भाग २
भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि लगोलग हैदाबाद संस्थान मुक्त झाले. कित्येक दिवसांच्या लढ्याला यश मिळाले. सर्वत्र भारलेले वातावरण होते. एका नवीन पर्वाला सुरुवात झालेली होती. अशा कालखंडात आईचा जन्म झाला. तिच्या येण्याने घरात मंगल पर्वाला सुरुवात झाली. सर्वांची ती खूपच लाडकी होती. तिच्या आयुष्यातील सर्वात सुखद आठवणी याच काळातील. तिचे आजोबा डॉ.व्यंकटराव तिचा खूपच लाड करायचे. वडिलांची सारखी बदलीची नौकरी असल्याने तिचे सगळे लहानपण अंबाजोगाईतच गेले. खूपच रम्य आठवणी आहेत.
शिक्षणाचा श्रीगणेशा पण घरातच झाला. अभ्यासात तिची प्रगती चांगलीच होती. शेवटी आठव्या वर्षी शाळेत घालायचे ठरले. श्री. खोलेश्वर शाळेतील संदिकर गुरुजींनी तिची तयारी पाहून तिला सरळ तिसऱ्या वर्गात प्रवेश दिला. एकच वर्षात शाळा बदलून श्री.योगेश्वरी मंदिरात भरणाऱ्या श्री.योगेश्वरी विद्यालयात ती जाऊ लागली. आजोबा तिला दररोज इसुचा कलमा व चिवडा खाण्यासाठी दहा पैसे द्यायचे. श्रावण महिन्यात आपल्या हाताने मेंदी काढून आपल्या जवळ झोपवायचे. घरात अनेक जण शिक्षणासाठी येवून राहिलेले असल्याने घर नेहमीच गजबजलेले असायचे.
शाळेतील शिक्षक खूपच प्रेमळ होते तसेच ध्येयांनी भारलेले होते. असेच एके दिवशी आई आपले दप्पर पाठीवर टाकून शाळेत गेली. बाजीराव गुरुजींनी सर्व विद्यार्थ्यांना लिखाणाचे काम दिले. आईने आपले लिखाणाचे साहित्य बाहेर काढण्यासाठी दप्तरात हात घातला. तोच तिला काही तरी चावल्याची जाणीव झाली. ती जोरात ओरडली. बाजीराव गुरुजी धावत आले. त्यांनी दप्तर पाहिले. तो त्यात एक मोठा विंचू होता. विंचवाने चांगलाच दंश केला होता. बाजीराव गुरुजींनी तिला उचलले व ते धावतच डॉ.व्यंकटरावांच्या ( आईचे आजोबा ) घरी निघाले. योग्य तो उपचार लगेच झाला व काही काळात तिला आराम वाटला. अशा शाळेतील अनेक आठवणी सांगताना तिचे डोळे आज पाणावतात.
आईच्या पाठोपाठ तिच्या चार भावंडांचा जन्म झाला. आईच्या वडीलांना सगळेच लोक भाऊ म्हणत. ते आईला मंगाबाई नावाने हाक मारायचे. महसूल खात्यात नौकरीला असल्याने सतत त्यांची बदली होत असे. त्यांचा दरारा मात्र घरात खूपच होता. त्यांचा शीघ्रकोपी स्वभाव हे त्याचे कारण. इकडे आजोबांच्या घरी आई अभ्यासात चांगलीच रमली. तिचे स्वप्न खूप शिकून आजोबांच्या सारखे डॉक्टर होण्याचे होते. नियतीच्या मनात मात्र काही तरी वेगळेच होते. दहावी पर्यंतचे शिक्षण खूपच व्यवस्थित झाले. पुढे कॉलेज मध्ये शिकण्याला मात्र भाऊंचा विरोध होता.ते कमालीचे जुन्या विचारांचे होते. मुलगी म्हणजे परक्याचे धन.
“कुटून खायच्या आणि उठून जायच्या.”
हे वाक्य मुलीच्या बाबत नेहमीच त्यांच्या तोंडात असे. याच काळात आईच्या आजीला रजोनिवृत्तीची भयंकर त्रास सुरु झाला. ते सर्व पाहून आजोबा डॉ.व्यंकटरावांचा एकट्याच्या बळावर आईला कॉलेज मध्ये शिकवण्याचा विश्वास कमी झाला. परिणामी आईला शिक्षण बंद करून भाऊ व आक्काच्या सोबत गेवराईला जावे लागले. शिकण थांबल्याची असह्य वेदना उराशी बाळगत ती आता चुलीवर भाकरी करायला लागली.
क्रमशः
