व्यक्ती विशेष
भाग १
प्रत्येक आईची एक गोष्ट असते. त्यात खूप काही असते. बालपणीच्या तिच्या हळुवार आठवणी.कुठेतरी खोलवर रुतलेल्या बोचऱ्या घटना. अफाट अशा पराक्रमाच्या गोष्टी नसतील पण चिमुकल्या मासाच्या गोळ्याला पराक्रमी माणूस बनवतानाच्या संघर्षाच्या गोष्टी नक्कीच असतील. अर्थात तो संघर्ष पण तिने कर्तव्यभावनेने केलेला असल्याने तितकासा रोचक वाटणार नाही. पण आई ही आईच असते. परमेश्वराचे स्वरूप असते म्हणून तिला हृदयाच्या गाभाऱ्यापासून दूर नाही करता येत. कितीही अफाट सामर्थ्यशाली पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या मनाच्या हळव्या कोपऱ्यात एक विसावा असतो ती म्हणजे आई.
डॉ व्यंकटराव, आपल्या क्षमतांना आव्हान देत समाजासाठी काही तरी करणारा कुटुंब वत्सल माणूस. सृजनाचा आणि देशसेवेचा वारसा असणारी कमला त्यांची पत्नी. त्यादोघांची मोठी मुलगी कुसुम. काहीशी आपल्याच वडिलांच्या सारखी. वयात येताच कुसुमचे लग्न झाले कुंबेफळच्या वतनदार घरातील शिवाजीरावांशी. शिवाजीराज म्हणजे जमदग्नीचे दुसरे रूप. लग्न होताच पुढल्या वर्षी पाळणा हलला पाहिजे असा रिवाज. कुसुमच्या नशिबात ते सुख नव्हते परिणामी दोन तीन वर्षातच शिवाजीरावचे दुसरे लग्न करण्याचा प्रस्ताव पुढे येवू लागला. मनाची कुचंबना आणि सासुरवास याने कुसुम पुरती गांजली होती. डॉ व्यंकटरावांना आपल्या चुकीची जाणीव जास्तच होत होती. मुलीला शिकवले असते. थोडं कर्ते केले असते तर ही वेळ आली नसती.
कमालीची उदासी असतानाच कुसुमच्या पाठच्या भावाला क्रांतिकारक ठरवत इंग्रजांनी तुरुंगात डामले. यात भर पडली ते डॉ व्यंकटरावांच्या वडिलांच्या दीर्घ आजाराची. अशा अंधाऱ्या काळात कुसुमच्या पोटी एक छोटीशी पोर जन्माला आली. तिच्या जन्माच्या चाहुली बरोबर डॉ व्यंकटरावांचा मुलगा तुरुंगातून सुटला आणि वडील दादासाहेब ठणठणीत बरे झाले. त्या छोटीचे नाव ठेवले मंगल ……ती माझी आई आणि हा तिच्या जन्मापुर्वीचा इतिहास ….
क्रमशः