिली डॉक्टर. पांढरे शुभ्र धोतर. त्यावर तसाच शुभ्र कुर्ता व कोट. सावळा रंग व कमालीचा सात्विक चेहरा. शांत आणि धीरगंभीर स्वभाव. आपल्या रुग्णांना पाहिल्यावर शांतपणे विचार करत असताना बोटांनी टेबलावर ठेका ठरून निर्माण केलेला नाद. त्यानंतर प्रचंड आत्मीयतेने दिलेली औषधे. रुग्ण म्हणायचे,
“व्यंकटराव डॉक्टर बडे सोच के दवा देता है !”
काही मुस्लीम महिलांच्यासाठी ते मोठे भाऊ तर काहींच्यासाठी वडिलांच्या सारखे होते. त्यांच्या सोबतचा कंपाउंडर म्हणजे श्री अत्तम हे सर्वांनाच प्रिय होते. अशा लोभस सहवासात आणि ऐतिहासिक आणि अध्यात्मिक अंबाजोगाईत आईचे बालपण गेले. आपल्या भोवतालचा समृद्ध भोवताल आपल्याला भव्य स्वप्न पाहायला शिकवतो आणि ते वास्तवात आणण्याची जिद्द देतो. परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी संघर्ष करायला पण शिकवतो.
अंबाजोगाईच्या उत्तरेला असलेल्या असाच एक भव्यदिव्य भाग म्हणजे रविवार पेठ. या पेठेत एकेकाळी सात वाडे असणारा चिक्षे परिवार. त्यांची स्वतःची दोन मंदिर. एक हनुमानाचे आणि दुसरे नृसिंहाचे. दोन्ही शक्तीचे प्रतिक असणारे इष्टदेव ज्यांची आहेत ते चिक्षे म्हणजे कमालीचे साधे आणि शांत माणसं. मुकुंदराव चिक्षेना निजाम काळात हात कलम करण्याची शिक्षा झाली म्हणू त्यांचे सर्वच्या सर्व कुटुंब हैदाबादला विस्थापित झाले. मुकुंदरावानां आठ मुलं त्यातील मधुकरराव हे अभियांत्रिकीची पदविका घेवून अंबाजोगाईच्या पाटबंधारे खात्यात ओरशिअर. सगळे कुटुंबच हैद्राबादला गेल्याने पेठेतील वाडा मात्र पुरता पडला होता. अंबाजोगाईला परतल्यावर ते राहायचे लष्करात म्हणजे सदरबाजार परिसरात. मधुकरराव म्हणजे कमालीचा सज्जन माणूस. त्यातून त्यांचा निर्माण झालेला व्यापक लोकसंग्रह. पगार फार जास्त नव्हता पण मनाची श्रीमंती अपार होती. दिसणे सर्वसाधारण पण मनाचा दिलदार माणूस.
अंबाजोगाईतील फोटो स्टुडीओत त्यांचे जाणेयेणे असायचे. तिथे असणाऱ्या एका देखण्या मोठ्या डोळ्यांच्या आणि कुरळ्या केसांच्या तरुणीचा ( आईचा ) फोटो त्यांना आवडला. कुतुहूल युक्त सहज चौकशी केली तर त्यांच्या मित्रांनी त्यांना विचारले,
“विचारायचे का लग्नासाठी ?”
काय म्हणतात न ते Love at first sight !! असेच काही त्यांचे झाले होती. इकडे आई मात्र आपल्या विश्वात खुश होती. लग्नाची मागणी अंबाजोगाईत येताच काही महिन्यात कुणी घालेल हे तिच्या ध्यानीमनी पण नव्हते. तिच्या वडिलांचा म्हणजे भाऊंचा तर आदेशच होता. ठरले लग्न की शिक्षण सोडून लग्नांना उभे राहावे लागेल. मधुकररावांचे स्थळ तर चालून आलेले होते. त्यांना शासकीय नौकरी त्यात सज्जन माणूस नाही म्हणण्यास काही उणेच नव्हते. आईच्या पत्रिकेत उच्च मंगळ होता तिथे लग्न मोडण्याची शक्यता होती. मधुकररावाना आईशीच लग्न करायचे होते. सर्व काही ठरले. शेवटी आईला बाबांना काही विचारण्याची संधी देण्यात आली. आईने एकच प्रश्न विचारला,
“ लग्न झाल्यावर मला शिकवाल का ?”
बाबांना आईची एवढी छोटीशी इच्छा पूर्ण करणे सहज शक्य होते. मग काय आता !! कुठलीच अडचण नव्हती. आईचे आणि बाबांचे लग्न ठरले.
क्रमशः
प्रसाद चिक्षे