28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्रआईची गोष्ट

आईची गोष्ट

लेखमाला
भाग ३

अंबाजोगाई शिक्षणाचे माहेरघर. अनेक थोरामोठ्यांची कर्मभूमी. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, नरहर कुरुंदकर सारख्या अनेक दिग्गजांचे येणे जाणे आईच्या आजोळी होते. तिचे पणजोबा म्हणजे व्यंकटराव देशमुख हे हिप्परग्याची राष्ट्रीय शाळा उभारण्यातील एक शीर्षस्थ नेत्तृत्व तर आजोबा डॉ. व्यंकटराव देशपांडे हे अंबाजोगाईच्या योगेश्वरी संस्थेच्या स्थापनेच्या आद्य संचालक मंडळातील सदस्य. आजोबांच्या घरातच बालपण गेल्याचे आईचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. अंबाजोगाई शिक्षणा बरोबरच कलेचे पण माहेरघर. त्यामुळे नाट्य क्षेत्रातील दिग्गज लोक इथे घडले. आईचा नाट्यक्षेत्रातील प्रवेश अनोखा होता. दहावीत असताना तिने व तिच्या मैत्रिणीनी मिळून ‘ सुशिक्षित सासुरवास’ नावाचे एक नाटक बसवले. आईच्या वाट्याला आलेली भूमिका तिने लाजवाब सादर केली. त्या नाटकापासून तिला अंबाबाई म्हंटले जाऊ लागले.

शिक्षण बंद झाल्या पासून तिच्या नाट्य क्षेत्रातील अभिव्यक्तीला पण खाडा पडला. गेवराईतील तिचे दिवस खूपच अवघड होते. मनात शिकण्याची प्रचंड आस होती. तिचा चांगलाच भावनिक कोंडमारा झाला होता. अशातच तिच्या पाठच्या भावाला दहावीसाठी अंबाजोगाईत ठेवण्याचे ठरत होते. आईला त्याच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून स्वयंपाक करण्यासाठी अंबाजोगाईत ठेवण्याचे ठरले. आई तशी चांगलीच जिद्दी. तिने स्पष्ट शब्दात सर्वाना सांगितले.

मला शिकवणार असला तरच मी अंबाजोगाईत राहते.”

तिचा निर्धार कामी आला. आईला कॉलेजमध्ये जाता येवू लागले. आजोबा डॉ. व्यंकटरावांच्या घरातच एक खोली करून ही भावंड सोबत शिकत होती. आई घरातील सगळे काम करून कॉलेज करत होती. हे सगळे काही सुखासुखी नाही घडले. आईच्या वडिलांनी म्हणजेच भाऊंनी आईला ताकीद दिली.

“ मंगाबाई शिकणे ते ठीक आहे पण लग्न ठरले तर मात्र सगळे बंद करून लग्न करावे लागेल.”

आईच्या मनात धास्ती होती पण उमेद भारी होती. ती अधिकच उर्मीने अभिव्यक्त होऊ लागली. तिला याच काळात सहवास लाभला तो शैलाताई लोहिया, बालुताई हस्तक यांचा. त्यांच्या सहवासात तिच्या अभिनयाला नवे धुमारे फुटू लागले.शिक्षण व अभिनयातील तिचा मुक्त संचार सुरु झाला. ‘मी उभा आहे’ मधील ‘भीमा’ मुंबईची माणसं मधील खेडवळ बाईची भूमिका तर तिने अफलातून सादर केली. अशाच एका मॉक ट्रायलच्या वेळी भगवानराव सबनीस सरांनी तिचा अभिनय पाहिला व खुश होऊन तिला एक पुस्तक बक्षीस दिले. यासर्वात आईची खास मैत्रीण मंगल कन्नडकरची तिला विशेष साथ होती.

नियतीच्या मनात मात्र वेगळेच काही होतं अशातच पाटबंधारे खात्यातील मधुकरराव चिक्षेना आईचा स्टुडीओ मधील फोटो आवडला व मध्यस्थांनी भाऊंच्या समोर आईच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला….

क्रमशः

प्रसाद चिक्षे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]