विहिंपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, उद्योजक अशोकराव चौगुले यांचा ‘अमृत महोत्सव ‘ सोहळा उत्साहात संपन्न
मुंबई, दि.०९ (प्रतिनिधी) : “भारताकडे विश्वातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे. पण अलिकडे तत्त्वानुसार व्यवहार केला जात नाही. त्यासाठी आदर्श हिंदू जीवन पद्धतीचा अंगीकार करावा लागेल. अशोकराव चौगुले हे आदर्श हिंदू जीवनपद्धतीचे एक उदाहरण आहे. त्यांच्या प्रमाणे सर्वांनी व्यवहार करावा.”असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केले.
् प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात रविवार,दि.९ एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व सामाजिक -शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सुप्रसिद्ध उद्योजक अशोकराव चौगुले यांचा ‘अमृत महोत्सव’ सोहळा श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोंविद देव गिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक,राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पू. ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी,विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे, सत्कार समितीचे कार्याध्यक्ष सुरेश भगेरिया आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वेदपठणाने करण्यात आली.

याप्रसंगी सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांनी चौगुले यांच्या हस्ते अशोक चौगुले यांचा शाल, श्रीफळ व चाफेची परडी देऊन सत्कार झाला तर स्वामी गोंविद देव गिरी महाराज यांच्या हस्ते वटवृक्षाची प्रतिकृती व शाल देऊन सत्कार करण्यात आला. सौ. सुधा अशोक चौगुले यांचा सत्कार समितीच्या सदस्या डाॅ.अलका मांडके व डॉ.अस्मिता हेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सरसंघचालक आपल्या भाषणात म्हणाले की “भारत हा विश्वगुरू आहेच, पण त्या समोर काही आव्हाने उभी आहेत. हे आव्हान भेदून काढण्यासाठी देशात सजग व सशक्त पिढी निर्माण करणे आवश्यक आहे.”
प्रास्ताविकात सा.’ विवेक’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी चौगुले यांच्या पंचाहत्तर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोंविद गिरी महाराज म्हणाले, हिंदुत्त्वाच्या पुनरुत्थानात अशोकराव चौगुले यांनी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. धर्म आणि अर्थ या गोष्टींचा सुयोग्य सांगड घालून त्यांनी समाज आणि धर्म कार्य केले आहे. त्यांच्या प्रमाणे प्रत्येकाने हिंदू धर्मांच्या उत्थानासाठी कार्य करावे,”असे त्यांनी आवाहन केले.
ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी म्हणाले, “अशोकराव चौगुले यांचे कार्य जांबुवंता सारखे आहे. उद्योग, समाजसेवा आणि धर्मांसाठी उत्तम कार्य करणारे ते एक प्रेरणादायी व्यक्ती आहेत.”
” हिंदुत्त्वाच्या कार्यासाठी निर्भयता आणि आत्मविश्वास या दोन गुणांची खूप आवश्यकता असते. या गुणांची खाण अशोकरावांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेली आहेत. या गुणांमुळेच विश्व हिंदू परिषदेचे विविध दायित्व त्यांनी यशस्वीपणे सांभाळले,” असे गौरवोद्गार विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी काढले
या प्रसंगी अशोकराव चौगुले यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त डॉ यशवंत पाठक यांनी २५ वर्षांपूर्वी त्यांना दिलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले. यानंतर चौगुले यांच्या जीवनावर गोपी कुकडे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता केतकी भावे व स्वरा भावे यांनी गायलेल्या पसायदानाने करण्यात आली.
‘फोर डिकेड्स ऑफ हिंदू रेनसान्स’ व ‘द आरएसएस, मनू अॅण्ड आय’ या पुस्तकांचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन
अशोकराव चौगुले यांच्या पंचाहत्तरीनिमित्त विवेक व्यासपीठ प्रकाशित व अरविंद सिंग यांनी संपादित केलेल्या ‘फोर डिकेड्स ऑफ हिंदू रेनसान्स’ ( ‘For Decades Of Hindu Renaissance’) या इंग्रजी पुस्तकाचे तर हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष तथा पद्मश्री रमेश पतंगे यांच्या ‘मी,मनु आणि संघ’ या मराठी पुस्तकाचे ‘द आरएसएस, मनू अॅण्ड आय’ (‘The RSS, Manu And I’ इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यात आले आहे. या दोन्ही पुस्तकाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.